(बाळक्रीडा अभंग)
3855.
(बाळक्रीडा अभंग)
जननी हे म्हणे आहा काय झाले । शरीर रक्षिले काय काजे ॥१॥
काय काज आता हरीविण जिणे । नित्य दुःख कोणे सोसावे हे ॥२॥
हे दुःख न सरे हरी न भेटे तो । त्यामागेचि जातो एका वेळे ॥३॥
एकवेळ जरी देखते मी आता । तरी जीवापरता न करिते ॥४॥
करिता हे मात हरीचे चिंतन । शुभ तो शकुन तुका म्हणे ॥५॥
अर्थ :
यशोदा म्हणू लागली की, माझा कृष्ण यमुनेच्या डोहात बुडाला हे किती वाईट झाले मी माझे शरीर का जतन केले असेल ? आता हरीवाचून जगण्यात काय अर्थ आहे नित्य हे दु:ख कोण सोसत रहावे ? यशोदा पुढे म्हणू लागली की, माझा हरी मला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत माझे दु:ख संपणार नाही त्यापेक्षा त्याच्या मागेच गेलेले बरे. मी हरीला एकवेळा जरी पाहिले तरी त्याला आता यापुढे मी माझ्या जीवापेक्षा वेगळा करणारच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, यशोदा माता हरीचे चिंतन करत असताना तिला शुभ शकुन होऊ लागले.
