अपरधाविण बळी | घातला
481.
अपरधाविण बळी | घातला पाताळी |सवैचि कणव उपजली | द्वार राखिसी तयांचे ॥१॥
गार्हाणे सांगावे कवणा | अगा केशव सुजाणा |कोणी आणिक तुजविणा | नाही दुसरा आम्हाते ॥२॥
बाळमित्र सुदामा सवे जेवी |धान्य जो मागे गांवोगांवी |विपत्ति त्याची दूर व्हावी | म्हणून दिघली राणीव ॥३॥
तुझे नाम न तोंडी | वासुदेव देवकी बांधोडी |कंसा केली धांगडी | ऐसी विपत्ति दाखवूनि ॥४॥
इंद्र वर्षे शिळाधारा | पर्वत केला सामोरा |इंद्रा लविला दरारा | एवढी विपत्ति दाखवुनि ॥५॥
जोहरी सुदले पांडवा | सवेंचि उपजली कणवा |त्यासी केला त्वा रिघावा | आगी पाहण्या धांवसी ॥६॥
सभा पिशुनाची दाटली | द्रौपदी काया आसुंडली |तिये वस्त्रे पुरविली | येवढी आपदा दाखवूनी ॥७॥
दैत्ये गांजिला प्रल्हादु | तुझ्या नामाचा प्रसादु |ऐसा करुनि विनोदु | तया दैत्या केला वधु ॥८॥
बिभीषण हाणितला लाथा | लंका दिधली त्या उचिता |कृपा करे रघुनाथा | समर्थ केला तये वेळी ॥९॥
गजेंद्र पानेडी | धरिला यमदूत सुसरी |वैकुंठीहूनि घालिसी उडी | येवढी आपदा दाखवुनि ॥१०॥
आम्हा डिंगराचे बोलणे | अनाथ नाथा परिसणे |विष्णुदास नामा म्हणे | शहाणे व्हावे यापरते ॥११॥
