वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १३, मदालसा अभंग ८४२ ते ८४७

उपदेश मदालसा देहो नि

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074214 · अभंग क्र. ८४५

845.
उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा ।
आलासी कवण्या वाटा मातेचिया गर्भवासा ।
जो पंथ वोखटा रे पचलासी कर्मकोठा ।
अविचार बुद्धि तुझी पुत्रराया अदटा ॥१॥
पये दे मदालसा सोहं जो जो रे बाळा ।
निजध्यानी निजग रे लक्ष लागो दे डोळा ।
निज ते तू विसरलासी होसी वरपडा काळा ॥२॥
नवमास कष्टलासी दहाव्याने प्रसूत जाली ।
येतांचि कर्मजाड तुझी मान अडकली ।
आकांतु ते जननीये दुःखे धाय मोकली ।
स्मरे त्या हरिहरा ध्यायी कृष्णमाऊली ॥३॥
उपजोनी दुर्लभु रे मायबापा जालासी ।
वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी ।
माझे माझे म्हणोनिया झणी वाया भुलसी ।
होणार जाणार रे जाण नको गुंफो भवपाशी ॥४॥
हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा ।
वरि चर्म घातले रे कर्मकीटकांचा सांदा ।
रवरव दुर्गधीरे अमंगळ तिचा बांधा ।
स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा ॥५॥
या देहाचा भरंवसा पुत्रा न धरावा ऐसा ।
माझे माझे म्हणोनिया बहु दुःखाचा वळसा ।
बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा ।
तृष्णा सांडूनिया योगी गेले वनवासा ॥६॥
या पोटाकारणे रे काय न करिजे एक ।
यालागी सोय धरी रे तिही भुलविले लोक ।
ठाईचे नेमियेले त्याचे आयुष्य भविष्य ।
लल्लाटी ब्रह्मरेखा नेणती ते ब्रह्मादिक ॥७॥
जळींची जळचरे रे जळीचिया रमती ।
भुलली ती बापुडी रे ते काही नेणती ।
जव नाही पुरली त्याची आयुष्यप्राप्ती ।
वरी घालुनी भोवराजाळ बापा तयाते गिवसिती ॥८॥
पक्षिणी पक्षीया रे निरंजनी ये वनी ।
पिलिया कारणे रे गेली चारया दोन्ही ।
अवचिती सापडली पारधिया लागुनी ।
गुंतुनी या मोहोपाशी प्राण त्यजिती दोन्ही ॥९॥
मृग हा चारिया रे अतिमाने सोकला ।
अविचार बुद्धि त्याची परतोनी मागुता आला ।
तव त्या पारधियाने गुणी बाणु लाविला ।
आशा रे त्यजूनिया थिता प्राण मुकला ॥१०॥
अठराभार वनस्पती फुली फळी वोळती ।
बावित्या पोखरणी नदी गंगा वाहती ।
ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती ।
हे सुख सांडूनिया कासया योग सेविती ॥११॥
हे सुख सांडूनिया कोण फळ तयासी ।
कपाट लंघूनिया योगी ध्याती कवणासी ।
योग तो सांग मज कवण ध्यान मानसी ।
सर्वत्र गोविंदु रे हृदयी ध्याई हृषिकेशी ॥१२॥
इतुकिया उपरी रे पुत्रा घेई उपदेशु ।
नको भुलो येणे भ्रमे जिवित्वाचा होईल नाशु ।
क्षीरा निरा पारखी रे परमात्मा राजहंसु ।
निर्गुण निर्विकार पुत्रा सेवी ब्रह्मरसु ॥१३॥
इतुकिया उपरी रे पुत्र माते विनविता जाला ।
संसारसोहळा हा थोरा कष्टी जोडला ।
पंचभूते निवती येथे म्हणोनि विश्रामु केला ।
वोखटा गर्भवासु कवणा कार्या रचिला ॥१४॥
गर्भाची यातना रे पुत्रा ऐके आपल्या कांनी ।
येता जाता येणे पंथे सांगाती नाही रे कोण्ही ।
अहंभावो प्रपंचु पुत्रा सांडी रे दोन्ही ।
