॥ श्रीएकनाथमहाराजकृत
63.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय त्रेसष्टावा ॥
वृत्रासुरवधाची कथा
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
ऋषीची संज्ञा जाणोन । श्रीरामे स्नानसंध्या सारुन ।
नंतर करावया भोजन । ऋषि राम प्रवर्तले ॥१॥
श्रीरामभोजनाकारणें । नानापरींचीं फळे तेणे ।
उत्तम शाका अगस्तीनें । श्रीरामालागी आणिल्या ॥२॥
उत्तम फळे रुचकर । भोजनी प्रवर्तला राजेश्वर ।
भोजन करोनि श्रीरघुवीर । निजासनी बैसला ॥३॥
तृणपर्णकुटिकेमाझारी । श्रीरामे निद्रा करोनि तमारी ।
उदय होता नृपकेसरी । स्नानसंध्या संपादिली ॥४॥
ऋषींस करोनि नमस्कार । हात जोडोनि श्रीरघुवीर ।
म्हणता झाला आजि भाग्य अपार । चरण तुमचे देखिले ॥५॥
आजि धन्य माझे कुळ । धन्य माझे भाग्य सफळ ।
जन्मोजन्मींचें तपाचे फळ । चरणयुगुल देखिले ॥६॥
आता निजनगरा जावयासी । आज्ञा दिधली पाहिजे ऋषी ।
ऐसे श्रीराममधुरवचनासी । ऐकोनि कुंभोद्भव बोलिला ॥७॥
आचमनीं प्राशिला अपांपती । विंध्याद्रि निजविला क्षिती ।
ऐसा कुंभोद्भव रामाप्रती । काया बोलिला जाहला ॥८॥
अगस्ति म्हणे श्रीरामा । तुवा वधोनि दुष्टात्मा ।
सुखसंतोष दिधला आम्हा । पावन अवनी तुवा केली ॥९॥
सर्व भूतांचें दुःखकंद । जयांचे बंदीं सुर पावले बंध ।
ऐसा रावणकुंभकर्णांचा कुळासह वध । करोनि अमर सोडविले ॥१०॥
तुझा उपकार महापुरुषा । सहसा वर्णवेना शेषा ।
साही दर्शनां विवाद आपैसा । अद्यापि तुटला पै नाही ॥११॥
ऐकोनि अगस्तीचें स्तवन । संतोषला धरणिजारमण ।
ऋषीस करोनि नमन । विमानारुढ पै झाला ॥१२॥
हेममय पुष्पकविमानीं । आरुढोनि श्रीराम गगनी ।
आज्ञा करिता पुष्पक अवनी । अयोध्येचे उतरले ॥१३॥
ज्ञानकर्मेंद्रियांचा नाथ । तयाचा वेग राहिला तेथ ।
अंजनीभ्रतार लज्जान्वित । पुष्पकापुढें होवोनि ठेला ॥१४॥
श्रीराम आरुढोनि विमानी । माधान्ह होता अयोध्याभुवनीं ।
प्रवेशता पुष्पका आज्ञापोनी । निजस्थानीं पाठविले ॥१५॥
श्रीराम येवोनि सदना उजु । बैसोनि पाचारिले अनुजु ।
भरतलक्ष्मण आनंदभोजु । अग्रजासी भेटले ॥१६॥
अग्रजानुजां झाली भेटी । स्वानंदे हेलावली सृष्टी ।
मग श्रीरामे बंधूंप्रति गोष्टी । सांगितली स्वकृत ते ॥१७॥
शूद्रजातीचा तापस । दक्षिणदिशे करी धूम्रपानास ।
तयाते वधोनि ब्राह्मणा संतोष । बाळ वांचवोनि दीधला ॥१८॥
आता पुढील कर्तव्यता । ते तुम्ही ऐका एकाग्रचित्ता ।
आम्ही केले राक्षसांच्या घाता । हत्या बहुत घडल्या आम्हा ॥१९॥
करावया पातकाचें निर्दळण । करु धर्माचें संरक्षण ।
आता करु अश्वमेधयज्ञ । राज्यरक्षण करावया ॥२०॥
