वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ६२. अगस्ति - श्रीराम संवाद

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088357 · अभंग क्र. ६२

62.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय बासष्टावा ॥
अगस्ति - श्रीराम संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

कुंभोद्भव म्हणे जामदग्नजेत्यासी । पूर्वी त्रेतायुगाची कथा ऐसी ।
जे वर्तली ते तुजपासी । विस्तारेंसीं सांगेन ॥१॥
पूर्वी त्रेतायुगामाझारीं । शतयोजनें वनविस्तारीं ।
पशु पक्षी नाही त्या वनांतरीं । त्यजोनि दुरी गेले मानव ॥२॥
तया वनाभीतरी । एक तापस उत्तम तप करी ।
मीही रामा हिंडत तेथवरी । तया वना प्रवेशलों ॥३॥
फळे मुळे सुस्वादिष्ट । भक्षितां प्राणी होय संतुष्ट ।
मार्गीं रमलियाचे कष्ट । तया वनी निवारती ॥४॥
अनेक वृक्ष बहुत जातींचे जाण । तयांचे कोण करील वर्णन ।
तयांमध्ये एक सरोवर विस्तीर्ण । एकयोजनपर्यंत ॥५॥
तया सरोवराभीतरीं । नानापरींच्या कमळिणी भ्रमरी ।
रुणझुण करिती नाना स्वरीं । मंजुळ शब्देंकरोनी ॥६॥
हंस सारस चक्रवाक । मयुर साळया आणिक शुक ।
तित्तित लाव्हे कुक्कुट बक । कारंडक अनेक हो ॥७॥
तया वनींचें फळ । अत्यंत खादिष्ट रसाळ ।
आणि तेथील निर्मळ जळ । सेविल्या अपूर्व सुख होय ॥८॥
ते समयी सरोवराभीतरीं । शव एक देखिले तनु साजिरी ।
सरोवरातीरीं आश्रम रावणारी । उत्तम सुंदर देखिला ॥९॥

सरोवराच्या काठावर पडलेले शव विमानातून आलेल्या पुरुषाने भक्षण केले :

शव देखोनि आश्चर्य वाटलें । मग तेथे क्षण एक मन स्थिर केले ।
तंव तत्क्षणीं अद्भूत वर्तले । ते अवधारी श्रीरामा ॥१०॥
तंव एक स्वर्गीहून । उतरता देखिले विमान ।
घंटावळी रत्नखचित जाण । तेजे संपूर्ण लखलखित ॥११॥
तया विमानभीतरीं । गंधर्वगायन सुस्वरीं ।
अप्सरानृत्यताल गजरेंकरी । माजि सुंदर पुरुष बैसलासे ॥१२॥
तया पुरुषे तेथे उतरोन । करोनि करचरणप्रक्षाळण ।
शव भक्षिता झाला आपण । ते म्या दृष्टी देखिले ॥१३॥
सवेंचि पुरुष विमानी । आरुढ होता तेच क्षणी ।
म्या पुसिले तू कोंण म्हणोनि । शव का भक्षिलें विमानस्था ॥१४॥
अति निंद्य शवभक्षण । तुवा करावय काय कारण ।
ते मज सांगे विस्तारुन । कृपा करोनि ये समयी ॥१५॥
तू अत्यंत सुंदर पुरुष । आणि भक्षिलें तुवा मांस ।
हे आश्चर्य देखिलिया मनास । पुसो इच्छितो तुजलागीं ॥१६॥
ऐकोनिया माझे वचन । विमानस्थ पुरुष बोलिला जाण ।
म्हणे मुनि होवोनि सावधान । सविस्तर कथन अवधारी ॥१७॥

श्वेताचे आत्मकथन :

