तुझे पवाडे सांगता तु
807.
तुझे पवाडे सांगता तुजपुढे ।
मुक्तीची कवाडे उघडती ॥१॥
नाही जातिकुळ म्या तुज पुसिले ।
मन मावळले देखोनिया ॥२॥
तुझे तुज पुसता लाजिरवाणे ।
तरी हांसती पिसुणे प्रपंचाची ॥३॥
उगविता भले की नुगविता सांपडले ।
ज्ञानदेवो बोले निवृत्तीसी ॥४॥
अर्थ :
हे श्रीकृष्णा, तुझ्यापुढे तुझी कीर्ति गाऊ लागलो म्हणजे मुक्तिची द्वारे मोकळी होतात. तुला पाहिल्याबरोबर तुझ्या ठिकाणच्या यातीकुळाचा विचार न करता तुझ्याठिकाणी माझे मन तल्लीन होऊन गेले. तुझ्या स्वरूपाचा विचार, तुला विचारू लागले असता हा आता देवाच्या नादी लागला असे म्हणून बहिर्मुख प्रापंचिक लोक माझ्याकडे बघून हसतात. अशी ह्या तुझ्या स्वरूप ज्ञानाकरिता खूप खटपट करावी लागते. पण मला मात्र ते ज्ञान श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने सहजासहजी लाभले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
