देवे चहू भुजी दिले आ
1801.
देवे चहू भुजी दिले आलिंगन । कुरवाळिले वदन चहू करे ॥१॥
धरुनि हनुवटी पाहे कृपादृष्टि । केली सुखवृष्टि करुणाधने ॥२॥
नामदेव ऐसे नाम त्या ठेविले । तेणे अनुभवले प्रेमसुख ॥३॥
हे संत भागवत माझिये आवडी । माझ्या रूपी बुडी देऊनि ठेले ॥४॥
परि या सकळाहुनी तुझा भक्तीभावो । अमृत पान्हावो अधिक बोल॥५॥
ज्ञान विज्ञानाचे मंडण ज्ञानेश्वर । वैराग्याचा मेरु निवृत्तिरावो ॥६॥
स्वात्मसुखबोधाचा सिंधु हा सोपान । सर्वांत भूषण भक्तराय॥७॥
परमानंद जोगा जगन्मित्र नागा । वटेश्वर चांगा केशवदास ॥८॥
सांवता बंका चोखा आणि रोहिदास । या सकळांहूनी विशेष महिमा तुझा ॥९॥
हा दास खेचर नरहरी सोनार । आणि गोरा कुंभार भानुदास ॥१०॥
हे माझे आवडते महाभक्तराज । परी तुझेनी तृप्ती मज अधिक होय ॥११॥
उद्धव रुक्मांगद भीष्म आणि नारद । बालके ध्रुव प्रल्हाद प्रसिद्ध जगा ॥१२॥
हे विषया विरक्त सहज जीवन्मुक्त । परी तुझा अधिक भाग्यमहिमा ॥१३॥
हे संत सोइरे जीवलग आमुचे। संगती जीवाचे आवडते ॥१४॥
परी तुझा आनंद सर्वहुनी आगळा । मज असे मानला नामदेवा ॥१५॥
