॥ श्रीएकनाथमहाराजकृत
15.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय पंधरावा ॥
अकंपन व वज्रदंष्ट्र यांचा वध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
धूम्राक्षं निहतं श्रुत्वा रावणो राक्षसेश्वरः ।
क्रोधेन महताविष्टो निःश्वसन्नुरगो यथा ॥१॥
दीर्घमुष्णं च निःश्वस्य क्रोधेन कलुषीकृतः ।
अब्रवीद्राक्षसं क्रूरं वज्रदंष्ट्रं महाबलम् ॥२॥
गच्छ त्वं वीर निर्याहि राक्षसैः परिवारितः ।
जहि दाशरर्थि रामं सुग्रीवं वानरैः सह ॥३॥
तथे त्युक्त्वा द्रुततरं मायावी राक्षसेश्वरः ।
निर्जगाम बलैः सार्धं बहुभिः परिवारितः ॥४॥
धूम्राक्ष राक्षस बळवंत । त्याचा हनुंमतें केला घात ।
ते ऐकोनि लंकानाथ । क्रोधान्वित अति दुःखे ॥१॥
धूम्राक्षाचें युद्धमरण । ऐकोनि स्वये रावण ।
सर्पप्राय फुंपावे पूर्ण । क्रोधे प्राण त्यजूं पाहे ॥२॥
रावणाने वज्रदंष्ट्रास पाठविले :
धीर वीर महाशूर । वज्रदंष्ट्र निशाचर ।
त्यासी सांगे दशशिर । युद्धा सत्वर निघावें ॥३॥
रणा जावोनि आपण । मारावे राम लक्ष्मण ।
अंगद सुग्रीव कपिगण । हनुमान साधन धरावा ॥४॥
राक्षसांचा दुर्धर भार । सबळ सेनेसीं सपरिवार ।
सहराम मारावे वानर । लहान थोर शोधूनी ॥५॥
वज्रदंष्ट्राचे ससैन्य प्रयाण :
ऐकोनि रावणाचे वचन । वज्रदंष्ट्र उल्लासोन ।
वंदोनियां दशानन । निघे आपण संग्रामा ॥६॥
मुकुट कुंडले बाहुभूषणें । केयूरन्वित करकंकणें ।
अंगत्राण शिरस्त्राणें । करत्राणें गोधांगुळी ॥७॥
वज्रदंष्ट्र वीर दारुण । लेवोनियां रणाभरण ।
सज्जोनिया धनुष्यबाण । निघे आपण संग्रामा ॥८॥
वाजी पदाती खर उष्ट्र । वाहनारुढ निशाचर ।
रथ ध्वजी मत्त कुंजर । सैन्यसंभार सज्जूनी ॥९॥
विचित्र पताका कडकडाट । रथ चालिले धडधडाट ।
विचित्रध्वज अति वरिष्ठ । वीर उद्भट चालिले ॥१०॥
हेमाभरणीं सालंकृत । ध्वजपताकीं रथ शोभत ।
वज्रदंष्ट्र् बैसला तेथ । दक्षिणावर्त साधूनी ॥११॥
गदापरिघबाणयुत । खड्गतोमरशूळहस्त ।
एक वीर मुशलान्वित । एक झेलित मुद्गल ॥१२॥
वोडणखर्गें महावीर । एक पायींचे धनुर्धर ।
पायदळाचे मोगर । वीर झुंजार गर्जती ॥१३॥
वीरांअंगी आंगवण । कांसा घातल्या नानावरण ।
अंगप्रत्यंगी रणाभरण । उल्लास पूर्ण युद्धाचा ॥१४॥
दोही बाही गजथाट । गजयोद्धे वीर उद्भट ।
शूळ त्रिशूळ तोमर निकट । गजघट चालविती ॥१५॥
गजयुद्धाच्या व्युत्पत्ती । त्या दाविती गतिविगति ।
परसैन्या लाविती ख्याती । दाविती युद्धी रणमारे ॥१६॥
अश्वगजरथघडघडाट । वीरी वीरांचा कडकडाट ।
दक्षिणद्वारें सैन्यसंघात । वज्रदंष्ट्र निघाला ॥१७॥
निःसृतो दक्षिणद्वारादंगदो यत्र यूथपः ।
तेषां निष्काममाणानामशुभं समजायत ॥५॥
अंगद यूथप दक्षिणद्वारी । सैन्य निघतांचि बाहेरी ।
तेथे जाली नवलपरी । निशाचरीं अशुभार्थ ॥१८॥
उलूक तळपोनि अंबरीं । बैसला वज्रदंष्ट्रावरी ।
भालू भुंकती उंच स्वरीं । निशाचरीं अशुभार्थ ॥१९॥
वज्रदंष्ट्र वीर जेठी । अपशकून नाणी दृष्टी ।
युद्धा निघे उठाउठी । कडकडाटीं ससैन्य ॥२०॥
वानर राक्षस सैन्याचे युद्ध :
अंगदाचें वानरवीर । युद्धा मिसळले सत्वर ।
राक्षस हाणिती हतियेर । बहुप्रकारें वानरी ॥२१॥
मृदंग शंख भेरी गहन । काहळा वीणा आणि विषाण ।
रणी त्राहाटिले निशाण । आले स्फुरण उभयदळीं ॥२२॥
राक्षस हाणिती हतियेर । घाय चुकविती वानर ।
बाहुबळें निशाचर । रणी सत्वर उपटिती ॥२३॥
वानर आणि निशाचर । युद्धा मिसळले दुर्धर ।
