भावे गावे गीत । शुद्
2335.
भावे गावे गीत । शुद्ध करूनिया चित्त ॥१॥
तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥धृपद॥
आणिकाचे कानी । गुण दोष मना नाणी ॥२॥
मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ॥३॥
वेची ते वचन । जेणे राहे समाधान ॥४॥
तुका म्हणे फार । थोडा तरी पर उपकार ॥५॥
अर्थ :
चित्त शुद्ध करून भक्तीभावाने हरीचे गीत गावे. जर तुला देव हवा असेल तर त्याच्या प्राप्तीसाठी हा सुलभ उपाय आहे. इतर लोकांचे गुणदोष कानावर तर काय मनात देखील येऊ देऊ नकोस. संतांच्या चरणावर मस्तक वाकून ठेव. नेहमी असे बोलत जावे की ज्यामुळे सर्वांना समाधान प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात थोडा, फार तरी परोपकार करत जा हे सर्व उपाय मी देवाच्या प्राप्ती करता सांगितले आहेत.
