वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

वैकुंठ दुभते नंदाघरी

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090153 · अभंग क्र. ८८

88.
वैकुंठ दुभते नंदाघरी माये । ते पुण्य पान्हा ये यशोदेसी ॥१॥
ते रुप रुपस कांसवी प्रकाश । योगीजनमानस निवताती ॥२॥
सुंदर सुनीळ राजस गोपाळ । भक्तीसी दयाळ एक्या नामे ॥३॥
निवृत्ति गयनी मन ते चरणी । अखंडता ध्यानी तल्लीनता ॥४॥

अर्थ:
तो परमात्मा कृष्ण रुपात वैकुंठातील कामधेनु बनुन नंदा घरी आले आहे. व यशोदेसही त्याला पाहुन प्रेमपान्हा दाटुन येतो व ती सतत तो कृष्णाला देत आहे. ज्या प्रमाणे कांसवी आपल्या पिल्लांना दृष्टिक्षेपाने वाढवते तसा श्रीकृष्ण योगीजनांना म्हणजे भक्तांना कृपादृष्टी देत असतो. नुसत्या त्याच्या नामाच्या उच्चाराने तो सुंदर, सुनीळ, सुकुमार परमात्मा तो भक्तांवर दया करतो. निवृत्तिनाथ म्हणतात, मी गहिनीनाथांच्या चरण व मार्गावर लक्ष केंद्रित केल्याने मी सतत त्याच्या नामात तल्लीन असतो.
गोकुळी वैकुंठ वसे गोपाळा माजी अभंग क्र. 89
गोकुळी वैकुंठ वसे गोपाळा माजी । सौरसे अभक्ता न दिसे काय करु ॥
पूर्व पुण्य चोखडे ब्रह्मांड कोडे । तो यशोदेकडे शोभे कैसा ॥
वसुदेव आपण देवकीये समीप । वैकुंठीचे दीप लाडे कोडे ॥
उग्रसेन संप्रधार केला राज्यधर । यादव परिवार रामकृष्ण ॥
द्वारकानाथ हरि सोळासहस्त्र नारी । बळिराम परिवार हरि माझा ॥
निवृत्ति जीवन ध्यान एक रामकृष्ण । उच्चारणी कोटी यज्ञ होती नामे ॥

अर्थ:
भक्तीहीन मनुष्याला गोकुळात तो गोपाळ बनुन राहतो हे कळत नाही. त्याची योग्यता ही दिसत नाही. चोख पूर्व पुण्यामुळे त्याने बनवलेल्या ब्रह्मांडाचे कोडे सुटते. व तोच परमात्मा यशोदेच्या कडेवर शोभुन दिसतो. तो वैकुंठदिप परमात्मा मोठ्या लाडाकोडाने देवकी वसुदेवाजवळ जन्माला आला.त्याच परमात्माने संपूर्ण यादवामधुन संयत व संयमी असलेल्या उग्रसेनाला राज्यावर बसवले. बळिरामाचा लहान भाऊ असुन ही द्वारकानाथ म्हणणाऱ्या परमात्म्याने कैदेतुन सोडवल्या सोळा सहस्त्र स्त्रीयांचा उध्दार केला.निवृत्तिनाथ म्हणतात, अश्या परमात्माच्या रामकृष्ण नामउच्चारणा मुळे कोटी यज्ञांचे फळ मिळते.
सर्व स्वरुप नाम राम सर्व घनःश्याम अभंग क्र. 90
सर्व स्वरुप नाम राम सर्व घनःश्याम । तो गोकुळी आत्माराम दुध मागे ॥
भाग्येविण दुभते दैव उघडते । नंदाघरी आवडते हरि खेळे ॥
मंजुळ वेणुवाये लुब्धत्या घेनुवा । नंदाघरी दुहावा पूर्ण वाहे ॥
घरोघरी दुभते गौळिया परिपूर्ण । यशोदा ते आपण गोरस घुसळी ॥
गोपाळ हरिखु नंदा यशोदे देख । गौळिया कौतुक करिती हरि ॥
निवृत्ति गयनी देव उपदेशिला सर्व । गोरक्ष गुह्य भाव सांगति मज ॥

