नाही शब्दाधीन वर्म आ
3274.
नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्री मंत्री अनुभव तो ॥१॥
हर्षामर्षा अंगी आदळती लाटा । कामक्रोधे तटा सांडियेले ॥धृपद॥
न सरे ते भक्ति विठोबाचे पायी । उपरति नाही जेथे चित्ता ॥२॥
तुका म्हणे सुख देहनिरसने । चिंतने चिंतन तद्रूपता ॥३॥
अर्थ :
हरी प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारचे शब्दज्ञान आवश्यक नाही व कोणत्याही मंत्र व तंत्राने हरीचा अनुभव येत नाही हरी प्राप्तीचे खरे वर्म यापासून फार दूर आहे. जोपर्यंत दु:ख व आनंद याच्या लाटा अंगावर आदळतील अंत:करणामध्ये काम क्रोध जोपर्यंत आहे तोपर्यंत हरीची प्राप्ती होऊ शकत नाही. जोपर्यंत आपल्याला संसाराची पूर्णपणे विरक्ती उपरती होत नाही तोपर्यंत आपण कितीही भक्ती केली तरी ती विठोबाच्या पायाजवळ सरती होत नाही म्हणजेच मान्य होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देहाभिमानाचा पूर्णपणे निरास केल्यानंतरच सुख प्राप्त होते आणि हरीचे सतत चिंतन केल्यानेच हरीशी मनुष्य तद्रूप होतो.
