उत्तम स्त्री देखोनि
870.
उत्तम स्त्री देखोनि दृष्टी । मुर्ख कैसा लाळ घोटी ॥१॥
तैसा विनटें रामनामा । तेणे चुकशी कर्माकर्मा ॥२॥
मुषक देखोनि मार्जार । तैसे उभे यम किंकर ॥३॥
मीन तळमळी जैसा । विषयीक प्राणी तैसा ॥४॥
शरण एका जनार्दनी । दुजा छंद नाही मनी ॥५॥