पूर्वी विदर्भदेशींचा भूपती । वसुदेव नामे महाख्याती ।
तयासि दोघी स्त्रिया निश्चिती । दोघी पुत्रवती पै झाल्या ॥१८॥
तो आमुचा पिता जाण । आम्ही दोघे बंधु धर्मपरायण ।
माझे श्वेत नामाभिधान । सुरस कनिष्ठ बंधु माझा ॥१९॥
राज्य करिता वसुदेवास । बहुत काळ लोटला मुनि परियेस ।
मज राज्यीं स्थापोनि राजा स्वर्गास । मरण पावोनि पै गेला ॥२०॥
पित्यामागे म्या श्वेतें । राज्य केले वर्षे बहुते ।
मग उबगलों विषयभोगातें । उदास चित्ते होवोनी ॥२१॥
राज्यीं स्थापूनि कनिष्ठ बंधूसी । मी आलो वनासी ।
तप केले तीन वर्षे ऋषी । मग मी स्वर्गासी विमानारुढ होवोनि गेलों ॥२२॥
गेलियावरी ब्रह्मलोकातें । क्षुधतृषेनें बाधिले तेथे ।
मग म्या विनवोनि ब्रह्मयाते । पुसतां झालो ते काळी ॥२३॥
मग ब्रह्मा म्हणे महापुरुषा । तप करोनि अति सायासा ।
परी दान धर्म दया सहसा । घडलीं नाही तुजलागीं ॥२४॥
तुवा तप केले अद्भूत । परी पूजिले नाहींत अतीत ।
यालागी क्षुधा तृषा बाधित । ये लोकी जाण तापसा ॥२५॥
दानधर्मदयेवीण । मम लोका आलिया होय विघ्न ।
यालागी भले साधुजन । अन्नदान करिताती ॥२६॥
तापसी म्हणे ब्रह्मयासी । मज भक्षावया काय देतोसी ।
येरु म्हणे तुझे शरीर पडले भूमीसीं । ते भक्षावें स्वादिष्ठ ॥२७॥
मग विमानी आरुढोन । या सरोवरा आलो जाण ।
स्वशरीर केले भक्षण । तुजदेखतां अगस्तिमुनी ॥२८॥
आपुले शरीर केले भक्षण । येथे तृप्ति पावलों जाण ।
यावरी तुमचे झाले दर्शन । तृषेसि बोळवण पै झाली ॥२९॥
आता अहो जी अगस्तिमुनी । मज कृपा करावी दीनालागूनी ।
म्हणोनि माथा ठेविला चरणी । काय विनवणी करिता झाला ॥३०॥
अहो कुंभोद्भवा इल्वलारी । ही हेमाभरणे अंगीकारीं ।
कृपा करोनि मजवरी । दीन म्हणोनि उद्धरावें ॥३१॥
हेमाभरणें अंगीकारुन । तया दिधले आशीर्वचन ।
म्हणे तू स्वर्गा करी गमन । क्षुधा तृषा जाण बाधेना ॥३२॥
मग माझे आशीर्वादेंकरीं । प्रवेशता झाला स्वर्गपुरी ।
त्याचीं आभरणे ही रावणारी । तुज म्या दिधली ये काळी ॥३३॥
तो पुरुष स्वर्गासीं । पूर्वदेह सांडोनि वनप्रदेशीं ।
दिव्यदेहें ब्रह्मलोकासी । विमानारुढ होवोनि गेला ॥३४॥
ऐकोनि अगस्तीचें वचन । संतोषला श्रीरघुनंदन ।
म्हणे स्वामी कृपा करुन । तयाचे कथन सविस्तरीं सांगावे ॥३५॥
श्रीराम म्हणे अगस्तीसी । श्वेतराज वनप्रदेशीं ।
तप करिता सायासी । वस्ती मनुष्यासी नव्हती तेथे ॥३६॥
ऐसे झाले उद्वस वन । मृगपक्षिविवर्जित जन ।
महा विक्राळ दारुण । तेथे तप कैसे केले ॥३७॥
भार्गवजेत्याचे ऐसे वचन । ऐकोनि अगस्ति आनंदोन ।
पूर्वील इतिहास पुरातन । संतोषोन सांगता झाला ॥३८॥

मनूची कथा :

पूर्वी कृतयुगामाझारी । मनुनामें प्रसिद्ध निर्धारी ।
तया पुत्र इक्ष्वाकु नृपकेसरी । पितयाचे आज्ञेअधीन असे ॥३९॥
मनु धर्मात्मा धर्मपरायण । पुत्रासी राज्यीं स्थापून ।
म्हणता झाला स्वधर्मेंकरुन । राज्यपाळण करावे ॥४०॥
अदंड्या दंड न करावा । न करी अधर्माचा ठेवा ।
गोब्राह्मण आणिक जीवां । प्रतिपाळण करावे ॥४१॥
ऐसे बोलोनि मनूनें जाण । केले स्वर्गाप्रती गमन ।
मागे इक्ष्वाकु प्रतापेंकरुन । राज्य करिता पै झाला ॥४२॥
पृथ्वीचे राजे जिंतिले । आपुले करोनि स्थापिले ।
पुढे चिंतातुर मानस झाले । पुत्रसंततीकारणें ॥४३॥
म्हणे म्या पृथ्वी जिंतिली । स्वधर्मेकरोनि प्रतिपाळिली ।
परी आपणासि संतति पाहिजे झाली । यदर्थीं विचार करितसे ॥४४॥
स्वधर्मकर्मेकरीं जाण । पुत्राचें करिता झाला जनन ।
तंव एकशत पुत्र झाले निर्माण । धर्मपरायण तेजस्वी ॥४५॥
सर्वांहूनि धाकटा पुत्र । दंडकनामें अति विख्यात ।
मूढ झाला अपंडित । अनर्थ अद्भुत करिता झाला ॥४६॥
दुर्बुद्धि पुत्र देखोन । इक्ष्वाकुनें शाप दिधला दारुण ।
दंडक झाला अति उद्विग्न । सांडोनि उद्धटपण शांतीतें पावला ॥४७॥
करी पित्याचे सेवेसी । संतोष मानसी अहर्निशी ।
तव पिता संतोषोनि एके दिवसी । काय करिता पै झाला ॥४८॥
विंध्यादिशैलाभीतरीं जाण । इक्ष्वाकूने दंडका राज्य देऊन ।
येरे शुक्राचार्य गुरु करोन । राज्यभार चालविला ॥४९॥
तया पर्वताचे पाठारीं । दंडकें वसविली मधुमंतपुरी ।
त्रियेचे रचने त्रिभुवनामाझारीं । उपमेसी नाही आणिक ॥५०॥
तया नगरीचे ठायी । वास करिता झाला पाही ।
पुढील कथेची नवायी । सावध होवोनि अवधारिजे ॥५१॥

दंडकाची कथा :

कोणे एके काळी दंडक जाण । पारधी निघाला मृग लक्षोन ।
तंव भार्गवकन्या देखिली जाण । वनविहरण करीतसे ॥५२॥
ती लावण्याची पुतळी । की स्वर्गीची देवांगना सजली ।
उपमेलागी भूमंडळी । दुसरी नाही तिजसारिखी ॥५३॥
ऐसी सुंदर सुकुमार । अनंतगुणगंभीर ।
हंसगती चालता चरणी भ्रमर । परिवेष्टित भोवतीं ॥५४॥
ऐसे ते दैत्यगुरुचे कन्यारत्न । देखोनि दंडका चेतला मदन ।
म्हणॆ तीस तू कोणाची कोण । काय कारणे वनी हिंडसी ॥५५॥
माझा मदनें जातो प्राण । अवा माझे करी वरण ।
येरी म्हणे राया मी पितयाअधीन । स्वतंत्रपण मज नाही ॥५६॥
या वनीचे प्रदेशीं राया । माझा पिता शुक्राचार्य ।
अनुष्ठान करितो त्याची तनया । अरजा ऐसे नाम माझे ॥५७॥
तो माझा पिता गुरु जाण । तू तया मागे कन्यादान ।
न मागता करिसी माझे ग्रहण । ते अनर्थ दारुण भोगिसी ॥५८॥
ऐकोनि तियेचे वचन । मंदबुद्धि दंडक जाण ।
बळे देवोनि आलिंगन । संभोगून सोडिली ॥५९॥
संभोगून तियेसी । दंडक आला निजनगरीसी ।
येरी मागे उसकाबुसकी । रुदन वनवासी करिती झाली ॥६०॥
तंव झाला माध्यान्हकाळ । शुक्रे शिष्यांचा घेवोनि मेळ ।
क्षुधार्थीं होवोनि वनफळे प्रबळ । भक्षावया येता झाला ॥६१॥
मार्गी रुदन करिता कन्येसी । देखता झाला देवऋषी ।
म्हणे तू कोणे गांजिलीसी । का शोक करिसी सांग मज ॥६२॥
येरीनें सांगता वृत्तांत । शुक्रे ऐकोनि क्रोधे उचंबळत ।
म्हणे दृष्टात्म्याने करोनि अकृत । निजकन्येसी गांजिले ॥६३॥

दंडकाला शुक्राचार्यांचा शाप :

शुक्र शाप ते काळी दारुण । देता झाला दंडका जाण ।
सप्त दिवसा सहराज्य आपण । निजसैन्येंसीं भस्मेल ॥६४॥
हे जे दंडकारण्य । धुई दाटोन होईल दहन ।
पर्जन्य येथे न पडे जाण । बहुकाळ अवर्षणें जन पीडती ॥६५॥
ये वनी कोणी न करावी वस्ती । जाणोनि रहावे देशींच्या प्रांतीं ।
ऐसे ऐकोनि जनी समस्तीं । त्या स्थळाचा त्याग केला ॥६६॥
कवीनें संबोखोनि कन्येसी । दंडकारण्यी स्थापून तिसी ।
देता झाला वरदानासी । आत्मजेसी ते काळी ॥६७॥
अवो आत्मजे ये वनाभीतरी । तुझ्या आश्रमा शाप व बाधा निर्धारी ।
तू येथे राहे आनंदें निर्भरी । वनफळे सेवोनियां ॥६८॥
शुक्रे वनी स्थापोन कन्यारत्न । आपण निजाश्रमा करी गमन ।
ऐसे अगस्तिमुखीं श्रीरामे ऐकोन । तंव सायंकाळ प्रवर्तला ॥६९॥
श्रीरामासहित अगस्तिमुनी । प्रवर्तले संध्यावंदनीं ।
निजकर्मे करिता रजनी । तिये काळी पै झाली ॥७०॥
एका जनार्दना शरण । श्रीरामे करोनि संध्यावंदन ।
मग करिते झाले भोजन । ते कथा पावन अवधारा ॥७१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
अगस्तिश्रीरामसंवादो नाम द्विषष्टितमोऽध्यायः ॥६२॥ ओंव्या ॥७१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग