गंधर्वनगरी क्षण एक र
3256.
गंधर्वनगरी क्षण एक राहावे । तेचि करावे मूळक्षेत्र ॥१॥
खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा । लक्ष्मीनारायणा तोषवावे ॥धृपद॥
वंध्यापुत्राचा लग्नाचा सोहंळा । आपुलिया डोळा पाहो वेगी ॥२॥
मृगजळी पोहे घालुनि सज्ञाना । तापलिया जना तोषवावे ॥३॥
तुका म्हणे मिथ्या देहेंद्रियकर्म । ब्रम्हार्पण ब्रम्ह होय बापा ॥४॥
अर्थ :
आपण जर आकाशात पाहिले तर आपल्याला वेगवेगळया ढगांचे वेगवेगळे नगरीत रुपातर झालेले दिसते परंतू ते काही क्षणाकरताच असते ते ढग क्षणभर देखील एका जागेवर राहात नाहीत परंतू जरी ते स्थिर झाले तर तेथे कोणी वास्तव्य करावे? किंवा कोणीतरी आकाश पुष्पाचीच माळ तयार करावी आणि ती निर्गुण अशा लक्ष्मीचा पती जो नारायण त्याला घालावी व त्याला संतुष्ट करावे. नाहीतर मोठया तत्परतेने आपण आपल्या डोळयाने वांझोटया स्त्रीच्या मुलाचा लग्नाचा सोहंळा आपल्या डोळयाने पाहावा. नाहीतर हे सज्ञान मनुष्या मृगजळाची पाणपोई घाल आणि त्या पाणपोईमधून पाणी काढून तृष्णेत झालेल्या लोकांना पाणी पाजून संतुष्ट कर. तुकाराम महाराज म्हणतात, अरे बापा त्याप्रमाणेच या देहाच्या अभिमानाने तू जे काही कर्म करशील ते सर्व मिथ्याच आहेत तू कोणतेही कर्म करताना जर ब्रम्हार्पणमस्तू असे म्हणून कर्म केले तर ते कर्म ब्रम्हालाच अर्पण होतात आणि तू देखील नंतर ब्रम्हरुपच होशील.
