विठोबा मला मूळ धाडा
339.
विठोबा मला मूळ धाडा । धावत येईन दुडदुडां ।
चरणी लोळेन गडबडा । माझा जीव झाला वेडा ॥1॥
कर ठेवूनि कटावरी । उभा राहिला विटेवरी ।
मुकुट घातला सरी । कलगी खोविली वरी ॥2॥
पितांबर नेसूनिया पिवळा । गळा पै तुळसीच्या माळा ।
की रुप सुंदर सावळा । तेज झळके झळाळा ॥3॥
नामदेवाचे कौतुक । मला सांपडले माणीक ।
विठोबा पाहुनी तुझे मुख । हारपली माझी तहान भूक ॥4॥
विठोबा तुझी संगत बरी । जैसा चंदन मैलागिरी ।
संत चालले पंढरी । निशाण पताका जरतारी ॥5॥
जसी मोहोळासी लुब्ध मासी । तसी तू सखी माझी होसी ।
सुख दुःख सांगेन तुजपासी । माझा जीव होईल खुषी ॥6॥
काळी मध्यान रात्र झाली । फेरी विठ्ठलाची आली ।
जनी म्हणे चूक पडली । भेट नाही विठ्ठलाची झाली ॥7॥
