भवसिंधुचा पार तरे तो
809.
भवसिंधुचा पार तरे तो पोहणार । बळिया परम धीर भजनशील ॥१॥
नामची सांगडी लावूनि कासे । दृढ प्रेमरस वोसंडती ॥२॥
सत्वाचा सुभट असंग एकट । वैराग्य उद्भट निर्वासन ॥३॥
कामक्रोध जेणे घातले तोडरी । निर्दाळिले वैरी लोभदंभ ॥४॥
रजतमाचे जेणे तोडिले अंकुर । केला अहंकार देशधडी ॥५॥
नामा म्हणे जया नामी अनुसंधान । तोचि परम धन्य त्रिभुवनी ॥६॥