चौऱ्यांशी जीवयोनी प्रवर्तले मुनिजन तत्क्षणी ॥१५॥
वाहता महापुरी रे पुत्रा काढिले तुज ।
रक्षिलासी प्रसिद्ध सापडले ब्रह्मबीज ।
मग तुज वोळखी नाही का रे नेणसी निज ।
आपेंआप सद्गुरु कृपा करील सहज ॥१६॥
उपजत रंगणा रे पुत्रा तुवा जावे वना ।
बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीच्या खुणा ।
प्राणासी भय नाही तापत्रयाचा राणा ।
मग तुज सौरसू पाहा रे परब्रह्मींच्या खुणा ॥१७॥
बैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होई मनी ।
चेतवी तू आपणापे चेतविते कुंडलिनी ।
चालता पश्चिमपंथे जाई चक्र भेदुनी ।
सतरावी जिवनकळा पाहे आत्मा हा चिंतुनी ॥१८॥
मग तू देखसी त्रिभुवन स्वर्ग मृत्यु पाताळ ।
नको भुलो येणे भ्रमे सांडी विषयपाल्हाळ ।
आपणापे देखपारे स्वरुप नाही वेगळे ।
परमात्मा व्यापकु रे पाहा परब्रह्म सांवळे ॥१९॥
इतुकिया उपरी रे पुत्रा ते विनवी जननी ।
परियेसि माउलीये संतोषलो तत्क्षणी ।
इंद्रायणी महातटी विलासलो श्रीगुरुचरणी ।
बोलियेले ज्ञानदेवो संतोषलो वो मनी ॥२०॥

अर्थ :
मदालसा आपल्या मुलाला उपदेश करते की हे पुत्रा तुझा देह कसा उत्पन्न केला. तू कोणत्या वाटेने मातेच्या गर्भावासांत आला. हे पराक्रमी राजाच्या मुला तू विचारशून्य बुद्धीने ज्या कर्म मार्गाचा अवलंब केलास तो वाईट मार्ग आहे. बाळा तुझी आई मदालसा तुला झोकेरूपी उपदेश देत आहे की तू आपल्या स्वात्मस्वरूपाला विसरलास. म्हणून मृत्यूच्या जबड्यांत पडलास. म्हणून तुझे लक्ष आत्मस्वरूपांकडे असू दे. व अनात्मवस्तुबद्दल झोप घे. नऊ महिने गर्भवासाचे कष्ट सोसून दहाव्या महिन्यांत प्रसुतीच्या वेळी तुझे दुःख देणारे प्रारब्धकर्म असल्यामुळे योनीचे संकुचित भागांत तुझी मान अडकली. त्यामुळे तुझ्या आईला त्रास होऊन ती आक्रोश करू लागली. असे दुःखप्रसंग येऊ नये म्हणून त्या हरिहरांचे स्मरण कर व कृष्णमाऊलीचे ध्यान कर. जन्मल्यानंतर आईबापांनी मोठ्या कष्टाने व पुढील आशेने तुझे पालनपोषण केले. व हा आपल्याला लाभतो की नाही अशा चिंतेत असताना तूही त्यांचे ठिकाणी ही माझी आहेत असे कदाचित म्हणशिल पण लक्षात ठेव ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू हा ठेवलेलाच आहे. म्हणून या संसारपाशांत तू अटकू नको. देहाची स्थिति पहा हा नाशिवंत असून या दुर्गधियुक्त मलमूत्र असून वर चामडे घातलेला अपवित्र वस्तुंचा बनलेला आहे. अशा कुत्सित शरीरास पुन्हा यावयाचे नसेल तर हरिहराचे स्मरण करून गोविंदाला शरण जा. हा देह माझा आहे. असा विश्वास धरू नये. कारण या देहांत जे माझे माझे म्हणतात त्यांना जन्ममरणदुःखाचे वळसे भोगावे लागतात. या आशारूपी मृगजळाच्या मागे लागून पुष्कळ लोक फसले. म्हणूनच योग्यांनी आशेचा त्याग करून वनवास पत्करला. आपला योगक्षेम पुढे नीट चालावा म्हणून मुलाची आशा धरतात. परंतु शेवटी तेही फसतात. कारण प्रत्येक जीवास मिळणारे सुखदुःखाचे भोग व आयुष्य हे सर्व ठरलेले असते. पण ती लल्लाट रेषा सहसा ब्रह्मादिकालाही कळत नाही. याला दृष्टांत पाण्यांमध्ये राहणारे