गणेश पूजोनिया विधीने
51.
गणेश पूजोनिया विधीने ।
प्रवर्तला सृष्टिकर्मा विधाने॥
यालागि मी वंदि श्रीमोरयासी ।
छेदीन मी मीपण संशयासी ॥१॥
वंदूनिया जाण सरस्वतीला ।
देईल ते सिद्ध-महामतीला॥
तेणे गुणे वर्णिन देवराया ।
बुद्धीसि जो बोधक, दे वरा या ॥२॥
यानंतरे सद्गुरुराज वंदू ।
जो हा स्वबोध-निजज्ञान सिंधू॥
पूजीन मी मानसपूजनाते ।
त्रैलोक्याची अर्थ करू मनाते ॥३॥
यानंतरे संतमहंतसाधू ।
सजूनिया वर्ताति जे विषादू॥
तया नमो अद्वय निश्चयाने ।
ज्याच्या वरे जोडति मोक्षयाने ॥४॥
आता नमो जाण कुळांबिकेला ।
जीच्या वरे सन्मतिलाभु केला॥
अखंड हे हद्गत होय माते ।
नमोनिया श्रीकुलअंबिकेते ॥५॥
आता नमो सज्जन श्रोतयांसी ।
असा तुम्ही सावध मी जयासी॥
पावेन मी तै तुम्हास माने ।
यालागि मी प्रार्थितसे क्रमाने ॥६॥
डोलेल जै मस्तक श्रोतयाचा ।
पावेन तै भाव महाजनाचा॥
बहेणि म्हणे प्रार्थित याचिलागी ।
अखंडता घ्याउनिया प्रसंगी ॥७॥