घाय हाणिती निष्ठुर । येरयेरा नोकोनी ॥२४॥
शस्त्रे हाणिता निशाचर । गगनी उसळती वानर ।
घाय टाळूनि कपींद्र । करिती विचित्र ते ऐका ॥२५॥
धनुष्याचीं तोडिती शितें । आंसडोनि घेती शस्त्रांते ।
निःशस्त्र करोनि राक्षसांतें । मुष्टिघाते मारिती ॥२६॥
बाहुबळें महावीर । झोंबी घेताती दुर्धर ।
मल्लयुद्धींचा प्रकार । चमत्कार दाविती ॥२७॥
मुष्टिघात तळवेघात । चरणघात बाहुघात ।
वानर खवळले रणांत । करिती घात राक्षसा ॥२८॥
गुडघ्या खांदे कोंपरीं । तडवे हाणिती परस्परीं ।
धडका हाणोनियां उरीं । महामारी राक्षसा ॥२९॥
रणी वानर वृक्षहस्त । रथी सारथी साश्वरथ ।
अवघ्या करोनि एकघात । वीर कुंथत पाडिले ॥३०॥
वानर गगनी उसळोन । शिळा पर्वत पाषाण ।
टाकोनियां करिती चूर्ण । रण कंदन राक्षसा ॥३१॥
भग्नजानु भग्नकटी । वीर पाडिले कोट्यनुकोटी ।
वज्रदंष्ट्रेंदेखोनि दृष्टी । रणसंकटीं क्षोभला ॥३२॥
वानरी मारिले निशाचर । वाहती रुधिराचे पूर ।
देखोनि वज्रदंष्ट्र वीर । रथ सत्वर प्रेरिला ॥३३॥
स्वये वज्रदंष्ट्र आपण । सज्जोनिया धनुष्यबाण ।
साटोपोनि रणांगण । वानर सैन्य विधिलें ॥३४॥
रणोन्मत्त अति दुर्धर । बाण न गणिती वानर ।
तिही वेढिला वज्रदंष्ट्र । शिळा शिखरदुमपाणि ॥३५॥
रणी नाटोपती वानर । चिंतानिमग्न वज्रदंष्ट्र ।
सर्वसंहारक जे अस्त्र । अति दुर्धर योजिले ॥३६॥
वज्रदंष्ट्राच्या सर्वसंहारक अस्त्राचा प्रभाव :
तो बळवंत अस्त्रवेत्ता । करावया वानरांच्या घाता ।
होय अस्त्राते सोडिता । साटोपता समंत्र ॥३७॥
अस्त्रविद्येचें बळ गाढे । मागील मागे पुढील पुढे ।
वानरा भेटलें कुर्हाडे । चहूंकडे रणमार ॥३८॥
अस्त्रविद्येचिया बाणी । वानर पाडिले रणांगणी ।
एक उफळतां गगनी । पाडी विंधोनी साटोपे ॥३९॥
जेंवी पाहोनि प्रळयांत । अंतक करी जीवघात ।
तेंवी वानरा रणार्वत । असे करित वज्रदंष्ट्र ॥४०॥
देखोनि वानरांच्या भारा । क्रोधे कांपतसे थरथरां ।
सज्जोनिया बाणधारा । रणी वानरा निवटित ॥४१॥
अस्त्रविद्येचिये बाणी । वानरसेना भंगली रणी ।
अंगदे देखिली दुरोनी । आला गर्जोनी साटोपे ॥४२॥
भंगली देखोनी कपिसेना । अंगद कोपला चौगुणा ।
वृक्ष उपटोनियां जाणा । राक्षससेना निर्दाळी ॥४३॥
अंगदाचा आवेश व राक्षसांची दाणादाण :
सिंह देखतांचि दृष्टी । मृगें पळती बारा वाटीं ।
अंगदवृक्षघायासाठीं । राक्षसकोटी निमताती ॥४४॥
बळे हाणिता वृक्षघातीं । राक्षसशिरें पडती क्षिती ।
रुधिराचे पूर् वाहती । अंगदे ख्याती लाविली ॥४५॥
जे जे युद्धा संमुख येती । वृक्ष हाणिता रणी पडती ।
वृक्ष घेवोनिया हाती । अति आघाती मारित ॥४६॥
जेंवी प्रळयकाळींचा वन्ही । वाढे उदक निर्दाळूनी ।
तेवी राक्षस निर्दाळूनी । अंगद रणी खवळला ॥४७॥
मूळ छेदल्या वृक्ष लवंडती । तेंवी राक्षस पाडोनि क्षिती ।
गज रथ अश्व सारथी । वृक्षघातीं शतचूर्ण ॥४८॥
भंगिले रथ ध्वज विचित्र । युद्धें मारिले छत्रधार ।
छत्रभंगें अलंकार । हार केय़ूर लोळती ॥४९॥
मुकुट कुंडले सशिरें । बाहु लोळती सर्पाकारें ।
करकंकणें केयुरें । शस्त्रे वस्त्रे लोळती ॥५०॥
लोळती वस्त्रे अलंकार । तेणे शोभे भूमि विचित्र ।
शरत्काळीं जेंवी नक्षत्र । निशिं सचंद्र शोभत ॥५१॥
रणी मारिता निशाचर । वाहती रुधिरांचे पूर ।
तेणे भूमि भयंकर । अति दुस्तर भासत ॥५२॥
तुटोनि दूर गेलीं शिरें । अरुंडें लोळती शरीरें ।
गजकलेंवरें महाथोरें । अंगदवीरें पाडिलीं ॥५३॥
