जव हे सकळ सिद्ध आहे
4056.
जव हे सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाय । तव तू आपुले स्वहित पाहे । तीर्थयात्रे जाये चुको नको ॥१॥
जव काळ असे दुरी ठेला । तव तू हरी गुण गाय आइक वहिला । मनी भाव धरूनि भला । न वंचे त्याला चुको नको ॥२॥
जोडोनि धन न घली माती । ब्रम्हवृंदे पूजन यति । सत्य आचरण दया भूती । करी सांगाती चुको नको ॥३॥
दशा यौवन बाणली अंगी । पागिला नव्हे विषयसंगी । काम क्रोध लोभ मोह त्यागी । राहे संतसंगी चुको नको ॥५॥
मग तेथे न चले काही । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायी । पुढे संचित जाईल ग्वाही । तुका म्हणे तई यमआज्ञा ॥५॥
अर्थ :
अहो जोपर्यंत तुमचे सर्व इंद्रिय सुदृढ आहेत, चांगले आहेत चालण्यास हातपाय अजूनही चांगले आहेत, तोपर्यंतच तुम्ही आपले स्वहित करुन घ्या तीर्थयात्रेस जाण्यास चुकू नका. अहो जोपर्यंत काळ तुमच्यापासून दूर आहे तोपर्यंतच तुम्ही हरीचे गुणगान गा व ऐका. मनामध्ये खरा भक्तिभाव धरुन आपले स्वहित करण्याविषयी चुकू नका व अंगचोरपणा करु नका. तू प्राप्त केलेल्या धनाला तू मातीमध्ये खड्डा खणून पुरुन ठेवू नको त्याच्यावर माती टाकू नको तर त्याचा उपयोग ब्रम्हवृंद म्हणजे योग्य ब्राम्हणांच्या व संन्यासांच्या पूजेसाठी त्या धनाचा वापर कर. तू नेहमी आपले आचरण स्वच्छ ठेव भूतमात्रांवर दया कर व त्यांनाच आपला सोबती कर असे करण्यास तू चुकू नको. जोपर्यंत तुमच्या अंगी तारुण्यअवस्था आहे तोपर्यंत तुम्ही विषयांच्या संगतीत राहून त्यांचे अंकित होऊ नका. काम क्रोध लोभ मोह यांचा त्याग कर आणि संतसंगतीमध्ये राहण्याचे चुकू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा की यमदूत तुम्हाला