मांसे आपल्या सख्या सोयऱ्याबरोबर रमतात. पण त्या बिचाऱ्यांना कोळी येऊन त्यांने जाळे टाकले आहे व आपण त्यात सापडलो आहो. असे कळत नाही. किवा पक्षिणी व पक्षी आपल्या पिलावरील प्रेमाने चारा आणण्यांकरीता घोर आरण्यांत जातात व तेथे पारध्यांच्या फाशांत सांपडून प्राणास मुकतात. किंवा आपले जीवन चालावे म्हणून एका ठिकाणी पुष्कळ चारा पाहून मृग तेथे गेला पण पुन्हा जर आपण तेथे येऊ तर पारधी मला मारील अशा तहेची विचार बुद्धी त्याजजवळ नसल्याने मृग पुन्हा तेथे गेला. इतक्यांत पारध्याने धनुष्याला बाण लावला, बिचाऱ्या मृगाला जिवंत राहाण्यांची आशा सोडून प्राणास मुकावे लागले. पुत्र विचारतो, आपल्याघरी सर्व तऱ्हेची फुले, फळे, वनस्पती, विहीरी, तलाव, नद्या असून तसेच घरांत कुल स्त्रिया सर्व संपत्तियुक्त असे राज्य असून हे सर्व विषयसुख टांकून देऊन काही लोक योग का करतात? हे सुख सोडण्यांत त्यांना फल काय आहे. ? योग म्हणजे काय? व ते मनांत कोणाचे ध्यान करतात? मदालसा म्हणाली सर्व ठिकाणी जो गोविंद त्यात हृषिकेशाचे तू त्याचे यांमध्ये ध्यान कर. विषयसुखाला भुलू नको. भूललास तर तुझ्या जीवात्म्याचा नाश होईल. म्हणजे जन्ममरण भोगांवे लागेल. ज्याप्रमाणे राजहंस दूध व पाणी भिन्न करून दधाचे सेवन करतो. त्याप्रमाणे सत्य काय व असत्य काय याचा विचार करून. ब्रह्मरसरूपी निर्गुण निर्विकार जो परमात्मा तोच सत्य आहे. म्हणून त्याचेच सेवन कर. यावर पुत्र विचारतो. पंचमहाभूतापासून उत्पन्न होणारा संसार थोरांना ही दुःख देणारा तसेच अत्यंत कष्ट देणारा गर्भवास कशा करिता उत्पन्न केला. गर्भवासाचे कष्ट आपल्या कानांनी नीट ऐक. या गर्भवासात येताना किंवा मेल्यानंतर बरोबर काहीही येत नाही. या संसारातील चौयांशी लक्षयोनी पाहून विचारवंत पुरूष ताबडतोब संसार विमुख झाले म्हणून शरीराच्या टिकाणी अहंभाव व इतर पदार्थाच्या ठिकाणी ममभाव या दोन प्रकारचा प्रपंच सोड.. मायानदीच्या महापुरातून तुला काढून जगत कारण श्रुतीसिद्ध ब्रह्म दाखविले पण ते आत्मत्वाने जाणण्याकरिता सद्गुरु कृपा संपादन कर. म्हणजे ते तुला आत्मत्वाने सहजच समजेल. एवढ्याकरिता तू वनांत जाऊन पवित्र ठिकाणी आसनांवर बसून मोक्षसुखाचा अनुभव घे. तुझ्याठिकाणी पुष्कळ तापत्रय असले तरी त्याठिकाणी तुझ्या प्राणास भिती नाही. अशा रितीने ब्रह्मसुखाची गोडी पहा. मन अत्यंत दृढ करून आसनावर बस व आपल्या ठिकाणी असणारी कुंडलीनी जागृत करून पश्चिम मागनि षड्चक्रे भेदून सतरावी जीवनकलाच आत्मा आहे. असा अनुभव घे. परमात्मा व्यापक असल्याने तुझ्या स्वरूपांतच तुला स्वर्ग, मृत्यु पाताळ सर्व त्रिभुवन दिसेल. आभास मात्र सुख देणारे विषयांना तू न भुलता त्यांचा त्याग करव सुखरूप ब्रह्माचे ध्यान करून घे. यावर पुत्र म्हणाला माते तुझ्या उपदेशाने मी कृतार्थ झालो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मीही इंद्रायणी तटी राहणारे श्रीगुरू निवृत्तिनाथ त्यांचे उपदेशाने कृतार्थ झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग