स्वामीसी संकट पडे जे
3049.
स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचे । काय त्या प्रेमाचे सुख मज ॥१॥
दुःखवीना चित्त तुझे नारायणा । काहीच मागेना तुजपासी ॥धृपद॥
रिद्धि सिद्धि मोक्ष संपित्त विलास । सोडियेली आस यांची जीवे ॥२॥
तुका म्हणे एके वेळे देई भेटी । वोरसोनि पोटी आळिंगावे ॥३॥
अर्थ :
ज्या गोष्टीमुळे स्वामीवर संकट पडेल त्या गोष्टीविषयी मला काय प्रेमसुख वाटणार आहे ? त्यामुळे हे नारायणा मी तुझे मन कधीच दुखावणार नाही आणि तुझ्याजवळ काहीच मागणार नाही. अरे माझ्या मनाने तर रिध्दी सिध्दी मोक्ष संपत्ती विलास याची अपेक्षा याची इच्छा केव्हाच सोडलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे नारायणा तुम्ही फक्त मला एकदाच भेट दयावी आणि मला तुमच्या पोटाशी लावून एकदा आलिंगन दयावे.
