वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ४०. सीतेचे सभेत आगमन

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088354 · अभंग क्र. ४०

40.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय चाळिसावा ॥
वानरांचे स्वदेशी गमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामांकडून सुग्रीवाची प्रशंसा व त्याची पाठवणी :

तदनंतर ऋक्ष वानर-राक्षस । अयोध्येसीं आनंदें बहुवस ।
क्रमिला तेथे एक मास । सुखउल्हास सर्वांसी ॥१॥
वानररावो जो भूपती । तयाप्रति बोले श्रीरघुपती ।
तुझे उपकार आठविता चित्ती । थोर सुख होतसे ॥२॥
तुझेनि संगें वानर । मिळाले गा अपरंपार ।
तुझेनि मज सीता सुंदर । प्राप्त झाली किष्किंधेशा ॥३॥
तरी आता आपुले नगरासी । वेगी जावे किष्किंधेसी ।
जे का अटक देवा दैत्यांसी । काळाचे तिसी न चले कांही ॥४॥
ऐसिया किष्किंधेप्रती । राज्य करी गा वानरपती ।
पाळीं प्रधान सेना संपत्तीं । निष्कंटक राज्य करी ॥५॥

सुग्रीवाला उपदेश :

महाबहो किष्किंधानाथा । परम प्रीतीने पाहे तारासुता ।
जैसा पिता तैसा चुलता । पुत्रत्वें पाळीं तयाते ॥६॥
अंगद वीर धीर परम शूर । सज्ञान ज्ञाता विवेकी चतुर ।
त्यावरी कृपा करी अपार । हा गुणसागर अंगद ॥७॥
हनुमंताते परम प्रीती । तू प्रधानत्वे पाही गा नृपती ।
जयाची वानिता गुणकीर्तीं । दुसरा क्षिती ऐसा नाही ॥८॥
मारुतीची मारुतीस उपमा । आन नाही ग वानरोत्तमा ।
याकारणें वर्णावया आम्हा । उत्कंठा होत नाही ॥९॥
सुषेण तुझा श्वशुर । तारेचा पिता महाशूर ।
आणीक तार वानर । परमधीर संग्रामी ॥१०॥
कुमुद महादुर्धर्ष । नीळ वानर रणकर्कश ।
शतबळीनामा शूर बहुवस । नामेंच त्रास परवीरां ॥११॥
मैंद द्विविद गंधमादन । गज गवाक्ष गवय शरभ जाण ।
हेमकूट तपन ध्वज वैद्य सुषेण । प्रतपन केसरी तरु तराळ ॥१२॥
नळ जो शिळातारक । विश्वकर्मा जयाचा जनक ।
सेतुकार्या निपुण अधिक । राक्षसा धाक बहु त्याचा ॥१३॥
जांबवंतादि ऋक्षगण । मजकारणें कष्टले दारुण ।
मजलागी इहीं त्यजिला प्राण । प्रिय पुत्र धन सांडोनी ॥१४॥
या समस्तातें पाळीं प्रीति करुन । अन्यथा न करी माझे वचन ।
माझे स्वरुप सनातन । तेथे मन ठेवोनी ॥१५॥
माझे स्वरुपी ठेवोनि मनासी । राज्य करी सुखसंतोषीं ।
ऐसे आज्ञापोनि सुग्रीवासी । परम प्रीतीसी कारोनी ॥१६॥

सुग्रीवाची प्रशंसा व त्याला श्रीरामाचा निरोप :

