वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ३२. यज्ञाश्व प्रस्थान

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088313 · अभंग क्र. ३२

32.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय बत्तिसावा ॥
इंद्र रावण युद्धाला प्रारंभ

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

इंद्रजिताचे युद्धार्थ आगमन :

सवित्रवसूने सुमाळी । मारिलासे रणकल्लोळीं ।
अस्थिमासांची झाली होळी । मेळविला धुळी राक्षसांहित ॥१॥
ऐकोनि रावणाचा ज्येष्ठ सुत । क्रोधा चढलासे बहुत ।
नेत्र करोनि आरक्त । युद्धा प्रवर्तत ते समसीं ॥२॥
पळत्या देवोनि नाभीकार । आपण रणांगणी राहिला स्थिर ।
कनकरथी जडित धुर । पोंवळ्यांचीं चाकें हो ॥३॥
रथी जुंपिलें वारू । पवनातें म्हणती स्थिरू ।
स्वइच्छेनें चराचरू । चरणातळीं दडपिती ॥४॥
आधींच ते श्यामकर्ण । पाखरिले भूषणेंकरून ।
पताकी झाकोळलें गगन । तेजे लोपोन जाय हो ॥५॥
ऐसिया कनकदिव्यरथीं । आरुढला सुलोचनापती ।
दिव्य शस्त्रे घेवोनि हाती । गर्जना करित निघाला ॥६॥
ऐसा देखोनि रिपुकुमर । पळाले दश दिशांसी सुर ।
समरांगणी धरिता धीर । थरथरां वीर कांपती ॥७॥
शैलारीने ऐसे देखोन । सौन्याते देतसे आश्वासन ।
भिऊं नका या शब्देकरून । पळतयांतें स्थिरावले ॥८॥

जयंत व इंद्रजिताचे युद्ध :

वज्रपाणि म्हणे वीरांसी । पुत्र करितो संग्रामासी ।
तुम्ही रहावे त्याचे पाठीसी । निमेषेंसीं रिपु पराभवील ॥९॥
तदनंतरे ते अवसरी । शक्रसुत जयंत नामेंकरी ।
बैसला कनकरथावरी । धुरेसि सारथि अति कुशळ ॥१०॥
त्वरेंकरोनि रथ प्रेरिला । जेथे मेघनाद तेथे आला ।
राक्षसपुत्र देखोनि प्रवर्तला । राजपुत्रासीं समरांगणीं ॥११॥
एकावरी एक वर्षती बाण । एकावरी एक शस्त्रे सोडिती दारूण ।
एकाचे एक निवारोनि पूर्ण । पुनरपि संधान पै करिती ॥१२॥
शक्रपुत्राचें सुटतां बाणजाळ । भेदलें समग्र राक्षसदल ।
कित्येक खोंचले बंबाळ । रक्ताचे पूर चालिले ॥१३॥
शक्रसुतें काय केले । सौन्य एकवटोनि आपुलें ।
अमोध खोचती बाहे रुधिर । जिकडे पळती रजनीचर ।
तिकडे अमरेंद्रपुत्र मारितसे ॥१६॥
मनोवेगोहूनि बहुत । इंद्रपुत्र फ़िरवी रथ ।
राक्षस भस्म करित । चौतालत दशदिशा ॥१७॥

पुलोमाने जयंताला पळविले :

सुरेंद्रपुत्रें आनेआन केले । शत्रुसैन्य पराभविलें ।
तदनंतर पुलोम दैत्यें वेळे । रणी धरिले इंद्रपुत्रा ॥१८॥
वेगी वाहोनि खांद्यावरी । अकस्मात निघाला सागरी ।
हेंदेखोनि उभयतां वीरी । थोर आश्चर्य पै केले ॥१९॥
तो आजा होय शक्रसुतासी । शचीचा पिता श्वशुर इंद्रासी ।
तेणे नेलें जयंतासी । देखोनि देव दुःखी झाले ॥२०॥
राजपुत्र धरोनि नेला । सुरसैन्या पळ सुटला ।
मेघनादें पाळतिया वीरांला । अति सुबद्ध गांजिलें ॥२१॥
देवसैन्य पुढे पळत । राक्षस मागे शस्त्रे मारित ।
पळत पुढे हाका देत । धांव धांव देवेंद्रा ॥२२॥
राक्षस विजयी जाहले । स्वपुत्रातें धरोनि नेलें ।
ऐसे देखोनि इंद्रा चढलें । कोपांचें भरिते अनिवार ॥२३॥

इंद्राचे युद्धार्थ आगमन :

सारथियासी म्हणे शचीपती । रथ आणीं गा शीघ्रगती ।
तंव मातलीने तेचि समयाप्रती । स्यंदन आणिला रत्‍नजडित ॥२४॥
रथी आरूढोनि इंद्र आपण । केले मेघासारिखें गर्जन ।
पुढे जाता अपशकून । अमरावतीस पै झाले ॥२५॥
वैरियावरील पवन । लागला वज्राऐसा कठिण ।
पुढे जाता रथाचे वारू मेटे वळून । भूमीलागून बैसले ॥२६॥
मनी शंकला अमरपती । पुढे चालिला शीघ्रगती ।
सवे आदित्यरुद्रवसुगण अमिती । शस्त्रे झळकतीं सतेज ॥२७॥
शस्त्रे झोडीत वज्रपाणी । प्रवेशला रणांगणी ।
तंव येरीकडे मेघनादजनक तेच क्षणी । रथावरी बैसला ॥२८॥

