काय माता विसरे बाळा
3342.
काय माता विसरे बाळा । कळवळा प्रीतीचा ॥१॥
आवडीने गळा मिठी । घाली उठी बैसवी ॥धृपद॥
लावू धावे मुख स्तना । नये मना निराळे ॥२॥
भावंडाचे भाते दावी । आपुले लावी त्यास जी ॥३॥
माझे थोडे त्याचे फार । उत्तर हे वाढवी ॥४॥
तुका म्हणे नारायणा । तुम्ही जाणा बुझावू ॥५॥
अर्थ :
माता आपल्या बाळाला कधी विसरते काय तर नाही कारण तिच्या अंत:करणामध्ये बाळाच्याविषयी कळवळा असतो. बाळ आईला आवडीने प्रेमाने गळयाला मिठी मारते आणि आपले हट्ट पूर्ण करण्यासाठी तिला सारखे बसवते उठवते. आवडीने व प्रेमाने आईच्या स्तनाला ते बाळ आपले मुख लावण्यासाठी धावते त्यावेळी त्याच्या मनामध्ये काहीच येत नाही. आईने दिलेला खाऊ ते बाळ भावंडाना दाखवते परंतू भावंडाचा खाऊ त्याला जर आवडला तर स्वत:ला दिलेला खाऊ ते बाळ भावंडांना देते आणि भावंडाचा खाऊ स्वत:ला घेते. ते बाळ म्हणते की मला दिलेला खाऊ थोडा आहे त्याला दिलेला खाऊ जास्त आहे व असे म्हणूनच भांडण करु लागते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी देखील तुमचे लहान बाळ आहे माझी समजूत काढण्याचे देखील तुम्हीच जाणता.