अंगदाचा पराक्रम :
देखोनि अंगदाच्या मारा । पळ सुटला निशाचरां ।
अवघी कांपती थरथरां । धीर वीरां न धरवे ॥५४॥
लागता वायूचा आघात । मेघमंडळ हताहत ।
तेंवी राक्षस समस्त । रणी पळत अति धांके ॥५५॥
राक्षसांचें सबळ दळ । अंगदे मर्दिलें सकळ ।
वज्रदंष्ट्रा महाबळ । कोपे प्रबळ चालिला ॥५६॥
इंद्रचापसमदुर्धर । विस्फारोनि धनुष्य घोर ।
नादें कांपे चराचर । महावीर वज्रदंष्ट्र ॥५७॥
इंद्रचापी नाद दुर्धर । तैसा धनुष्यी टणत्कार ।
लक्षोनि वानरांचा भार । शर दुस्तर सोडिले ॥५८॥
वज्रदंष्ट्रासवें शुर । निधडे भरंवशाचे वीर ।
रथी बैसोनि अपार । युद्धा दुर्धर मिसळले ॥५९॥
युद्धा मिसळतां निशाचर । कपिसेना दुर्धर वीर ।
युद्धा खवळले वानर । साश्व रहंवर उपडिती ॥६०॥
वानरसैन्याचिया कोटी । रणी पावल्या उठाउठी ।
राक्षसांच्या झोंटमिठी । रणी सनिष्ठीं भिडती ॥६१॥
राक्षसांचे निधडे वीर । त्याहून बळवंत वानर ।
युद्ध करिती घोरांदर । योद्धे दुर्धर पाडोनी ॥६२॥
राक्षस भिडती सर्वांगें । वानर न सरतीच मागे ।
पाय हाणिता पै रागे । करिती अष्टांगे शतचूर्ण ॥६३॥
बाणशूळत्रिशूळ घात । वृक्ष शिळां गिरी पर्वत ।
परस्परे घाय हाणित । रुधिरोक्षित महावीर ॥६४॥
अदट दाटुगीं वानरे । राक्षसांची छेदिती शिरे ।
बाहुभंगे निशाचरें । अवनी रुधिरे वाहती ॥६५॥
वानर रणी पडता जाण । लाविती श्रीरामचरणरेण ।
तेणे घाय कानपोन । उठती गर्जोन संग्रामी ॥६६॥
वानर वर्षती पर्वत । तेणे शस्त्रे चूर होत ।
राक्षस वीर पडिले बहुत । पर्वतपातमहामारें ॥६७॥
शिळाशिखरपर्वतपात । तेणे राक्षसा प्राणांत ।
बोंब उठली सैन्यांत । रणकंदनार्थ राक्षसा ॥६८॥
रणी पडले अति दुर्धर । काक बक श्येन घार ।
वृक जंबुक श्वान सूकर । मांस रुधिर भक्षिती ॥६९॥
शिरे गेली पै तुटोनी । कबंधे धांवती रणी ।
भूते नाचती गर्जोनी । घेती धणीं मांसाची ॥७०॥
राक्षसांचे भुजाभार । तुटोनि पडिले कर शिर ।
तेणे रणभूमि भयंकर । अति दुर्धर भासत ॥७१॥
युद्धी खवळोनी वानर । रणी पाडिले निशाचर ।
निशाचरीं करोनि मार । रणी वानर पाडिले ॥७२॥
वानर पडता निर्वाण झुंजें । सवेंचि उठती रामपदरजें ।
राक्षस पडती युद्धव्याजें । रणसमाजे प्राणांत ॥७३॥
श्रीरामबळे वनचर । रणी उद्भट वानरवीर ।
धाके पळती निशाचर । राक्षसभार भंगले ॥७४॥
वानरांच्या रणसंत्रासीं । भय घेवोनि राक्षसी ।
वज्रदंष्ट्राचे पाठीसी । चळकापेंसीं निघाले ॥७५॥
वज्रदंष्टा सांगती सकळ । वानरांचे प्रब बळ ।
तुम्ही येथोनि शिघ्र काढा पळ । शिळा कपाळ भेदिती ॥७६॥
पर्वतांच्या घाये जाण । शस्त्रे तितकी होती चूर्ण ।
आडवें न चले वोडण । वृथा प्राण का देता ॥७७॥
स्वबलस्य च घातेन अंगदस्य बलेन च ।
राक्षसः क्रोधमाविष्टो वज्रदंष्ट्रो महाबलः ॥६॥
विस्फार्य च धुनर्घोरं शक्राशनिसमप्रभम् ।
वानराणामनीकानि प्रकिरन्शरवृष्टिभिः ॥७॥
वज्रदंष्ट्रांचा कोपयुक्त प्रतिकार :
राक्षसांचे दीन वदन । सैन्य भंगलें देखोन ।
वज्रदंष्ट्र कोपायमान । धनुष्यबाण साज्जिले ॥७८॥
राक्षसांचें रणमर्दन । वानरी केले कंदन ।
ते वज्रदंष्ट्रे देखोन । ताम्रनयन क्षोभला ॥७९॥
धनुष्य घेवोनिया जाण । कंकपत्री सतेज बाण ।
करी वानरा विदारण । खोंचोनि बाण सर्वांगी ॥८०॥
वृक्ष शिळा शिखरें पर्वत । बाणी तोडिले समस्त ।
वानर पाडिले बहुत । क्षत विक्षत शरघातें ॥८१॥
बाणलाघवी विद्या पूर्ण । सात पांच नव जण ।
घाये पाडी आठ जण । केले कंदन वानरा ॥८२॥
घायीं अडकले असता शर । संमुख भिडती वानर ।
रामनामे बळ थोर । वज्रदंष्ट्र विस्मित ॥८३॥
देखोनि बाणमहामार । रणी भंगले वानर ।
अंगदापासी सत्वर । आले समग्र ठाकोनी ॥८४॥
जेंवी झाल्या व्यसन प्राप्त । पित्यापासीं ये अपत्य ।
तेंवी अंगदापासी त्वरित । आले धांवत वानर ॥८५॥
मोडली वानरांची सेना । वाळिसुतें देखोनि नयना ।
कोंप आला चौगुणां । घ्यावया प्राणा तयाच्या ॥८६॥
अंगद क्रोधे ताम्राक्ष । येवोनि वज्रदंष्ट्रासंमुख ।
पुनःपुन्हा पाहोनि मुख । मारु निःशंक चालिला ॥८७॥
निशाचर मज मारिती । हे भय नाही अंगदा चित्ती ।
करावया राक्षसांची शांती । भद्रजाती खवळला ॥८८॥
देखोनि अंगद महावीर । शिष्टाईचा हा वानर ।
येणे गांजिला दशशिर । निशाचर कांपती ॥८९॥
वज्रदंष्ट्राचे व अंगदाचे युद्ध :
देखोनिया वाळिकुमर । खळबळिला राक्षसभार ।
तेव्हा अंगदासमोर । वज्रदंष्ट्र स्वये आला ॥९०॥
मदोन्मत्त गज केसरी । दोघे भिडती तैशियापरी ।
घाय हाणिती नाना कुसरी । शिरी उदरी तळपोनी ॥९१॥
वज्रदंष्ट्रें धांवोनी । घाय हाणिता पडला अवनी ।
अंगद उसळला गगनी । उडी टाकोनी मारावया ॥९२॥
वज्रदंष्ट्र स्वये आपण । वर्मस्थान लक्षोन ।
वर्षे शतसहस्र बाण । घ्यावया प्राण अंगदाचा ॥९३॥
अंगद बाणे रुधिरोक्षित । रणभैरव रणोन्मत्त ।
तैसा रणरंगीं डुल्लत । करावया घात राक्षसा ॥९४॥
वज्रदंष्ट्राचे जे बाण । अंगदासीं तृणासमान ।
त्याचा घ्यावयासी प्राण । आला गर्जोन साटोपे ॥९५॥
त्याचा करावया चूर । सहस्रशाखांचा तरुवर ।
रागे उपटोनि दुर्धर । रणी सत्वर सोडिला ॥९६॥
आले देखोनिया झाड । राक्षसा थोर हडबड ।
घाये करी हो निवाडा । हाडेंहाड फोडूनी ॥९७॥
हडबडिले राक्षससैन्य । वज्रदंष्ट्र सावधान ।
कैसे केले रणकंदन । निवारण वृक्षाचें ॥९८॥
देखोनि वृक्षाचें पतन । वज्रदंष्ट्र सावधान ।
गदा साटोपे घेऊन । रथावरुन उडाला ॥९९॥
वज्रदंष्ट्र महाबळी । गदाघातें वृक्ष निर्दळी ।
छेदोनि पाडिला भूतळीं । पिटिली टाळी राक्षसी ॥१००॥
समापतंतं तं दृष्ट्वा रथादाप्लुत्य वीर्यवान् ।
गदापाणिरसंभ्रांतः पृथिव्यां समतिष्ठत ॥८॥
अंगदेन शिला क्षिप्ता गत्वा तु रणमूर्धनि ।
वज्रदंष्ट्रस्य शिरसि पातयामास वानरः ॥९॥
अंगदाचा वज्रदंष्ट्रावर शिलाघात :
अंगद वीर तेचि काळी । उडोनियां अंतराळीं ।
दीर्घ घेवोनिंया शिळी । घाली कपाळीं वज्रदंष्ट्रा ॥१॥
श्लाघोनि जंव बैसला रथांवरी । तंव शिळा बैसे येवोनि शिरी ।
कासावीस होत चांचरी । कष्टेंकरी पळाला ॥२॥
शिळा पडता रथावरी । रथ सारथी शस्त्रसामग्री ।
सचक्र सांटा अंक धुरी । केली चकचुरी ध्वजेंसी ॥३॥
शिळेतळी निजशरीर । चुकवोनि वांचला वज्रदंष्ट्र ।
तेणे कोपला वानर । पर्वत थोर उचलिला ॥४॥
नाना वृक्ष सुशोभित । उपटिला उचलोनि पर्वत ।
वज्रदंष्ट्रावरी घालित । क्रोधान्वित अंगद ॥५॥
घायापाठीं घायासी । येता राक्षस कासाविसी ।
निवारण नाठवे त्यासी । तंव पर्वत शिसी वाजला ॥६॥
पर्वत पडतांचि सबळ । त्याचे फुटोनियां कपाळ ।
जाला अशुद्धे बंबाळ । मूर्च्छा तत्काळ त्या आली ॥७॥
गदा टेंकोनि दोही हाती । मूर्च्छापन्न पडला क्षिती ।
मुहूर्त एक मूढमती । कांही स्फुर्ति स्फुरेना ॥८॥
वज्रदंष्ट्र पडता अवनी । बोंब उठली राक्षससेनीं ।
वानर नाचती रणांगणी । पाडिला रणी वज्रदंष्ट्र ॥९॥
उत्साह आणि आकांत । दोही दळांमाजी होत ।
मूर्च्छा भंगूनिया त्वरित । सावचित्त तो झाला ॥११०॥
वज्रदंष्ट्राचा गदाघात :
वज्रदंष्ट्र सावध होत । गदा घेवोनि क्रोधान्वित ।
लक्षोनिया वाळिसुत । त्याच्या वधार्थ धाविन्नला ॥११॥
गदा घेवोनि क्रोधेंकरीं । अंगद ताडिला उरावरी ।
तो न डंडळी तिळभरी । जेंवी का गिरि पर्जन्यें पै ॥१२॥
डंडळेना वाळिसुत । वृथा गेला गदाघात ।
अंगदे उडोनि धरिला हात । आला प्राणांत करावया ॥१३॥
मल्लयुद्ध मुष्टिघात :
हाणों येता मुष्टिघात । मल्लविद्या आकळित ।
वज्रदंष्ट्र क्रोधान्वित । अनुलक्षित मारावया ॥१४॥
बळे निमटोनियां गळा । परस्परे लाविती कळा ।
लाता देता हृदयकमळा । लागे डोळा अर्धचंद्री ॥१५॥
सवेंचि होवोनि सावचत्ति । आघातघात उलटघात ।
चिकाट्या तळी तळघात । घाये वर्मस्थ हाणिती ॥१६॥
वानर आणि निशाचर । जाले घायीं अति जर्जर ।
सर्वांगी वाहे रुधिर । येरा येर न ढळती ॥१७॥
किंशुक फुलले वसंतात । तैसे दोघे रणी आरक्त ।
युद्धश्रमें श्रमभूत । तरी भिडत साटोपे ॥१८॥
अंगदे उडोनि ते काळी । सुशोभित पुष्पी फळी ।
वृक्ष उपडोनि समूळी । रणकल्लोळीं पातला ॥१९॥
अंगदाचें बळ वितंड । वृक्ष देखोनि प्रचंड ।
राक्षसाचें बळदंड । खंड विखंड हो सरलें ॥१२०॥
वज्रदंष्ट्र सावचित्त । वोडणखड्गा घाली हात ।
वोपत्रिप तळप देत । करावया घात अंगदा ॥२१॥
अर्धचंद्र दृढ वोढण । ज्वाळमाळारत्नभूषण ।
धडकधडकूं दे किराण । दावी आंगवण वज्रदंष्ट्र ॥२२॥
एक वोढणखडगहस्त । दुजा वीर वृक्षहस्त ।
निर्वाणींचे घाय देत । निजविजयार्थ साधावया ॥२३॥
भैरव चर्ची सिंदूर । तैसे रक्तें आरक्त वीर ।
धांवती येरयेरांसमोर । घाय निष्ठुर हाणोनी ॥२४॥
अंगदाचा वृक्षघात । राक्षसांचा खर्गघात ।
दोघे पडले मूर्च्छागत । सावचित्त संग्रामी ॥२५॥
संग्रामी अति भ्रांत । दोघे घायीं जर्जरित ।
रणी पडले मुर्च्छित । तोही वृत्तांत अवधारा ॥२६॥
दोघे वीर महाहठी । रणी बैसले मेटीखुटीं ।
घुर्मी बाष्प दाटले कंठी । नेत्रवाटी बहु विकळ ॥२७॥
अंगदवीर मूर्च्छेआंत । रामनामे सावचित्त ।
वज्रदंष्ट्राचा केला घात । निमेषांत तो ऐका ॥२८॥
वृक्षघाय गेला व्यर्थ । तेणे अंगद क्रोधान्वित ।
सर्प जैसा दंडाहत । तैसा धांवत साटोपे ॥२९॥
अंगद वीर निधडा जाण । वज्रदंष्ट्रासी सावधान ।
स्वये करोनि आपण । केले हनन गर्जोनी ॥१३०॥
निर्मलेन सुघौतेन खड्गेनास्य महच्छिरः ।
जघान वज्रदंष्ट्रस्य वालिसूनुर्महाबलः॥१०॥
वज्रदंष्ट्राचा स्वतःच्याच खडगाते घात :
वज्रदंष्ट्राचें खर्ग थोर । अति निर्मळ सतेज धार ।
अंगदे हिरोनि सत्वर । छेदिलें शिर तयाचे ॥३१॥
अंगद वीर अति विख्यात । त्याच्या शस्त्रे त्याचा घात ।
करोनिया मस्तकपात । रणी गर्जत हरिनामे ॥३२॥
अंगद वीर अति निधडा । धायें शिर उडविलें पुढा ।
अशुद्ध वाहे भडभडा । केला नितोडा राक्षसा ॥३३॥
वज्रदंष्ट्राचा केला घात । राक्षससैन्य भयभीत ।
अवघे पळती भयान्वित । वानरी अंत पुरविला ॥३४॥
मुकुट कुंडले शस्त्रास्तें । अनर्घ्य भूषणे विचित्रें ।
सांडोनि पळती निशाचरे । लंकाद्वारी आकांत ॥३५॥
वज्रदंष्ट्र वधाने राक्षसांचा आकांत व वानर सैन्यात हर्ष :
एक रडत एक पडत । एक अत्यंत चरफडत ।
एक पाणी पै मागत । खुणा हातें दावूनी ॥३६॥
एक हुंबतें हुंबतें । एक कुंथतें कण्हतें ।
एकाची लोंबती अंतें । लंकेशाते निंदिती ॥३७॥
चोरोनियां सीता सुंदरी । आम्हांसी केली महामारी ।
धाड आणिली लंकेवारी । होत बोहरी राक्षसा ॥३८॥
राक्षससैन्य समस्त । पळोनि गेले लंकेआंत ।
विजयी जाला वाळिसुत । रगुनाथकृपेनें ॥३९॥
मारोनिंया वज्रदंष्ट्र । विजयी जाला वाळिकुमर ।
वानरांसी हर्ष थोर । सुखे निर्भर अंगद ॥१४०॥
मारोनियां वृत्रासुर । शोभे जेंवी सुरेश्वर ।
तैसा शोभे अंगद वीर । सपरिवार वानरी ॥४१॥
अंगदाचें सबळ बळ ।वानर वानिती सकळ ।
श्रीरामदर्शना प्रेमळ । आला निजदळसमवेत ॥४२॥
संमुख देखोनि रामचंद्र । अवघी केला जयजयकार ।
श्रीरामनामाचा गजर । नमस्कार घातला ॥४३॥
वंदोनियां रामचरण । अभिवंदिला लक्ष्मण ।
सुग्रीवासी लोटांगण । बिभीषण वंदिला ॥४४॥
प्रेमे वंदिला हनुमंत । नळनीळादि जांबवंत ।
वानरसमुदाय समस्त । अभिवंदित अंगद ॥४५॥
राजकुमर बळवंत । सत्वगुणी अति समर्थ ।
अंगद वीर विख्यात । स्वयेंवानीत श्रीराम ॥४६॥
अंगदे केले रणविंदान । झाले वज्रदंष्ट्रहनन ।
पुढे येईल अकंपन । तेंही रण अवधारा ॥४७॥
सुग्रीव वीरे समराआंत । वज्रदंष्ट्राचा केला घात ।
हे ऐकोनि लंकानाथ । क्रोधान्वित स्वये जाला ॥४८॥
वज्रदंष्ट्र हत श्रुत्वा वालिपुत्रेण रावणः ।
बलाध्यक्षमुवाचेदं कृतांजलिमुपस्थितम् ॥११॥
शीघ्रं निर्यांतु दुर्धर्षा राक्षसा घोरदर्शनाः ।
अकंपनं पुरस्कृत्य सर्वशस्त्रास्त्रकोविदम् ॥१२॥
ततो नानाप्रहरणा भीमाक्षा भीमदर्शनाः ।
निर्ययू राक्षसा मुख्या बलाध्यक्षप्रणोदिताः ॥१३॥
रावणाचा क्रोध व अकंपनाची रणावर रवानगी :
अति क्रोधे दशाननं । पाचारोनी अकंपन ।
तू तंव वीरपंचानन । रणप्रवीण रणयोद्धा ॥४९॥
सौमित्रेंसहित श्रीराम । रणी मर्दून प्लवंगम ।
माझे निढळींचा पुशीं घाम । प्रिय परम मज करी ॥१५०॥
ऐकोनि रावणाचे वचन । गर्जिन्नला अकंपन ।
वानरेंसीं राम लक्ष्मण । न लागता क्षण निवटीन ॥५१॥
आलिया सुरासुरगण । मागे न सरें मी अकंपन ।
राम लक्ष्मण बापुडे कोण । वानर तृण मजपुढे ॥५२॥
ज्याचे देखता दशन । भयानक अति दारुण ।
धाकेंचि वीर सांडी प्राण । अत्युग्र सैन्य सज्जिलें ॥५३॥
ज्याचे देखता विकट वदन । सैन्य पडे मूर्च्छापन्न ।
ऐसे दुर्धर सज्जोनि सैन्य । अकंपन निघाला ॥५४॥
कात्या त्रिशुळ तोमर । गदा मुद्गल परिघ घोर ।
झेलीत शस्त्रसंभार । निशाचर निघाले ॥५५॥
अकंपनाअंगीं आंगवण । सबळ बळाचा गर्व पूर्ण ।
रावणे देवोनि सन्मान । करावया रण धाडिला ॥५६॥
रथमास्थाय विपुलं तप्तकांचनभूषणम् ।
अकंपनस्तु तैर्घोरेराक्षसैः सह निर्ययौ ॥१४॥
तस्य निर्धावमानस्य संरब्धस्य युयुत्सया ।
अकास्माद्दैन्यमागच्छद्धयानां रथवहिनाम् ॥१५॥
प्रस्फुरन्नयनं चास्य सव्यं युद्धाभिकांक्षिणः ।
तानुत्पातान्धःकृत्वा निर्जगाम निशाचरः ॥१६॥
शस्त्रास्त्रीं रथ सज्जून । रथी बैसला अकंपन ।
कवच कुंडले तप्तकांचन । विजराजमान महावीर ॥५७॥
अकंपन महावीर । स्वभावे क्रूर आणि अत्यंग्र ।
घेवोनि निशाचरांचा भार । युद्धा सत्वर निघाला ॥५८॥
अकंपनास अपशकून :
रथ चालता घडघडाट । शुद्ध भूमिका मार्ग सपाट ।
चहू वारुवां वळली भेट । मारितांही साट न उठती ॥५९॥
वारुवें दातीं धरली भोये । उठविता न उठवी पाहे ।
अकपने धरिले भये । करावे काये नाठवे ॥१६०॥
संचित होता मुख्य धुर । अशुभे लवे वाम नेत्र ।
भयभीत निशाचर । दुश्चिन्हें थोर देखोनी ॥६१॥
साटोप धरोनिया पोटी । वारु उठवी जगजेठी ।
त्यांची थापटोनियां पाठी । रथ सन्निष्ठिं सज्जिला ॥६२॥
वारु करोनि सुप्रसन्न । रथी बैसला अकंपन ।
सवेग करिता रथाभिगमन । पुढे दुश्चिन्ह देखिले ॥६३॥
वृक जंबुक सिंह व्याघ्र । ऊर्ध्वमुख विवर्णस्वर ।
