खेळ मंडियेला वाळवंटी
1.
खेळ मंडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान केला पावटणी । एकएका लागती पायी रे ॥१॥
नाचती आनंदकल्लोळी । पवित्र गाणे नामावळी रे ।
कळिकाळावरी घातली कास । एक एकाहून बळी रे ॥२॥
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळा रे ।
टाळा मृदंग घाई पुष्पाचा वरुषाव । अनुपम्य सुख सोहंळा रे ॥३॥
लुब्धली नादी लागली समाधी । मूढ जन नर नारी लोका रे ।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिध्दसाधका रे ॥४॥
वर्णाभिमान विसरली याती । एकएका लोटांगणी जाती रे ।
निर्मळ चित्ते झाली नवनीते । पाषाणा पाझर सुटती रे ॥५॥
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले वैष्णववीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ॥६॥
