(बाळक्रीडा अभंग)
3902.
(बाळक्रीडा अभंग)
काही चिंता कोणा नाही कोणेविशी । करी द्वारकेसि राज्य देव ॥१॥
द्वारकेसि राज्य करी नारायण । दुष्ट संहारून रक्षीधर्म ॥२॥
पाळी वेदआज्ञा ब्राम्हणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचे ॥३॥
अतीत अलिप्त अवघिया वेगळा । नाही या गोपाळा अभिमान ॥४॥
अभिमान नाही तुका म्हणे त्यासि । नेदी आणिकासि धरू देव ॥५॥
अर्थ :
व्दारकेमध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण राज्य करत होता त्यामुळे कोणालाही कोणत्याही विषयी कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती. व्दारकेमध्ये स्वत: नारायण राज्य करत होता दुष्टांचा संहार करुन धर्माचे रक्षण तो करत होता. भगवंत स्वत: व्दारकेत राज्य करत होता तरी देखील वेदाची आज्ञा तो पाळत होता, ब्राम्हणांचा मान ठेवीत होता, अतिथींचे पूजन करत होता तसेच वैष्णवांचे देखील पूजन देव करत होता. एवढे मोठे राज्य, एवढी मोठी संपत्ती अवाढव्य यादव परिवार असून देखील देव सर्वांपासून अलिप्त होता त्याच्या ठिकाणी मी आणि माझे हा अभिमान नव्हता. तुकाराम महाराज म्हणतात, मुख्यत: देवाच्याच ठिकाणी अभिमान नाही त्यामुळे तो इतर कोणालाही अभिमान धरुच देत नाही.
