वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १३, मदालसा अभंग ८४२ ते ८४७

उपदेश ब्रह्मज्ञान पु

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074210 · अभंग क्र. ८४४

844.
उपदेश ब्रह्मज्ञान पुत्रा ऐक रे बीज ।
सांडी सांडी मायामोहो मुक्त विचरे रे सहज ।
आशा मनसा गुंफो नको सोहं धरी का रे नीज ।
अखंड गुरूचरणी मौन्य धरी का रे काज ॥१॥
उपदेश मदालसा निजका रे आधी ।
पूर्णबोधे उमजे रे हेचि साधी समाधी ।
लटिका हा मायामोह लक्ष लावी गोविंदी ।
सांडी मांडी कोहंवेगी लीन होई परमानंदी ।
जे जो जे जो जे जो बाळा ॥२॥
चौऱ्यांशी लक्ष जीव जन शिणले योगी येता जाता ।
विरळा देखो परतला जो पारूषला पूर्णता ।
मनबुद्धि एकचित्ते दृढधरी अनंता ।
उपरती चित्ते करी सावध होई त्वरिता ॥३॥
जन्म मे दुर्लभ जाणा मनुष्यजन्म अगाध ।
ज्ञानध्यान बुझिजे आधी वरी गुरूचा प्रबोध ।
तरीच साधेल तुज नाही तरी होसी मूढ अंध ।
नेमिले आयुष्य वेचे कोण तोडी भवबंधकंद ॥४॥
नवमास होतासी गर्भी अधोवदने दुःखित ।
तै होता उमज तुज का रे येथे निश्चित ।
परतोनी पाहे वेगी मनी धरी अच्युत ।
तुटेल योनिपंथू मग तू सर्वातीत ॥५॥
जंववरी माझे माझे मन न संडी तुझे ।
तंववरी मोहोपाश व्यर्थ धरणिये ओझे ।
विष्ठामूत्र जंतगर्भी म्या वाहिले तुझे ओझे ॥६॥
उठी पुत्रा सावध होई मी माझे सांडी धरी ।
कोशकीटके जन्मलासी तैसे तू बा न करी ।
आपण्या आपण होसी तुझा तूचि रे वैरी ।
जव नाही आले काळचक्र वेगी स्मरे मुरारी ॥७॥
इंद्रिये सावध अहाती तव करी धांवा धांवी ।
मग विस्मृति पडेल बुद्धि मग न साधे हरि गोसावी ।
सर्वघटी हरि ध्याय मनचक्षु एक भावी ।
नारायण नामपाठ वेदशास्त्र अनुभवी ॥८॥
दिननिशी शरीर तुझे बाळतरुणवृद्ध होय ।
काया हे नव्हे तुझी सांडी सांडी ममता माया ।
निर्गुणरुप हरिहरू त्यासी तू शरण जाय ।
सगुणी झोबो नको हरिरूपी तल्लीन राहे ॥९॥
मृगजळ मायापूर व्यर्थ इंद्रियांची झोंबी ।
कामना लपवी आधी लय लावी हरीच्या बिंबी ।
चक्षे पक्षे मन गोंवी बिरडे घाली निरालंबी ।
शुद्धबुद्ध तत्त्व हरि एकतत्त्व नितंबी ॥१०॥
गुरुगम्य आगमाचे हेचि तत्त्व उत्तम ।
सत्त्व रजतमी गुंफो नको मा मार्ग धरी उपम ।
प्राण लपवी प्राणामाजी वासना करी नि:काम ॥११॥
हेचि साधन योगियांचे शिवाचे मनोगत ।
उठोनिया प्रातःकाळी तनुमनध्यान नित्य ।
जागरणी हरिकीर्तना उद्धारसी त्वरित ।
नाशिवंत शरीर जाण मग तुज न घडे हित ॥१२॥
क्षणा एका शरीर नासे हे तुझे तुज न कळे ।
अवचिता येईल काळ झांकतील देखणे डोळे ।
मग हे नाठवे तुज करी गुरुमेळी निर्मळ ।
सांडी मांडी करू नको टाकी टाकी मनींचे सकळ ॥१३॥
व्यर्थ रे राहासी येथे पडशील मोहोफांसा ।
दशदिशा हरि आहे अर्ध उर्ध्व महेशा ।
मही हे अंथरुण आकाश करी अवकाशा ।
या परी विचरे रे राहावे प्रमाण सरिसा ॥१४॥
