सहज मी आंधळा गा निजन
82.
सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथे । वृत्ति हे निवृत्ति जाली जन न दिसे तेथे ।
मी माजी हारपले ठायी जेथींचा तेथे । अदृश्य ते चि जाले कांही दृश्य जे होते ॥१॥
सुखी मी निजलो गा शून्य सारूनि तेथे । त्रिकूटशिखरी गा दान मिळे आइते ॥धृ॥
टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा ।
न मागे मी भीक आता हा चि जाला भरवसा । वोळली सत्रावी गा तिणे पुरविली इच्छा ॥२॥
ऊर्ध्वमुखे आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद ।
घेऊनि आला दान निजतत्व निजबोध । स्वरूपी मेळविले नांव ठेविला भेद ॥३॥
शब्द हा बहुसार उपकाराची राशी । ह्मणोनि चालविला मागे येतील त्यांसी ।
मागोनि आली वाट सिद्धओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥४॥
वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ठाव ।
ह्मणोनि संग टाकी सेवी अद्वैत भाव । तुका म्हणे हा चि संती मागे केला उपाव ॥५॥
