तुझिया विनोदे आम्हास
2676.
तुझिया विनोदे आम्हासी मरण । सोसियेला शीण बहु फेरे ॥१॥
आता आपणचि येसी ते करीन । नाम हे धरीन तुझे कंठी ॥धृपद॥
वियोगेचि आलो उसंतीत वने । संकल्प हे मने वाहोनिया ॥२॥
तुका म्हणे वर्म सापडले सोपे । गोवियेलो पापे पुण्ये होतो ॥३॥
अर्थ :
देवा अरे तू या सृष्टीची निर्मिती केली पण तुझ्या या विनोदाने आम्हाला किती त्रास होतो आम्ही आजपर्यंत खूप जन्ममरणाचे त्रास सोसले आहेत व खूप कष्टही त्यामुळे आम्हाला झाले आहेत. देवा मी आता असा उपाय करीन की जेणेकरुन तूच आपणहून माझ्याकडे येशील तो उपाय म्हणजे मी तुझे नाम माझ्या कंठात धारण करीन. देवा मी तुझ्या वियोगाने अनेक योनीमध्ये विविध प्रकारचे संकल्प वाहून अनेक योनीरुप वने भटकत मनुष्य देहापर्यंत आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला तुझ्या प्राप्तीचे सोपे वर्म सापडले आहे ते म्हणजे तुझे नाम कंठात धारण करणे आणि इतके दिवस मी पाप पुण्याच्या गुंताडयात गुंतलो गेलो होतो.
