पुण्य फळले बहुता दिव
171.
पुण्य फळले बहुता दिवसा । भाग्य उदयाचा ठसा ।
झालो सन्मुख तो कैसा । सन्तचरण पावलो ॥१॥
आजि फिटले माझे कोडे । भव दु:खाचे सांकडे ।
कोंदाटले पुढे । परब्रम्ह सांवळे ॥२॥
आलिंगने संताचिया । दिव्य झाली माझी काया ।
मस्तक हे पाया । वरी त्यांच्या ठेविता ॥३॥
तुका म्हणे धन्य झालो । सुखे संतांचिया धालो ।
लोटांगणी आलो । पुढे भार देखोनी ॥४॥
