येऊनि नरदेहा झाकितील
2264.
येऊनि नरदेहा झाकितील डोळे । बळे चि अंधळे होती लोक ॥१॥
उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनिया ॥धृपद॥
बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढे नाही ऐसा लाभ मग ॥२॥
तुका म्हणे जाऊ सादावीत वाट । भेटे तरी भेटो कोणी तरी ॥३॥
अर्थ :
काही लोक नरदेहा सारख्या उत्तम योनीला जन्माला येऊन देखील डोळेझाकपणा करून बळेच आंधळे होतात. ज्ञानाच्या मदतीने हे लोक का जाणून घेत नाहीत की पुढे हा नरदेह आपल्याला मिळणार नाही आणि परमार्थाची वाट तरी हे का चालत नाहीत? चौऱ्यांशी लक्ष योनी च्या फेऱ्याचा वळसा घालून मग कुठेतरी आपल्याला मनुष्यदेह मिळालेला आहे याचा जर आपण योग्य वेळी फायदा करून घेतला नाही तर पुढे या प्रकारचा लाभ आपल्याला होणार नाही हे यांच्या का बर लक्षात येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी लोकांना अशा प्रकारचे उपदेश करून सावध करत वाटेने चालत जात आहे जर माझा उपदेश ऐकणारा मला कोणी भेटला तर भेटला.
