सुनियाचा हाचि भाव ।
2901.
सुनियाचा हाचि भाव । आपुला ठाव राखावा ॥१॥
दुजियाचा येऊ वारा । नेदू घरावरी देऊ ॥धृपद॥
केली याची फाडाफाडी । तडामोडी क्षेत्राची ॥२॥
पातेजत नाही लोका । देव तुका वाचूनि ॥३॥
अर्थ :
कुत्र्याचे हेच काम आहे की घरमालकाच्या घराचे रक्षण करावे त्याप्रमाणे भक्ती करताना भक्तरुपी कुत्र्याने आपल्या नीजस्वरुपरुपी घराचे रक्षण करावे. त्या कुत्र्याने दुसऱ्या कोणाचा वारा देखील आपल्या घरावर येऊ देऊ नये त्याप्रमाणे भक्तरुपी कुत्र्याने व्दैतरुपी वारा आपल्या अव्दैतरुपी घरावर येऊ देऊ नये. जर आपल्या अव्दैत स्थितीवर काम क्रोध विकारांनी चाल केली तर त्याचे क्षेत्र म्हणजे मन व बुध्दी याची तोडामोड करुन विकारांची फाडाफाडी करावी. तुकाराम महाराज म्हणतात, मी वरती जे तुम्हाला लक्षण सांगितले आहे त्या लक्षणाचाच मी देवाचा एक दक्ष कुत्रा आहे त्यामुळे देवाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझ्यावाचून इतर कोणत्याही लोकांवर देवाचा विश्वास नाही.