तत्त्व हे एकरुप हरिवीण नाही कोठे ।
द्वैतभाव न धरी मनी नीट जाय वैकुंठे ।
हा मार्ग योगियांचा संत गेले नीट वाटे ।
अभक्त गुंफले येथे तेही पडिले आड वाटे ॥१५॥
सनकादिका पंथ हाचि सेविला उपजता ।
नारदे विचार केला मग न राहे तो निवांता ।
गोरक्ष बुझला वेगी दृढ कांस हनुमंता ।
अवधूत याचि परी दत्तामाजी पूर्णता ॥१६॥
उन्मनि साधी बाळा रुप न्याहाळी नयनी ।
नासिकी ठेउनी दृष्टि खेंचरी मुद्रा निर्वाणी ।
शरीर हे असो जावो याची न करी तू करणी ।
रामकृष्ण वाचा पाठ हेचि धरी निर्वाणी ॥१७॥
अष्टदळ हृदयी आहे तोचि आत्मा ये करी ।
मन बुद्धि वित्त चित्त दिसो नेदी बाहेरी ।
मातापिता प्राण तुझे तो दाखवील शरीरी ।
स्त्रीपुत्र इंद्रियद्वारा सांडी परती माघारी ॥१८॥
मन हे कोंडी पिंडी तंतू तुटो नेदी याचा ।
मार्ग हे जिव्हे पारुष रे हरि रामकृष्ण वाचा ।
रिकामा क्षणभरी पंथ धरी प्रेमाचा ।
आदि मध्य हरि एकु तोचि ध्यायी हृदयींचा ॥१९॥
श्रवण स्मरण करी काळ घाली आंकणा ।
भीष्मे साधिले हरि तो पावला नारायणा ।
लक्ष्मणे धरिली बुद्धि वोळगिला रामराणा ।
निमिष एक न भरता शरीर सांडिले प्राणा ॥२०॥
हित तेचि करी बाळा हरिप्रेमे मन करी ।
सावधान चित्त आहे तव हे सर्व दृढ निवारी ।
भुली पडेल अंती तुज मग नाही कैवारी ।
ममतेचे बिरडे फेडी उठे चाले योगरीती ॥२१॥
म्हणे माते परियेसी कैंसे उपदेशिले ज्ञान ।
गुरु हा कोण करु अवघे दिसे विज्ञान ।
मज याचे स्मरण झाले सोहं होते मज ध्यान ।
कोह हे विसरलो जाले संसार मौन्य ॥२२॥
परतले प्रेमभाव उद्बोध आला धांवया ।
कळिकाळ न दिसे दृष्टि पापपुण्य रहावया ।
सभराभरित हरि दिसे माझे कैंचे उरावया ।
तू तव विदेही माया मदालसा मज राखावया ॥२३॥
मदालसा म्हणे पुत्रा जो उपदेश करुणा ।
ब्रह्म हे जीवी शीवी भोगी योनी नारायणा ।
शांति क्षमा बाणली तुज कैचे उमटले गुज ॥२४॥
हे स्थिति बाणली ज्यासी तो मी परिपूर्ण योगी ।
दया मुक्ति जाली दासी नित्य उन्मनी भोग भोगी ।
त्याचिया दर्शने जीव तरतील वेगी ।
उठी पुत्रा जाय पंथे जेथे सत्रावी उगी ॥२५॥
मुक्ता मुक्त अभयदान मुक्त झाला अनुभवी ।
राहिली निरालंबी रातलासे सतरावी ।
मुक्ताई मुक्तज्ञाने मदालसा नावांनांवी ।
मुक्तलग उपदेश चांगया दिधला पाही ॥२६॥

अर्थ :
बाळा, ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाचे वर्म ऐक मायामोह यांचा त्याग करुन तो परमात्मा मी आहे या ज्ञानाने मुक्त होऊन, सहज वृत्तिने च राहा. आशा तृष्णादिक सोडून संसारा विषयी मौन धरुन नेहमी गुरुचरणी राहा. मदालसा उपदेश करते बाळा स्वतःचे ब्रह्मरुपाने ज्ञान करुन घेणे हाच समाधी सिद्ध कर हा मायामोह खोटा आहे. म्हणून मोह टांकून गोविंदाच्या ठिकाणी लक्ष्य लावून व कोऽहंचा त्याग करुन परमानंदरुप होऊन तेथेच विश्रांती घे. जन्ममरणाच्या फेऱ्यांत सापडून दुःख भोगणारे