अर्थ:
सर्व नामरुपाने युक्त असणारा घनश्याम, गोकुळात दुध मागतो. त्या नंदाच्या भाग्यामुळे नवनिताचा दुभत्याचा सागर त्याला मिळाले ते भाग्य कृष्णरुपाने नानाविध खेळ खेऴते. त्या परमात्माच्या मुरलीचा धुनीवर सर्व गायी लुब्ध झाल्यामुळे नंदाघरी दुभत्याचा सुकाळ करत आहेत. व गौवळ्यांच्या घरी ह्या दुधाच्या सुकाळाने ते हरखुन गेले आहेत व यशोदे सह सर्व गौळणी दह्याची घुसळण करत असतात. नंद व यशोदा हे कृष्णरुपाने हरखुन गेले आहेत व ह्याचे आश्चर्य सर्व गोकुळाला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या उपदेशाने मला त्याचे गुह्यरुप दिसले व ते गुह्य मला गोरक्षानाथानी ते सोपे करुन सांगितले.
हे व्यापूनि निराळा भोगी वैकुंठ सोहळा अभंग क्र.91
हे व्यापूनि निराळा भोगी वैकुंठ सोहळा । नंदाघरी गोपाळा हरि माझा ॥
न साहे सगुण अवघाचि निर्गुण । तो कृष्ण आपण गोपाळवेषे ॥
गायी चारी हरि मोहरी खांद्यावरी । वेणु नाना परि वातु असे ॥
निवृत्ति गयनी कृपा जपतो अमुप जाण । सांगीतली खुण गोरक्षाने ॥

अर्थ:
वैकुंठात सुख भोगणारा हा परमात्मा सर्व जागा व्यापुन ही त्या पासुन निराळा आहे तोच परमात्मा गोपाळ बनुन नंदा घरी आला आहे. तो गोपाळ वेशातील कृष्ण जरी सगुण दिसत असला तरी तो कायम सगुण राहात नाही. आपले विहीत कार्य झाले की तो निर्गुणातच जातो. तो परमात्मा कृष्ण बनुन गायी चारताना खांद्यावर घोंगडी घेऊन वेणुतुन अनुहत नाद निर्माण करत आहे. त्या मुळे चराचर मोहरुन गेले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गोरक्षनाथानी गहिनीनाथाना जे गुह्य ज्ञान दिले ते मला ही गहिनीनाथांच्या कृपाप्रसादामुळे प्राप्त झाले आहे.
न साहे दुजेपण आपण आत्मखुण अभंग क्र.92
न साहे दुजेपण आपण आत्मखुण । श्रुतीही संपुर्ण हारपती ॥
वेदरुप श्रीकृष्ण योगिया जीवन । ते रुप परिपूर्ण आत्माराम ॥
न दिसे वैकुंठी योगिया ध्यानबीज । तो गोपाळांचे काज हरि करी ॥
निवृत्ति गयनी हरि उच्चारिता । माजि करि मनोरथ पुरी कामसिध्दी ॥

अर्थ:
श्रुतींची ताकत ज्या स्वरुपाचे वर्णन करताना हरपते ते परमात्म स्वरुप द्वेताला नाकारत एकत्वाने अद्वैत स्वरुपातच राहते. तो परिपूर्ण असणारा परमात्मा वेदांचे स्वरुप व योगियांचे निजध्यान आहे. जो परमात्मा वैकुंठात दिसत नाही. जो योगियांच्या ध्यानात ही सापडत नाही. तो गोकुळात गोपाळांची काम करत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या सह हरिनाम उच्चारल्यामुळे मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कार्य सिध्दी होते.
नाही हा आकार नाही हा विकार अभंग क्र.93
नाही हा आकार नाही हा विकार । चतुर्भुज कर हरि माझा ॥
हरिरुप पै जप हरिहररुप । गौळियांचे रुप सहज कृष्ण ॥
हरिरुप घरी सोळासहस्त्र नारी । तो बाळ ब्रह्मचारी गाई राखे ॥
निवृत्ति रोकडे ब्रह्म माजिवडे । तो य़शोदे पुढे लोणी मागे ॥

अर्थ:
तो चतुर्भुज परमात्मा जरी सगुण दिसत असला तरी त्याला रुप नाही व त्याच्यात दोषांचा लवलेश ही नाही. गोपाळांत असलेल्या कृष्णामध्ये हरि व हराचे एकत्व आहे. जो कृष्ण गायी चारताना दिसतो त्याला सोळा सहस्त्र बायका आहेत तरी तो परमात्मा ब्रह्मचारी आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, तेच सगुण सर्वव्यापक परब्रह्म यशोदेकडे लोणी मागत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग