॥ श्रीएकनाथमहाराजकृत
41.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय एक्केचाळिसावा ॥
भरतकृत श्रीरामस्तुती
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
गेले ऋक्ष राक्षस वानर । मागे बंधूंसहित श्रीरघुवीर ।
बसले असती सुखें अपार । आनंदें निर्भर ते समयी ॥१॥
तेव्हा माध्यान्हकाळ प्रवर्तला । स्नानसंध्या विधी सर्व केला ।
भोजन सारोनि ऋषि सकळा । बंधूंसहित राघवें ॥२॥
तंव अकस्मात मधुर वाणी । आकाशींहूनि श्रीरामश्रवणीं ।
पडली तये सभास्थानी । पाहे गगनी मज श्रीरामा ॥३॥
कुबेराचे पुष्पक विमान पुनः श्रीरामांजवळ त्यांच्या सेवेसाठी आले :
कृपेंकरोनि राघवा । मज पाहे कृपार्णवा ।
मी पुष्पक कैलासाहूनि देवा । धनेशें मज पाठविले ॥४॥
बोलिले मंजुळ उत्तरें । ते अवधारावे राजीवनेत्रें ।
म्हणे पुष्पकावरी श्रीरामचंद्रें । पूर्वी आरोहण पै केले ॥५॥
मी तुझे आज्ञेनें रघुपती । गेलों होतो धनेशाप्रती ।
तेणे मज पुनरपि नरपती । तुझे सेवेसी पाठविले ॥६॥
ज्यावरी आरुढला श्रीरघुनाथ । ते पूज्य मज पूजित ।
मी त्यावरी न आरुढें निश्चित । हा संकल्प कृत पै माझा ॥७॥
अगा पुष्पका अवधारी । श्रीरामे मारिले दुराचारी ।
रावण वधिला सहपरिवारी । जो का करी निंद्य कर्म ॥८॥
मज झाले परम सुख । त्रैलोक्यासि अति हरिख ।
दुरात्मा वधून सधमुख । प्रधानेंसीं देख रणांगणी ॥९॥
अगा पुष्पका रघुनाथातें । तुवा वहावें माझे आज्ञेतें ।
ऐसे निरोपोनि धनेशें येथे । तुमचे सेवेतें पाठविले ॥१०॥
रामांनी स्वीकार करुन त्याची पूजा केली :
ऐकोनि श्रीरामे त्याची मात । मनी संतोषला जनकजामात ।
बरवे म्हणोनि अंगिकारित । कुबेराच्या विमाना ॥११॥
तदनंतरे श्रीरघुपती । पुष्पका पूजी अत्ति निगुतीं ।
धूप दीप पंचारती । नाना सुगंधीं पूजिलें ॥१२॥
पुष्पका म्हणे श्रीराम । तू अद्दश्यगतीं विचरे व्योम ।
जैसे सिद्ध साधु भक्त परम । अदृश्यगती विचरती ॥१३॥
तैशी तुवा पुष्पकेंही । स्वइच्छेनें विचरावी मही ।
मी स्मरण करीन जे काळी पाही । तेव्हा त्वरित पै यावे ॥१४॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । पुष्पकें करोनि प्रदक्षिण ।
श्रीरामा माथा लावून । सुखे गमन करितें झाले ॥१५॥
ऐसे पुष्पक विमान । कोणा दुःख नेदिता गगन ।
विचरे पुरें पाटणें आणि उद्यान । अदृश्य होवोन ते काळी ॥१६॥
सर्वत्र सुखसमृद्धी पाहून भरताचे आश्चर्य :
तंव येरीकडे कैकेयीसुत । जितजामदग्न्या विनवीत ।
स्वामी आश्चर्य थोर येथ । देखतसे राजेंद्रा ॥१७॥
श्रीरामाराज्यमहिमान । कोणा नाही दुःख दैन्य ।
कोणा नाही मीतूंपण । सुखसंपन्न पुरवासीं ॥१८॥
कोणा नाही जरेची वार्ता । कोणा नाही हृदयी चिंता ।
कोणा नाही देही कृशता । स्वानंदता पुरवासी ॥१९॥
मृत्यूचें भय नाही कोणासी । राम राज्य करिता जनासी ।
सुखी स्वानंदे पुरवसी । अहर्निशी रामभजन ॥२०॥
राज्यीं असता सीताकांत । सर्व जन सुखी स्वस्थ ।
राज्य करिती आनंदभरित । पूर्ण मनोरथ सर्वांचे ॥२१॥
श्रीरामाज्ञेकरुन । मृत्यु भक्तांचे वंदी चरण ।
अयोध्यावासी स्वधर्मचरण । नित्यमेव करिताती ॥२२॥
बाळत्व तारुण्य जरा । न बाधी श्रीरामाच्या किंकरा ।
सर्वा सुख देतसे वारा । सर्वांतरीं राहून ॥२३॥
यथाकाळी पर्जन्य । वर्षाव करी श्रीरामाज्ञेकरुन ।
तेणे पिकती नाना धान्य । सुकाळ पूर्ण अयोध्येसीं ॥२४॥
जे जे काळी जो जो ऋतु । तो तो यथाकाळी प्रवर्ततु ।