शब्द वदती अत्युग्र । पक्षीही क्रूर शब्द करिती ॥६४॥
निधडा वीर अकंपन । शूर पुरुषार्थी पंचानन ।
उत्पात सांडिले हेळसून । करावया रण निघाला ॥६५॥
शंके देखोनि जो उत्पात । अंगी नाही पुरुषार्थ ।
जय न पवे युद्धांत । जो भयभीत अपशकुनें ॥६६॥
अकंपन वीर उद्भट । करोनि वाढिवेचा नेट ।
रथ प्रेरिला घडघडाट । अति कडकडाट युद्धाचा ॥६७॥
तस्य निर्यातमानस्य राक्षसः सह राक्षसैः ।
बभूव सुमहान्नादः क्षोभयन्निव सागरम् ॥१७॥
तेन सब्देन वित्रस्ता वानराणां महाचमूः ।
दुमशैलप्रहाराणां योद्धं समवतिष्ठताम् ॥१८॥
तेषां युद्धं महाघोरं बभूव कपिरक्षासाम् ।
रामरावणयोरथें समरे त्यक्तजीविनाम् ॥१९॥
अन्योन्यं रजसा तेन कौशेयारुणपांडुना ।
संवृत्तं धूमधूम्रेण ददृशुस्ते रणजिरम् ॥२०॥
न ध्वजो न पताका वा चर्म वा तुरगोपि वा ।
आयुधं स्यंदनं वापि ददृशुस्तेन रेणुना ॥२१॥
वानर आणि राक्षसांचा रणसंग्राम :
वीरी करोनि रणशृंगार । मुकुतकुंडलें कवच वीर ।
अकंपनासवें दुर्धर भार । निशाचर चालिले ॥६८॥
सिंहनादे गिरागजर । गर्जत येता राक्षसभार ।
ते देखोनि कपिकुंजर । युद्धा सत्वर मिसळले ॥६९॥
शिळा शिखरें वृक्ष पर्वत । वानर भिडती युद्धाआंत ।
घाये राक्षसा करिती घात । सैन्यकंदनार्थ मांडिला ॥१७०॥
त्रिशुळ कात्या शक्ति तोमरे ।राक्षसें घेवोनि हतियारें ।
रणी खोंचली वानरे । वाहत रुधिर भडभडा ॥७१॥
रावणाच्या निजकार्यार्थ । राक्षसी वेंचिता जीवित ।
वानरी करोनि पर्वतघात । असंख्यात मारिले ॥७२॥
वानरी करोनि युद्ध निर्वाण । श्रीराम काजी वेंचिता प्राण ।
त्यांसी न बाधी जन्म मरण । नामस्मरण करितांचि ॥७३॥
वानर घायीं होता निर्बुज । लाविती श्रीरामचरणरज ।
घाय पानपोन होती नीरुज । कपिसमाज गर्जती ॥७४॥
करिता रामनामस्मरण । नामे वानरा बळ संपूर्ण ।
नामबळें करोनि कंदन । बळवाहन गर्जती ॥७५॥
वीरां वानरा करिता रण । रणी उठले रजःकण ।
रवि बिबेंसीं झांकती किरण । आपणाआपण न देखती ॥७६॥
ध्वजपताकांसीं न दिसे रथ । अश्व सारथि वीर विख्यात ।
मुख्य अकंपन तटस्थ । सैन्य समस्त केंवी देखे ॥७७॥
निशाचर देखती रातीं । ऐसी सर्वत्र वदंती ।
तेही करोनि सामान्य शक्ती । देखणी स्थिति वानरा ॥७८॥
श्रीराम दीप्तीची निजदिप्ती । श्रीराम स्वये तेजोमूर्तीं ।
त्याचेनि तेजे जप्तती । देखणी शक्ती वानरा ॥७९॥
वानरांअंगी सिद्ध उड्डाण । त्यांवरी आले देखणेपण ।
रणी केले कंदन । सावधान अवधारा ॥१८०॥
ऐतस्मिन्नंतरे वीरा वानराश्च महाबलाः ।
संरब्धाः परमं क्रुद्धाश्चक्रुर्यद्धमनुत्तमम् ॥२२॥
ते मुष्टिभिर्महावेगा राक्षसानां चमूमुखे ।
कन्दनं सुमहच्चक्रुर्लीलया हरिपुंगवाः ॥२३॥
शब्दश्च सुमहांस्तेषां नर्दतामभिधावताम् ।
श्रुयते तुमुलो तुमुलो युद्धे न रुपाणि चकाशिरे ॥२४॥
तदा च रक्षोगणमुन्नदंतं संभ्रांतनागाश्वरथं विकृष्टम् ।
महोदधेः पूरमिवानुरुपं निशाचराणां बलमाबभासे ॥२५॥
राक्षस सैन्याची दैना :
रणी रज दाटले दुर्धर । तये संधी वानरवीर ।
राक्षसा केला दुर्धर मार । शिळाशिखर द्रुमपाणी ॥८१॥
निशाचरीं सूनी दृष्टी । वानरवीर वळोनि मुष्ठी ।
मारिती राक्षसांच्या थाटी । रणी सन्निष्ठीं गर्जोनि ॥८२॥
कोपोनिया अति दुर्धर । रणी खवळले वानर ।
करिता शिळाशिखरमार । निशाचर भंगले ॥८३॥
वोडण खडण शूर दुर्धर । पर्वतघातें करिती चूर ।
वानरी भंगिलीं हतियेरे । निशाचर मर्दूनी ॥८४॥
