महा वैरी निर्दाळिला
61.
महा वैरी निर्दाळिला ।
पैल वत्सासुर निवटिला ।
म्हणती अचोज हा बळिया झाला ।
नंदरायाचा कुमरु ॥१॥
मात गेली कंसासुरा ।
ऐकोनि झाला तो घाबरा ।
विचारी आपुलिया कैवारा ।
न दिसे दुसरा ऐसा बळी ॥२॥
जो तो जाउनी घातचि पावे ।
नये परतोनिया जीवे ।
यावरी आता शरण जावे ।
कवणिया वीरा महीतळी ॥३॥
तव तो उठोनी अघासुर ।
करी रायासी जोहार ।
म्हणे न व्हावे चिंतातुर ।
विदया अपार मजपाशी ॥४॥
राया तुझिया हितावरी ।
करीन गोकुळाची बोहरी ।
अवघेचि घालूनिया उदरी ।
येईन कृष्णासमवेत ॥५॥
ऐसे तोषवूनिया राया ।
म्हणे न धरी आता भया ।
तैशा रचुनिया माया ।
करितो संहार सकळांचा ॥६॥
निळा म्हणे म्हणे गर्वारुढ ।
यावरी होऊनिया मूढ ।
काळासवे मांडूनिया होड ।
खेळो पाहे मश्यक ॥७॥