सूर्य खडतर नाही तपतु । श्रीरामाज्ञेकरोनी ॥२५॥
समुद्र नुल्लंघीच मर्यादा । साधु न प्रवर्तती निंद्य वादा ।
वेदशास्त्रांच्या संवादा । अन्यथा भाषण न करिती ॥२६॥
घरोघरी वेदाध्ययन । पुराण आणि हरिकीर्तन ।
अखंड वाचे नामस्मरण । कोणा विस्मरण पै नाही ॥२७॥
रामनाममहिमा :
ऐसा श्रीराम सच्चिदानंदघन । जो का योगीशवरांचे हृदयरत्न ।
जो का भक्तजननिजजीवन । तो स्वानंदे पूर्ण लीला दावी ॥२८॥
जो चिदाकाशींचें गगन । जो भक्तजनवनींचा चंदन ।
जो का आर्तचकोरां निजजीवन । तो स्वानंदे पूर्ण लीला दावी ॥२९॥
जो भक्तसागरींची नौका । जो योग्या हृदयी चित्काळिका ।
तो श्रीराम अकिंचनसखा । ज्याचे नामे देखा पातके हरती ॥३०॥
एकचि एक जयाचे नाम । महादोषा करी भस्म ।
कलियुगीं साधनांचे नाही काम । रामनामावांचोनी ॥३१॥
कलियुगीं मुख्य साधन । श्रीरामाचे नाम जाण ।
पार्वतीप्रति मदनारी आपण । नाममहिमान सांगतसे ॥३२॥
नामे भक्ति नामे मुक्ती । नामे यश नामे कीर्ती ।
नामे होय परमपदप्राप्ती । नामे हरती महदोष ॥३३॥
अबद्ध करिता वेदपठण । अवश्य निषेध बाधी जाण ।
अबद्ध म्हणता श्रीराम नारायण । अगणित पुण्य स्मर्त्यातें ॥३४॥
अबद्ध मंत्र उच्चारिती । जापक चळणी नेणो किती ।
अबद्ध नाम नित्य जपती । ते पावती सायुज्य ॥३५॥
नामे कळिकाळा सीक । नामे पातकां महाधाक ।
नामे यमादिकां हाक । नामे प्राप्त सायुज्य ॥३६॥
नामे उद्धरिली कुट्टिनी । नामे गणिका चढली विमानी ।
नामे पावन हे अवनी । नामे त्रिभुवनी आनंद ॥३७॥
नामे वाल्मीक चोरटा । कळिकाळें घेत झटा ।
नामे मुक्तीच्या पिकल्या पेठां । नामे देशवटा भवदोषां ॥३८॥
गोकोटिदानं ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुतकल्पवासः ।
यज्ञायुतं मेरुसुवर्णदानं गोविन्दनाम स्मरणेन तुल्यम् ॥१॥
गोविंदनामाच्या तुळणेंसीं । न येती पुण्याचिया राशी ।
ग्रहणकाळीं कोटिधेनूंसी । जरी दिधलिया शृंगारुन ॥३९॥
सुवर्णशृंगी रौप्यखुरी । सत्वत्सा आभारणेंसीं कोटिवरी ।
दिधल्या फळ नामाबरोबरी । न ये निर्धारी तुळितांही ॥४०॥
अथवा दश सहस्त्र वर्षेपर्यंत । त्रिवेणीतीर आश्रयोनि तेथ ।
राहिल्या पुण्य अगणित । नामतुळणेसी पै नये ॥४१॥
एक अयुत महायज्ञ । सांगोपांग करोनि जाण ।
अथवा मेरुइतकें सुवर्णदान । दिधल्या नामामहिमान अधिक ॥४२॥
इतुकीं पुण्यें एकीकडे । घालिता नामाच्या पारडे ।
तुळणेसी न पावे चंद्रचूडें । म्हणोनि हृदयी धरियेले ॥४३॥
आधींच तो पिनाकपाणी । सकळ देवांचा मुकुटमणी ।
तोही राहिला नामसंजीवनीं । उपासक होवोनी नामाचा ॥४४॥
ऐसी भरतें स्तुति करुन । ऐकोनि श्रीराम दे आलिंगन ।
देवोनि दोघा समाधान । वेगळेपण दिसेना ॥४५॥
अग्रजमुखां खेंवा पडली मिठी । जेंवी गगना गगनी होय भेटी ।
ऐसी आलिंगनसुखसंतुष्टी । येरयेरा पै झाली ॥४६॥
रवि सोम मासाअंती । सम मंडळा जेंवी येती ।
तेंवी मांडवीकांत आणि जानकीपती । समसाम्य भेटले ॥४७॥
एका जनार्दना शरण । चवघे बंधु जानकीरमण ।
करिता झाला चरित्रकथन । ते सावधान अवधारा ॥४८॥
मागील कथेची संगती । राजे बोळवोनि श्रीरघुपती ।
पुष्पक पूजोनि अति निगुतीं । ते विचरावया क्षिती पाठविले ॥४९॥
तदपरी भरताचे स्तवन । ऐकोनि श्रीराम सुखसंपन्न ।
भरत भक्तराज म्हणोन । आलिंगन देवोन सुखी केला ॥५०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
भरतस्तवनं नाम एकचत्वारिंशोऽध्यायः ॥४१॥
ओंव्या ॥५०॥ श्लोक ॥१॥ एवं ॥५१॥