रावण व कुंभकर्णाकडून देवसैन्याचा संहार :

जया रथा निर्माण करिता । विश्वकर्मा जाण तत्वता ।
तयांची वर्णिता सुंदरता । तरी सुवर्णमय तो असे ॥२९॥
रथी राक्षसचूडामणी । परिवेष्टित पन्नगसैन्यीं ।
जयाचे गर्जने अवनी । उलंडों पाहे तळावरी ॥३०॥
दैत्यनिशाचरपरिवेष्टित । रथी आरुढोनि रणपंडित ।
आवेशें वैरियासमोर येत । जैसा भास्कर पूर्वदिशे ॥३१॥
मेघनादाहूनि मागिलेकडे । स्वये ठाण मांडोनि पुढे ।
धनुष्य़ा चढवोनियां मेढे । अनेक बाण टाकिले ॥३२॥
देव राक्षस परस्परीं । युद्ध करिती रणसागरी ।
शस्त्रे वर्षती जैसे अंबरीं । मेघ दाटले अकाळीचें ॥३३॥
तदनंतर कुंभकर्ण । दुरात्मा अति दुर्जन ।
नाना शस्त्रांचें प्रेरण । करिंता झाला कोणा न कळतां ॥३४॥
कुंभकर्णाचे घोर संधान । बाणॆं तोडिता झाला करचरण ।
कित्येक सुर निर्गतप्राणे । रणमंडळीं पडिले ॥३५॥

रुद्र व आदित्यांकडून राक्षसांची दाणादाण :

मग ते आदित्य निशाचर । कोपा चढले परस्पर ।
करिते झाले दुर्धर मार । एकमेकांची वर्मे लक्षोनी ॥३६॥
याउपरीं सुरवरी । राक्षसा केली घेघेमारी ।
पळतां न पळवे राक्षसवीरीं । धाके प्राण सांडिले ॥३७॥
कित्येक गतप्राण पडिले । कित्येकां सर्वांगी बाण लागले ।
कित्येक भूमीवरी केश मोकळे । लोळताती रणांगणी ॥३८॥
कित्येक धाके पळत । कित्येक योद्धे नव्हे म्हणत ।
कित्येक बोलती आम्ही मार्गस्थ । तीर्थयात्रें हिंडतो ॥३९॥
राक्षस रणी पडिले जाण । सहित वारू गजगण ।
शस्त्रे पोटी कवटाळून । बीभत्स वीर पडियेले ॥४०॥
बाबरझोंटी विशाळ मुख । दंत दाढा विक्राळ देख ।
हात पाय पसरोनि संमुख । रणांगणी पडियेले ॥४१॥
अमरगणा जय पावले । निशाचर रणी भंगले ।
हे देखोनि दशग्रीवा भरले । कोपाचें अति भरिते ॥४२॥
आपुले राक्षस समरांगणीं । पडिले देखे प्रेत होवोनि ।
तयांच्या शोणिताचा पूर लोटोनि । दोही तीरीं वाहतसे ॥४३॥
रणी मिनले गीध घार । मांस भक्षिती तोडिती शरीर ।
मस्तकावरी खगवर । चंचूनें तोडिती नेत्रांतें ॥४४॥

इंद्र व रावणाचे तुंबळ युद्ध :

ऐसे रावणे देखोन । उरले सैन्यासी युद्ध दारुण ।
करिता झाला आपण । पाचारोण देवांते ॥४५॥
येरीकडे अमरपती । उत्तम धनुष्य घेवोनि हाती ।
ओढिता नादे त्रिजगती । पालथी होऊं शके क्षणमात्रें ॥४६॥
शक्रे धनुष्य़ीं चढविला गुण । अग्निवर्ण हेमपुंख बाण ।
टाकिला रावणाच्या मस्तकी जाण । तो भूमीलागोन पडियेला ॥४७॥
तदनंतरे लंकापती । जयाच्या बळाची त्रिजगी कीर्ती ।
तो धनुष्य़ीं बाण लावी शीघ्रगती । शक्रधनुष्य धेदिलें ॥४८॥
इंद्राच्या रथावरी अमित बाण । सोडिता झाला दशानन ।
तेणे अंधार पडिला जाण । शक्रा काही न कळेचि ॥४९॥
शक्ररावणांचे युद्ध । घोरांदर होईल प्रसिद्ध ।
एका जनार्दनी प्रबोध । परमानंद प्रकटेल ॥५०॥
रणी राक्षसांची मुक्ती । अनेकां करी देतो रघुपती ।
दीनजन उद्धरावया काकुळती । अवतार धरी श्रीराम ॥५१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
इंद्ररावणयुद्धप्रारंभोनाम द्वात्रिंशोऽध्यायः ॥३२॥ ओव्या ॥५१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग