एकी एकटेचि असोनि एकल
211.
एकी एकटेचि असोनि एकला । विश्वी विश्वाकार होऊनिया ठेला ।
जयापरी वो तैसाची गमला । नंदनंदन हा आचोज अंबुला वो ॥१॥
ऐशा गौळणी त्या बोलती परस्परी । करूनि विस्मय आपुल्या अंतरी ।
विश्वलाघविया हाचि चराचरी । नेणो महिमा यासी म्हणो व्यभिचारी वो ॥२॥
गिरी गोवर्धन येणे उचलिला । काळिया महासर्प नाथूनि आणिला ।
जळत वणवा वो मुखेचि पाशिला । गिळिता अघासुर चिरूनि सांडिला वो ॥३॥
कपट्या माभळभटा दिले पिढे दान । शोषिली पूतना विषे पाजितांची स्तन ।
उखळी बांधिता उपटिले विमळार्जुन । भक्षूनि मृत्तिका वदनी दाविली भुवने वो ॥४॥
आणिखी एक येणे नवलावो केला । काला वाटिता वो विधाता ठकविला ।
भाग नेदिता तो वत्से गोवळ घेऊनि गेला । तैसीच आपण येथे होऊनिया ठेला वो ॥५॥
इंद्र चंद्र महेंद्र यातेचि पूजिती । श्रुति शाखे तेही यातेचि स्तविती ।
महासिद्ध मुनि ध्यानी आराधिती । निळा म्हणे तो हा जोडला सांगाती वो ॥६॥