तदनंतर श्रीरघुपती । बिभीषणेंसीं अति युक्ती ।
मधुराक्षरीं अक्षरपंक्ती । बोलता झाला श्रीराम ॥१७॥
की चकोराचें देखोनि आर्त । हृदयी जाणोनि अति क्षुधित ।
तयासि इंदु सुधा देत । तैसा श्रीरघुनाथ बोलता झाला ॥१८॥
श्रीराम म्हणे बिभीषणा । तू आमुचा बंधु सुहृद प्राणा ।
तुझे उपकार वर्णावया मज रघुनंदना । वाचे वळण पडतसे ॥१९॥
अगा धर्मज्ञा लंकापती । राक्षसकुळी तू धर्ममूर्तीं ।
आता शीघ्र स्वपुरीप्रती । जाई जियेप्रती परिघ सागरु ॥२०॥
पूर्वी कुबेरापासून । हरिले लंकाभवन ।
बंधूसि देवोनि अपमान । अनुचित दारुण रावणे केले ॥२१॥
जरी स्वधर्मे राज्य करिता । सर्वभूती दया समता ।
तयाच्या राज्या क्षयो कल्पांता । न येता तत्वता निर्धारे ॥२२॥
जनकादिका केवळ मुक्त । आसोनि प्रपंचीं वर्तत ।
जगत् ब्रह्मस्वरुप देखत । मुळींचें अन्वयेंकरोनी ॥२३॥
तरीं तू बिभीषणा अवधारी । तू राज्य ब्रह्मत्वे करी ।
अधर्माचा लेश पुरी । माजि प्रवेशों न घ्यावा ॥२४॥
बंधु ज्येष्ठ तुझा कुबेर । तयाचा करावा आदर ।
आणीक वृद्ध थोर थोर । ते ब्रह्मदृष्टीं पहावे ॥२५॥
मज तुम्ही दोघे जण । परम प्रीतिमात्र पढियंते पूर्ण ।
तुमचे मी अहर्निशी स्मरण । मनामाजीं करीतसें ॥२६॥
आता तुम्ही दोघे जण । स्वसैन्येंसीं करावे गमन ।
सांडा हृदयीचें दुःख दारुण । परमानंदे पूर्ण पै जावे ॥२७॥
ऐकोनि श्रीरघुनाथाचें वचन । ऋक्ष वानर राक्षसगण ।
म्हणते झाले धन्य धन्य । सूर्यवंशाभरण श्रीराम ॥२८॥
समस्त म्हणती रावणारी । तुझिया वचनामृताची तरी ।
भरली आमुच्या हृदयसागरीं । मर्यादेवेगळी मिसळली ॥२९॥
तुझे वचन ब्रह्मलिखित । तू विधात्याचा विधाता निश्चित ।
तू ब्रह्म सदोदित । श्रुतीतें अंत न कळे तुझा ॥३०॥

मारुतीची प्रार्थना :

तदनंतर मारुती । स्वामीप्रति करी विनंती ।
म्हणे प्रसन्न झालेती रघुपती । तरी मी एक मागतसें ॥३१॥
तुझी कृपा मजवरी । जरी आहे गा रावणारी ।
तरी तुझी भक्ति मम हृदयाभीतरी । चिरकाळ राहो दातारा ॥३२॥
जंववरी तुझे चरित्र । भूमंडळी राहे निश्चित ।
तंववरी माझ्या शरीरांत । प्राण राहो दातारा ॥३३॥
तुझे कथेचीं आर्ती । अखंड राहो माझ्या चित्ती ।
आणीक मी न मागे रघुपती । इतुके देई दातारा ॥३४॥
ऐकोनि हनुमंतमुखींची गोष्टी । श्रीरामासि आनंद पोटी ।
धांवोनि खेंवा दिधली मिठी । पाठी थापटी श्रीराम ॥३५॥

रामांचे वरदान :

श्रीराम म्हणे गा मारुती । संतोषलों तुझिये भक्ती ।
जे जे अपेक्षा तुझे चित्ती । ते ते त्रिशुद्धी पावसी ॥३६॥
लोकालोक जंवपर्यंत माझे चरित्र ।
जोंपर्यंत जन स्वधर्मीं रत । तंवपर्यंत कथा असे ॥३७॥
माझी कथा हे भूमंडळी । तंववरी तुझे हृदयस्थळीं ।
असतील जंव अंतराळी । शशी सूर्य भ्रमण करित ॥३८॥
दिव्य रत्नांचा हार । चंद्रासारिखा मनोहर ।
श्रीरामे काढोनि सत्वर । हनुम्याकंठीं घातला ॥३९॥

रामांचा निरोप घेऊन जड अंतःकरणाने सर्वजण निघाले :

हनुमान लागला पायी । सवेंचि आलिंगिली दोही बाही ।
श्रीरामप्रदक्षिणा करोनि वज्रदेही । निजस्थळासी निघाला ॥४०॥
सुग्रीवे करोनि प्रदक्षिण । अंगदासहित वंदोनि चरण ।
निघते झाले स्वराज्या जाण । आज्ञा घेवोन रामाची ॥४१॥
बिभीषणेंही तैसेच परी । नमस्कारिला निजबंधूचा अरी ।
समस्ता अश्रु आले ते अवसरी । सद्गदित कंठ पै झाले ॥४२॥
जैसे मूर्खाचे भ्रमे चित्त । भ्रांत होय न स्मरे हित ।
तैसे श्रीरामवियोगें अति दुःखित । आपुलाले दिशे चालले ॥४३॥
जैसा कृपणाचा जाय ठेवा । आणि भ्रांति उपजे त्याच्या जीवा ।
तैसे समस्ता झाले तेव्हा । श्रीरामाच्य वियोगें ॥४४॥
श्रीरामसन्निधानेंकरुन । पावन झाले ऋक्षवानरगण ।
बिभीषणादि राक्षस जाण । झाले पावन तिही लोकी ॥४५॥
एका जनार्दना शरण । वानरी स्वदेशा केले गमन ।
मागे श्रीरामे सभा विसर्जून । केले मध्यान्हभोजन ॥४६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
समस्तवानरादिस्वदेशगमनं नाम चत्वारिंशोऽध्यायः ॥४०॥ ओंव्या ॥४६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग