वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ४५. लक्ष्मणाचा त्याग

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088353 · अभंग क्र. ४५

45.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय पंचेचाळिसावा ॥
श्रीराम व बंधूंचा विचारविनिमय

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

समीप करोनि तिघे बंधु । तयांप्रति बोले कृपासिंधु ।
मुख कोमाइले नयनी बिंदु । अंबकाचे पडताती ॥१॥
अंग चळचळां कांपत । आकुळ व्याकुळ होय चित्त ।
बोलता तोंड कोरडे पडत । अवस्था आकळित राघवा ॥२॥
अंतरी राम चैतन्यघन । बाह्य चिंतातुर दीन ।
अंतरी राम सुखसंपन्न । बाह्य उद्वेगें मन व्यापिले दिसे ॥३॥
अंतरी राम नैराश्य । बाह्य दाखवी आशापाश ।
अंतरी श्रीराम सर्वज्ञ परेश । बाह्य विचार पुसतसे ॥४॥
अंतरी श्रीराम सुखसागरु । बाह्य दिसे व्यवहारी अति चतुरु ।
अंतरी श्रीराम सद्गुरू । बाह्य नरावतारू भासत ॥५॥
ऐसा श्रीराम लीलाविग्रही । नानावतार धरी पै देही ।
देहबुद्धि तया नाही । व्यापकपणें करोनिया ॥६॥
कनकमृगारी सर्वांप्रती । बोलतसे ऐका निश्चिती ।
तुमचे कल्याण हो आणि श्रीमंती । यश कीर्तीं वृद्धी पावो ॥७॥
ऐका होवोनि सावधान । नगरी वृत्तांत वर्तला अति गहन ।
पुरी पाटणीं वसती जन । त्यांचे वर्तमान अवधारा ॥८॥

श्रीरामांची सीतेच्या निंदेमुळे चिंता :

माझे सीतेची निंदा करिती । नाना अपवाद इसी ठेविती ।
घरोघरी हेंचि वदती । लोक बोलती जानकीसी ॥९॥
अधर्म माझे वदती जन । तेणे चिंतातुर मी गहन ।
याकारणें तुम्हांसि पाचारुन । काय म्या आपण करावे ॥१०॥
आम्ही इक्श्वाकुकुळींचे भूपती । आमुचे पूर्वजीं केली कीर्ती ।
जितीं प्रार्थून उमापती । मागितली भागीरथी स्नानार्थ ॥११॥
मिथिलाभवनीं विदेहजनक । शास्त्रीं पुराणीं प्रसिद्ध एक ।
धर्मपरायण पुण्यश्लोक । ज्ञान सुभट जयाचे ॥१२॥
तयाची जानकी कुमारी । इचें कुळ प्रसिद्ध चराचरी ।
उभय कुळें वंद्य सुरासुरी । प्रसिद्ध प्रौढी तैसीच ॥१३॥
जाणतसां दंडकारण्यीं । वसती केली आम्ही तिघां जणीं ।
तेथे रावण दुरात्मा येवोनी । जानकीसी हरिले तेणे ॥१४॥
म्या रावणासी मारुन । जानकी सोडविली हे सत्य जाण ।
तेव्हांच म्या केले अव्हेरण । लोकलाजेसी भिवोनी ॥१५॥
जानकी मज संमुख येवोनी । इसी मी विमुख होवोनी ।
ते काळी सर्वही सुरगणी । थोर आश्चर्य पाविजेलें ॥१६॥
मग जानकी सुंदरी । दिव्य देती झाली ते अवसरी ।
देवा देखता वैश्वानरीं । प्रवेशली ते काळी ॥१७॥
सीतेनें दिव्य दिधले । इंद्रें माझे प्रार्थन केले ।
तेव्हा लक्ष्मणे विनविले । जानकीतें अंगीकारा ॥१८॥
मान देवोनि समस्तांच्या वचना । म्या अंगिकारिली हे शुभानना ।
माझिया हृदयींची भावना । निष्पाप देखोनि अंगीकारिली ॥१९॥
आकाशपथीं पंच भूते । तीही म्हणती निष्पाप जानकीतें ।
अंगीकारावे समर्थे । कृपा करोनि श्रीरामा ॥२०॥
शशिसूर्यमहेंद्रीं मजप्रती । करी ओपिली जानकी सती ।
यासि साक्ष प्रत्यक्ष सौमित्री । त्या काळी जवळी होता ॥२१॥
ऐसा शुद्ध समाचार । लंकाद्वीपी देखता सुरवर ।
वर्तला हा सत्य साचार । तुम्ही सकळीं जाणिजे ॥२२॥
मग हे जानकी सुंदरी । सहित प्रवेशलों पितृपुरीं ।
ऐसे असता जन घरोघरी । नानापरींचें बोलती ॥२३॥
यालागी आता क्षणक्षण । होतो माझा विकळ प्राण ।
नगरलोकांसि भिवोन । प्राणत्याग करावा ॥२४॥

अपकीर्तीहून मरण बरे ! किर्तीसठी सर्व काही :

अपकीर्तींचे जे जिणे । लोकांमध्ये लाजिरवाणे ।
याहीपरीस भले जीव देणे । परी जिणें नये कामा ॥२५।
अपकीर्ती निंदिजे जनी । कीर्ती वंदिजे वेदीं पुराणीं ।
कीर्ती आपुली ऐकोनी । सर्वांसि उत्साह होतसे ॥२६॥
कीर्तीकारणें जे जन । करिताति व्रतें तपें दान ।
कीर्तीकारणें यज्ञाचरण । स्वये जाण आचरिती ॥२७॥
कीर्तीं तुळापुरुषदान । कीर्तींकारणें यजनयाजन ।
कीर्तीकारणें अन्नदान । घरोघरी जन करिताती ॥२८॥
कीर्तीकारणें शास्त्रपठन । कीर्तीकारणें तर्कव्याख्यान ।
कीर्तीकारणें करिती छळण । वादी ब्राह्मण एकमेका ॥२९॥
कीर्तीकरणें विजनी पाणी । पाजिताती पोही घालोनी ।
कीर्तीकारणें पंचाग्निसाधनीं । धूम्रपानी प्रवर्तती ॥३०॥
ऐसे जाणा कीर्तीचें सुख । अपकीर्तींचें परम दुःख ।
तरी आता तू सौमित्रा आइक । एक विचार सांगतो ॥३१॥

सीतेला वनांत वाल्मीकीच्या आश्रमी पोचविण्याची आज्ञा :

हा मध्यारात्रीचा भर । निशाअंतीं उगवे दिनकर ।
सुमंतें अधिष्ठिला जो रहंवर । त्यावरी जानकी बैसवीं ॥३२॥
गंगेचे परपारीं आपण । वाल्मीकाश्रम परम पावन ।
गंगातमसांचा संगम । तेथे वन गहन पै आहे ॥३३॥
तया वनी वृक्ष दीर्घ । वसताती जंबुक व्याघ्र ।
आणि क्रूर जीव अनेग । वन आश्रयोनि राहिले ॥३४॥
शीघ्र करावे या कार्यासी । विलंब झणी येथे करिसी ।
अथवा मनींही विचारिसी । तरी अनर्थ होईल ॥३५॥
तेथे नेवोनि हे सुंसरी । सोडावी त्या विघ्नांभीतरी ।
हे माझी आज्ञा अवश्य करी । मज सुख व्हावया ॥३६॥
हे जानकीस कळो न द्यावे । आणि कोणा न सांगावे ।
शीघ्र विलंबा न करावे । झडकरी जावे निजगृहा ॥३७॥
श्रीरामाज्ञा वंदोनि शिसी । लक्ष्मण निघाला स्वभुवनासी ।
मार्गीं चिंतातुर अति क्लेशी । सुख मानसी पै नाही ॥३८॥
येरीकडे बंधूंसह रघुनंदन । बाष्प कंठी करी रुदन ।
नयनी अश्रूंचे पूर जाण । मुख कोमेजून पै गेले ॥३९॥
अनुजांसहवर्तमान । प्रवेशला निजभवन ।
पुढील सीतावनाभिगमन । सावधान अवधारा ॥४०॥
एका जनार्दना शरण । रामे गोड रामायण ।
श्रीराम तारक ब्रह्म पूर्ण । सच्चिदानंदघन श्रीराम ॥४१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीरामसहबंधुविचारोनाम पंचचत्वारिंशोऽध्यायः ॥४५॥ ओंव्या ॥४१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग