उदारांचा राणा म्हणवि
1656.
उदारांचा राणा म्हणविसी आपणा | सांग त्वा कवणा काय दिल्हे ॥१॥
उचिता उचित भजसी पंढरीनाथा | न बोलो सर्वथा वर्गे तुझी ॥२॥
वर्मे तुझी कांही बोलेन मी आता | क्षमा पंढरीनाथा करी बापा ॥३॥
न घेता न देसी आपुलेंहि कोणा | प्रौढी नारायणा न बोलावी ॥४॥
बाळमित्र सुदामा विपत्ती पिडला तो भेटावया आला तुजलागी ॥५॥
त्याचे मुष्टिपोहेसाठी मन केले आसट | मग दिले उत्कृष्ट भाग्य तया ॥६॥
छळावया पांडव दुर्वास पातला | द्रौपदीने केला धांवा तुझा ॥७॥
गेली वृंदावना केली प्रदक्षणा | आळविला कान्हा द्वारकेचा ॥८॥
आळवी पांचाळी येर वा वनमाळी | राख ये काळी सत्य माझे ॥९॥
येवढया आकांती घेऊनि भाजीपान | मग दिले अन्न ऋषिलागी ॥१०॥
बिभीषणा दिधली सुवर्णाची नगरी | हे कीर्ति तुझी हरि वाखाणिती ॥११॥
वैरियाचे घर भेदे त्वा घेतले | त्याचे त्यासी दिधले नवल काय ॥१२॥
धरुवा आणि प्रल्हाद अंबऋषि नारद | हरिश्चंद्र रुक्मांगद आदि करुनी ॥१३॥
त्याचे सेवाऋण घेऊनि अपार | मग त्या देशी वर अनिर्वाच्या ॥१४॥
एकाचि शरीरसंपत्ति आणि वित्त | एकाचे ते चित्त हिरोनि घेसी ॥१५॥
मग तया देशी आपुले तू पद | जगदानी हे ब्रीद मिरविसी ॥१६॥
माझे सर्वस्व घेई तुझे नको कांही | मनोरथाची नाही चाड मज ॥१७॥
नामा म्हणे केशवा जन्मजन्मांतरी | ऋणी करिन हरी ऋणे सेवा ॥१८॥
