नाम्याचें कारण देवे
3598.
नाम्याचें कारण देवे नवल केले । धोंडोबाचे जाहलें सुवर्ण ते ॥१॥
गोणाई दामशेटीतें आनंद पै जाहला । म्हणती भला भला नामा आमुचा ॥२॥
न कळे लाघव देवाचे सर्वथा । म्हणती नामा आमुचा कर्ता जाहला आता ॥३॥
एका जनार्दनी द्रव्याचिया आशा । विसरले सर्वेशा पांडुरंगा ॥४॥