ऋषिजनसुखसंतोषार्थ । मी अश्वमेधयज्ञ करीन येथ ।
ऐसे श्रीरामाचे मनोगत । जाणोनि भरत बोलता झाला ॥२१॥
भरत म्हणे श्रीरामासी । पूर्वी कोणे केले यज्ञासी ।
ते मजप्रति सांगिजे विस्तारेंसीं । फलश्रुतीसीं रघुवीरा ॥२२॥
ऐकोनि कनिष्ठ बंधूचे वचन । बोलता झाला श्रीरघुनंदन ।
पूर्वी मित्रे राजसूय यज्ञ करुन । वरुणलोक पावला ॥२३॥
चंद्रें करोनि राजसूय यज्ञ । त्रैलोक्यींचें उत्तम स्थान ।
ते पावला शाश्वत स्थान । यालागी की धर्मपालन करावे ॥२४॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । भरतें उपक्रम करुन ।
बोलता झाला स्वये आपण । निजलक्षण धर्माचें ॥२५॥
भरत बोले श्रीरामासी । तू त्रैलोक्याचा ईश होसी ।
स्वधर्मा प्रतिपाळ करावयासी । तुजहून आन पै नाही ॥२६॥
ब्रह्मा तुझे पोटींचें बाळ । इंद्रादि किंकरें प्रबळ ।
तुझी आज्ञा वंदी काळ । तू दीनदयाळ श्रीरामा ॥२७॥
करितोसी अश्वमेध यज्ञ । यदर्थी अशक्य नाही जाण ।
परी विचारिजे कार्यकारण । जीवा पीडण होय बहुत ॥२८॥
पृथ्वीतळींचे नृपवर । तयांसीं संग्राम करिता घोर ।
जीवमात्राची हिंसा अपार । यज्ञ करिता होईल ॥२९॥
अमृतोपम भरताचे वचन । ऐकोनिया धरणिजारमण ।
हांसोनि बोलता झाला आपण । स्वधर्मपाळण उत्तम जे ॥३०॥
भला भला राया भरता । तुजहूनि आन न देखे ज्ञाता ।
अश्वमेश करणे सर्वथा । माझ्या चित्ता गमतसे ॥३१॥
दंडकारण्यीं लंकाभवनीं । अगणित राक्षस पडिले रणी ।
तया पापाची करावया खंडणी । अश्वमेध यज्ञीं प्रवर्तावे ॥३२॥
पूर्वी देवेंद्र वृत्रासुर मारिला । ब्रह्महत्येचा डाग बैसला ।
अश्वमेध यज्ञ करिता झाला । पवित्र इंद्र तिही लोकी ॥३३॥
श्रीरामभरतांचें वचन । ऐकोनिया लक्ष्मण ।
बोलता झाला सुखसंपन्न । वृत्राख्यान सविस्तर ॥३४॥
लक्ष्मण म्हणे बंधूंसी । पूर्वील इतिहास तुम्हांपासीं ।
सांगतसें विस्तारेसीं । निजधर्मासी संरक्षण ॥३५॥
वृत्रासुराची कथा :
वृत्रासुर यातीचा ब्राह्मण । तीन शत योजने शरीर उंच जाण ।
आडवें शतयोजन प्रमाण । लंबायमान दीर्घ जे ॥३६॥
ऐसा वृत्रासुर दीर्घशरीरी । परी स्वधर्मे प्रजापाळण करी ।
अधर्म नाही राज्याभीतरी । दीना कैवारी कृपाळु ॥३७॥
यथाकाळी वर्षे पर्जन्य । पृथ्वी धनधान्यें परिपूर्ण ।
उदक सरोवरीं निर्मळ जाण । न आटे कदाकल्पांतीं ॥३८॥
राज्य करिता वृत्रासुरासी । कोणे एके काळी अनुताप त्यासी ।
उपजोनियां निजराज्यासीं । पुत्र अधिकारी पै केला ॥३९॥
तया पुत्राचें नाम मधुरेश्वर । अत्यंत तपी सज्ञान धर्मिष्ठ चतुर ।
राज्यीं स्थापोन तो निजकुमार । आपण तपा निघाला ॥४०॥
उत्तम तप करुन । जिंतीन मी देवसदन ।
ऐसे कल्पोनियां वना प्रयाण । करिता झाला वृत्रासुर ॥४१॥
वनी करोनि उग्र तपासी । हाहाभूत इंद्र अमरगणेंसीं ।
चिंतातुर होवोनि मानसी । काय करिता पै झाला ॥४२॥
सकळ सुरांसहित । इंद्र आला विष्णू जेथ ।
तयासि करोनि दंडवत । हात जोडोनि उभा ठेला ॥४३॥
इंद्र म्हणे विष्णूसी । कृपाळुवा वाक्य परियेसीं ।
वृत्रासुर दैत्यवंशीं । उग्र तप करितसे ॥४४॥
तयाचे तपेंकरुन । हाहाभूत अमरगण ।
तेणे वश केले भूमंडळींचे जन । स्वर्गलोक घेऊ पाहतो ॥४५॥
तप करोनि उत्कृष्ट । प्राणिजना होताती कष्ट ।
मजहि पडले भयसंकट । निवारिता श्रेष्ठ आहेसि तू ॥४६॥
संसारभवगजापासून । सोडविता तू जनार्दन ।
आणि उच्चारिता नामस्मरण । पातक भग्न होतसे ॥४७॥
तुझ्या भृकुटीचेनि प्रभावें । उत्पत्ति स्थिती होय स्वभावे ।
त्रैलोक्य उदरी धरिले देवे । थोर उदर करोनी ॥४८॥
तू निर्गुण निराकार । निष्कर्म निरुपचार ।
अज अव्यय अक्षर । श्रुतीसी पार न कळे तुझा ॥४९॥
या भूतसृष्टीची चिंता । तुजचि असे गा जगन्नाथा ।
आम्हा देवा तूंचि स्थापिता । उच्छेदितां तूंचि पै ॥५०॥
वृत्रवधाचिया कारणे । तुवा साह्य व्हावे जनार्दने ।
ऐसी करुणेचीं ऐकोनि वचनें । करुणाघनें पाहिले ॥५१॥
सकळ देवांसहवर्तमान । इंद्राप्रति श्रीनारायण ।
बोलता झाला मधुर वचन । सावधान अवधारा ॥५२॥
विष्णू म्हणे देवांसी । माझा भक्त वृत्रासूर निश्चयेसी ।
माझे हस्ते मृत्यु नाही जाण त्यासी । परी उपायासी सांगेन ॥५३॥
इंद्रहस्तें होय मृत्यु । ऐसा उपाय करीन सत्य ।
माझे सामर्थ्य जे गुणातीत । त्याचा त्रिधा भाग करिन ॥५४॥
एक अंश शरीरी । दुसरा अंश वज्राभीतरीं ।
तीसरा अंश पृथ्वीवरी । ये प्रकारीं विभागीन शक्ति ॥५५॥
वृत्रवधालागून । मी त्रिधा होतो जाण ।
परी इंद्राचे हाते पावेंल मरण । मी न मारींच तयाते ॥५६॥
इंद्र-वृत्राचे युद्ध :
ऐसे ऐकोनि विष्णूचे वचन । वृत्रवधालागीं सिद्ध सुरगण ।
सकळांसहित इंद्र आपण । युद्धालागून प्रवर्तला ॥५७॥
पर्वतारीनें वज्र घेवोनि करी । जेथे वृत्र तप करी तेथवरी ।
येवोनि युद्धा पाचारिला वैरी । येरू गजरीं निघाला ॥५८॥
इंद्र आणि वृत्रासुर । युद्ध करिती घोरंदर ।
स्वर्गी सकळ सुरवर । कौतुक पाहती दोघांचें ॥५९॥
दोघें झुंजती उसण्याघायी । एक्मेकांसी लोटती पाही ।
इंद्र वज्र घेवोनि ते समयी । शिर दैत्याचें तोडिलें ॥६०॥
दैत्य पडोनि धरणीवरी । जैसा स्वर्गीचा कोसळला गिरी ।
रुधिर वाहे प्रवाह भारी । नदीसारिखा लोटला ॥६१॥
ऐसा होता वृत्रासुरवध । झाला सकळांसी आनंद ।
परी इंद्रासी ब्रह्महत्येचा बाध । अति विरुद्ध लागला ॥६२॥
हीन दीन गेली कळा । मुकला वीर्यशौर्यमहाबळा ।
म्हणे ब्रह्महत्या आली माझिये कपाळा । थोर अवकळा इंद्रासी ॥६३॥
देशींचा गेला पर्जन्य । बहुकाळ पडिले अवर्षण ।
भूतगणांसी न मिळे अन्न । प्राणिगण मरतें झाले ॥६४॥
इंद्र चंद्र पदापासून । च्यवोनि झाले अति दीन ।
सकळही सुरवर मिळोन । श्रीजनार्दन प्रार्थिला ॥६५॥
देव म्हणती पुरुषोत्तमा । तुझेनि वरदे वधिले अधमा ।
परी ब्रह्महत्या लागली न सोडी कर्मा । इंद्रालागी स्वामिया ॥६६॥
इंद्र तंव निमित्तधारी । सृष्टींचा प्रतिपाळ तुझा तूंचि करी ।
तूंचि एक चराचरी । त्रैलोक्यासी आधार ॥६७॥
इंद्र ब्रह्महत्येपासून । सोडवावा कृपा करुन ।
ऐसे देवांचे ऐकोनि वचन । काय करिता जाहला विष्णु ॥६८॥
ब्रह्महत्यादोषनिवारणार्थ अश्वमेध :
विष्णु म्हणे देवांसी । ब्रह्महत्या नासे त्या उपायासी ।
इंद्रें करावे अश्वमेधासी । मजप्रीत्यर्थ जाण पा ॥६९॥
मजप्रीत्यर्थ करील यज्ञ । तरी पावेल निजस्थान ।
ब्रह्महत्येचें होईल दहन । पुण्यवान तिही लोकी ॥७०॥
ऐकोनिया विष्णूचें वचन । सकळ सुरवर मिळोन ।
जेथे इंद्र होता आपण । तया वना पातले ॥७१॥
देवी शचीपति देखिला कैसा । हीन दीन पिशाच जैसा ।
इंरा सावध करोनि सहसा । अमरावतीये आणिला ॥७२॥
इंद्र आणोनि अमरावतीसी । देवीं करोनि अश्वमेधासी ।
यज्ञ संपविलिया समयासी । ब्रह्महत्या पुढे उभी राहिली ॥७३॥
ब्रह्महत्या म्हणे देव हो । मज कोठे वस्तीसी नेमिला ठावो ।
मी इंद्रा सोडूनि कोठे राहों । कोणकोणत्या स्थळाप्रती ॥७४॥
देव म्हणती ब्रह्महत्येसी । तुवा व्हावे चतुर्भागेंसीं ।
मग विभागिते झाले देव ऋषी । ते सर्वही अवधारा ॥७५॥
चतुर्मासीं पडे पर्जन्य । तेणे नदी उंचबळे पूर्ण ।
ते जाण तुझे राहतें स्थान । दुसरे स्थळ अवधारी ॥७६॥
तारुण्ययौवनें मुसमुसीं कांता । तेथे त्वा रहावे दिनत्रय सर्वथा ।
रजोदर्शनीं ब्रह्महत्या । दुसरा ठाव हा तुझा ॥७७॥
तुसरे वस्तीचें स्थान । भूमीवरी उखिरडीं राहून ।
सर्वकाळी सर्वदेशीं जाण । भूमि सोडून नव जावे ॥७८॥
चवथी वस्ती पापिष्ठांचें ठायी । जे का विमुख नामी पाही ।
नरदेहा येवोनि भुललें विषयी । सर्व काळ वस्ती तेथे तुझी ॥७९॥
ऐसी ब्रह्महत्या चहू प्रकारीं । वांटोनियां सुरवरी ।
इंद्रासि करोनि राज्याधिकारी । अमरावतीसी स्थापिला ॥८०॥
शैलारी अमरपदीं विराजमान । राज्य करी सुखसंपन्न ।
पुढे वर्तले ते कथानुसंधान । श्रोते जन अवधारा ॥८१॥
एका जनार्दना शरण । इंद्रासी देवोनि इंद्रासन ।
देव झाले स्वानंदे पूर्ण । पुढील चरित्र गोड असे ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
वृत्रासुरवधो नाम त्रिषष्टितमोऽध्यायः ॥६३॥ ओंव्या ॥८२॥