पुष्कळ आहेत. पण त्यातून पूर्णतेने सुटलेला क्वचितच विरळा म्हणून वैराग्याने व एकाग्र चित्ताने ताबडतोब परमात्म चिंतनाला लाग. एकंदर जन्मामध्ये मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ, ज्ञान काय ? ध्यान कोणाचे करावे? हे जाणून गुरुचा अनुग्रह होईल तर ठिक नाही तर मूर्ख ज्ञानशून्य अशा स्थितीत आयुष्य निघून गेले तर हे अज्ञान कोण निवृत्त करणार? तू नऊ महिनेपर्यंत गर्भात खाली तोंड करुन दुःखांत होतास त्यावेळी तुला ज्ञान होते. मग येथे स्वस्थ का बसलास? संसाराकडे पाठ करुन भगवंताचे स्मरण कर म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटून परमात्मरुप होशील. जोपर्यंत हे माझे, ते माझे, असा व्यवहार मनापासून सुटत नाही. तोपर्यंत मोहपाश आहेच व तुझे अस्तित्व हा भूमिला फुकट भार असून विष्ठा, मूत्र, जंताने युक्त असलेल्या गर्भामध्ये मीही नऊ महिने तुझे फुकट ओझे वाहिले. असे मला दुःख होईल म्हणून सावध हो. व मी माझे टाकून दे. किडे, जंतू जसे फुकट जन्मून मरतात. तसे तू करु नको. हा उपदेश न ऐकशील तर तुझा तूंच शत्रू होशील. म्हणून तुझ्यावर यमाचा फेरा आला नाही तोच मुरारीचे स्मरण कर. इंद्रिये कार्यक्षम आहेत. तोच परमार्थ साधून घे. नाही तर वृद्धपणी बुद्धीला भ्रम होईल. मग परमात्मप्राप्ती होणार नाही. मनाला डोळ्याला हरि हाच विषय ठेवून सर्वत्र हरिच आहे, असा नारायणनाम पाठ हा वेदशास्त्राचा अनुभव घे. दिवसेंदिवस तूझे शरीर पुढचे अवस्थेत जात आहे. इतर पदार्थ तर राहू द्या. पण हे शरीरही तुझे नाही तेव्हा याबद्दल ममत्व बुद्धि टांक. सगुणांच्या ठिकाणी खटपट न करता निर्गुण जे हरिचे स्वरुप त्यात तू तल्लीन हो. मृगजळाप्रमाणे असणाऱ्या संसारांत ज्यामुळे इंद्रियांच्या खटपटी चालल्या आहेत ती इच्छाच हरि स्वरुपांकडे लाव. चक्षुरादि सर्व इंद्रियांना कोठून नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त अशा एका परमात्म्याचाच आश्रय कर. सत्त्व, रज, तम गुणांत न राहता प्राणायामाचे योगाने वासनाक्षय करुन सांगितलेल्या मार्गाचा आश्रय करावा. हेच गुरूंच्या उपदेशाचे व वेदाचे उत्तम सार आहे. शरीर नाशिवंत असल्यामुळे प्रातःकाळी उठल्याबरोबर परमात्म्याचे ध्यान करावे. हेच योगाचे साधन असून शीवसूत्रात हेच सांगितले आहे. तसे केले नाहीतर तुझे कल्याण होणार नाही. शरीराचा नाश केंव्हा होईल. ते तुझे तुलाही कळत नाही. मृत्यु केव्हा येऊन झडप घालील व हे तुझे उत्तम डोळे केव्हा मिटतील याचा भरवंसा नसल्यामुळे आज करु. उद्या करु असे न म्हणता अगोदर अंतःकरण शुद्ध करुन गुरुमुखाने स्पष्ट ज्ञान करुन संसारांत राहिलास तर फुकट मोहपाशांत पडशील, पृथ्वी हेच अंथरुण, परमात्मा हे राहावयांचे ठिकाण यारितीने वेदाज्ञेप्रमाणे दाहिदिशेत हरिच व्याप्त आहे असे समज. द्वैतभावरहित एकच परमतत्त्व आहे त्यांचे ज्ञान संपादन करुन सरळ मोक्षाचा मार्ग आक्रमण कर याचमार्गाने योगी संत गेले आहेत. याचे अवलंबन न करणारे संसारांत अडकून भलत्याच वाटेला लागले. सनकादिक ऋषिनी जन्मताक्षणी हाच मार्ग स्वीकारला. नारदादिही विचार करुन याच खटपटीला लागले. यांचज्ञानाने गोरक्षनाथ समाधान पावले. मारुतीनेही रामसेवेकरिता कांस बांधली. अवधूतही या ज्ञानाने पूर्ण दत्तरुप झाला. म्हणून शरीराची काळजी न करता नित्यनामस्मरण ठेऊन, आसनावर बसून नाकांच्या शेंड्यावर दृष्टि ठेवून, खेचरी मुद्रा करुन, व परमात्मस्वरुपाचा साक्षात्कार करुन ज्ञानावस्था प्राप्त करुन घे. स्त्री, पुत्र, विषय यांचा संग टांक आई बाप हे तुझे जिवलग खरे. पण ते पुन्हा शरीरांतच घालतील. म्हणून मन, बुद्धि, चित्त यांना बाहेरचे विषय न दाविता हृदयांत अष्टदल कमलाचे ठिकाणी, आत्मा आहे. तो स्वाधीन करुन घे. जिभेचे दुसरे सर्व विषय सोडून क्षणही फुकट जाऊ न देता प्रेमाने नामस्मरण कर व मनाने परमात्मचिंतनाचा धागा तुटू न देता त्याला शरीरांचे आत कोंडुन ठेव सर्वत्र व हृदयांत असणाऱ्या हरीचे ध्यान कर. एका क्षणांत प्राण शरीरांतून निघून जाईल. म्हणून प्रत्येक क्षणी वेदांत श्रवण किंवा नामस्मरण कर. कारण मृत्यु केव्हा घाला घालील यांचा नेम नाही. असे भीष्माने केले. व तो नारायणस्वरुप झाला. लक्ष्मणालाही याच ज्ञानांने रामराजे प्राप्त झाले. जोपर्यंत तुझी बुद्धी चांगली आहे तोच या दिसणाऱ्या संसाराचे निर्मूलन कर. नाही तर मरणकाली बुद्धि भ्रष्ट झाल्यांवर यातूंन कोणीही सोडविणार नाही. याकरिता ममत्वरूप बिरडे सोडून योगमार्गाला लाग. मुलगा म्हणतो आई ! धन्य आहे तुझ्या उपदेशरुप ज्ञानाची, मी 'कोऽहं' हे विसरलो. संसार कुठे गेला याचा पत्ताच नाही. आता गुरू कोणाला करु? बोध झाल्याने अनात्मवासना निवृत्त झाली. सर्वत्र हरिच असल्याने मृत्यु दिसत नाही. पापपुण्य यांना राहावयास ठिकाणच नाही. तूही परमात्मरुप झालीस. मदालसा तू तर मायिक असल्याने मला राहावयास ठिकाणच नाही. मदालसा म्हणते बाळा हा गुह्य उपदेश तुझ्याठिकाणी कसा उमटला शांति, क्षमा या मूर्तिमंत तुझ्या ठिकाणी दिसतात. अरे ! एकच ब्रह्म पण जन्ममरण भोगिल तर जीव, व नारायणरुप होईल तर शीव म्हणतात. स्वरुपस्थिती भोगणारा जो मी, परिपूर्ण योगी त्या माझ्या ठिकाणी दया मुक्ति त्या दासी झाल्या. आत्मस्थिती पूर्ण बाणते. त्या मार्गाने जा. त्याच्या दर्शनांने जीव मुक्त होतात. यामार्गाचा अनुभव घेणारा बद्धमुक्त याच्यापलीकडे असणाऱ्या मुक्ताअवस्था कोणाच्याही आश्रया वर असलेल्या आत्मस्वरुपात पाहातो. मदालसा या नावाने मुक्ति करिता जो उपदेश केला. तोच उपदेश मुक्ताबाईने मुक्तिकरिता चांगदेवास केला. असे माऊली सांगतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग