वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › १९, कापडी अभंग ९६९ ते ९७०

आम्ही कापडी रे आम्ही

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074731 · अभंग क्र. ९६९

969.
आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे ।
पापे बारा वाटा पळती बापडी रे ॥१॥
पंढरपुरीचे आम्ही कापडी रे ।
उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे ॥२॥
आजी पाहाले रे आजी पाहाले रे ।
संतसंगति सुख जाले रे ॥३॥
समता कावडी रे समता कावडी रे ।
माजी नामांमृत भरिले आवडी रे ॥४॥
येणे न घडे रे जाणे न घडे रे ।
निजसुख कोंदले पाहाता चहूंकडे रे ॥५॥
नलगे दंडणे रे नलगे मुंडणे रे ।
नाम म्हणोनी कर्माकर्म खंडणे रे ॥६॥
दुःख फिटले रे दुःख फिटले रे ।
बापरखुमादेविवर विठ्ठले रे ॥७॥

अर्थ :
आम्ही कापडी म्हणजे यात्रेकरू आहोत. आमच्याकडे बघून पातके बारा वाटेला पळून जातात. आम्ही पंढरपूरचे यात्रेकरू असून आमचा रस्ता उत्तरपंथाचा म्हणजे ज्ञानाचा आहे. अशी आम्ही यात्रा करित असल्यामुळे आमच्या ठिकाणी ज्ञानरूपी सूर्याचा उदय झाला. आणि आम्हाला ब्रह्मसुख लाभले. याला कारण संतांची संगती हे होय. सर्वत्र ब्रह्मस्वरूप भरलेले आहे. अशा तऱ्हेच्या कावडी आम्ही खांद्यावर घेतल्या आहेत. त्या कावडीमध्ये प्रेमभरीत नामामृत भरले आहे. त्यामुळे जन्माला येणे अगर मरणे याची आम्हाला आवश्यकता उरली नाही. एक ब्रह्मसुखच भरले आहे. असा आमचा निश्चय झाला. याकरिता आम्हाला दंडण, मुंडण वगैरे काही करावे लागत नाही. एकनिष्ठपणाने आम्ही नामस्मरण करित असल्यामुळे आमच्या ठिकाणी कर्म अकर्म इत्यादिकांचे खंडण होऊन गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या नामस्मरणामुळेआमच्या ठिकाणच्या सर्व दुःखाची निवृत्ति होऊन गेली. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग