गौळणींचा आकांत - अभं
264.
गौळणींचा आकांत - अभंग २६४
गौळणी म्हणती यशोदेला । कोठे गे सांवळां । का रथ शृंगारिला ।
सांगे वो मजला । अक्रुर उभा असे बाई गे साजरी ॥१॥
बोले नंदाची आंगणी । मिळाल्या गौळणी ॥धृ.॥
बोले नंदाची पट्टराणी । सद्गदेत होउनी । मथुरेसी चक्रपाणी ।
जातो गे साजणी । विव्हळ झाले मन वचन ऐकोनी ॥२॥
अक्रुरा चांडाळा । तुज कोनी धाडिला । का घातां करु आलासी ।
वधिशी सकळा । अक्रुरा तुझे नाम तैशीच करणी ॥३॥
रथी चढले वनमाळी । आकांत गोकूळीं । भूमि पडल्या व्रजबाळी ।
कोण त्या सांभाळी । नयनींच्या उदकांनें भिजली धरणी ॥४॥
देव बोले अक्रुरासी वेगे हांकी रथासी । या गोपींच्या शोकासी ।
न पहावेंमजसी । एका जनार्दनी रथ गेला निघोनि ॥५॥