रणी राक्षसा होता घात । त्यांसी प्रतिकूळ महावात ।
तोच वानरा अनुकूळ होत । श्रीरघुनाथाचेनि साह्यें ॥८५॥
असुर वानर करिता रण । उठले होते रजःकण ।
अशुद्धे वाहता रणांगण । रज दारुण उपशमलें ॥८६॥
बळे उन्नद्ध राक्षसभार । वानरी करिता पर्वतमार ।
रथाश्व गज सारथी वीर । निशाचर कळकळती ॥८७॥
मंदरें मंथितां सागर । क्षोभला गर्जे अति दुर्धर ।
कपि मथिता राक्षसभार । निशाचर कळवळती ॥८८॥
भंगले देखोनि रक्षोगण । तीव्र कोपला अकंपन ।
धनुष्यी सज्जूनियां बाण । सांगे आपण सारथ्या ॥८९॥
मर्दूनि राक्षसांचे भार । गर्जत उभे वानरवीर ।
शीघ्र प्रेरी रहंवर । कपिकुंजर वधावया ॥९०॥
तत् दृष्ट्वा सुमहत्कमं कृतं वानरसत्तमैः ।
क्रोधमाहारयामास युधि तीव्रमकंपनः ॥२६॥
दृष्ट्वा तत्कर्म शत्रूणां सारथिं वाक्यमब्रवीत् ।
तत्रैव त्वरितं याहि सारथे यत्र वानराः ॥२७॥
एते हि वलिनो ध्नन्ति सुबहून्राक्षसानणे ।
एकान्निहन्तुमिच्छामि समरश्लाघिनो ह्यहम् ॥२८॥
ततः प्रजविताश्वेन रथेन रथिनां वरः ।
हरीनभ्यहनत्क्रोधात्किरन्बाणानकंपनः ॥२९॥
न शेकुर्वानराः स्थातुं कि पुनर्योद्धुमाहवे ।
अकंपनशरैर्भग्ना दुदुवुः सर्ववानराः ॥३०॥
अकंपनाच्या बाणवृष्टीने वानरसैन्याची दैन्यावस्था :
ऐकोनि अकंपनवचन । सारथियें रथ प्रेरुन ।
जेथे वानर करिती रण । तेथे आपणा आणिला ॥९१॥
अकंपन महावीर । बाणी व्यापलें अंबर ।
उडोनि जाता पै वानर । केला मार शरघातें ॥९२॥
शिळा शिखरें द्रुम पाषाण । शराग्रे करोनि शतचूर्ण ।
सपिच्छी विंधोनियां बाण । वानर सैन्य त्रासिले ॥९३॥
वाम सव्य दशदिशीं । निघों जाता वानरांसी ।
बाण भेदिती सपिच्छी । रणभूमीसी राहवेना ॥९४॥
जैसी पर्जन्याची वृष्टी । त्याहून सवेग शरसुटी ।
वानर बाणी होवोनि हिंपुटी । उठाउठी पळाले ॥९५॥
रावणाच्या कटकाआंत । अकंपन वीर विख्यात ।
कायसी वानरांची मात । रणी रघुनाथ मारीन ॥९६॥
रणी उभा अकंपन । गर्जतसे अति श्लोघान ।
पळतां देखोनि वानरगण । हनुमान आपण चालिला ॥९७॥
रामनामे स्वये गर्जत । वानरा नाभीकार देत ।
करावया अकंपनाचा घात । आला हनुमंत साटोपे ॥९८॥
समीक्ष्य हनुमान्ज्ञातीनुपतस्थे महाबलः ।
तं महाप्लवंग दृष्ट्वा सर्वे ते प्लवगर्षभाः ॥३१॥
समेत्य समरे वीराः सहिताः पर्यवारयन् ।
अकंपनस्तु शैलाभं हनूमन्तमवस्थितम् ॥३२॥
महेंद्र इव धाराभिः शरैरभिववर्ष ह ।
अचिंत्तयित्वा बाणौघान्शरीरे पतितान्कपिः ॥३३॥
अकंपनवधार्थाय मनो दघ्रे महाबलः ।
शालमुत्पाटयामास गिरिशृंगमिव स्थितम् ॥३४॥
समुद्यम्य महाशालं भ्रामयामास मारुतिः ।
भ्रामयन्त स चिच्छेद शरैः शालमकम्पनः ॥३५॥
हनुमान व अकंपनाचे युद्ध :
येता देखोनि हनुमंत । पळाते वानर समस्त ।
स्वये परतले युद्धार्थ । बळोन्मत्त हनुमंत ॥९९॥
मेरुशिखरासमान । हनुमान आला देखोन ।
अकंपन कंपायमान । दुर्धर विघ्न आले ॥२००॥
राक्षसांचा कंदकुदळ । मुख्य हनुमान अतिबळ ।
यासी करोनि रणकल्लोळ । गोळांगूळ मारीन ॥१॥
आजि मरणें का मारणें । ऐसे निर्वाणयुद्ध करणे ।
रणी गर्जोन सत्राणे । निर्वाणबाणें विधित ॥२॥
जेंवी मेरुच्या शिखरा । मेघ वर्षती मुसळधारा ।
तैसे बाण पै कपींद्रा । विंधी वानरा सर्वांगी ॥३॥
अकंपनाची शरसुटी । हनुमंतासीं पुष्पवृष्टी ।
बाणांते न गणी जगजेठी । शंका पोटी असेना ॥४॥
गिरिशिखरेंसीं समान । शालवृक्ष उपटून ।
मारावया अकंपन । हनुमान जाण चालिला ॥५॥
बळे हाणिता शालवृक्ष । अकंपन अति दक्ष ।
हातींच्या हाती छेदिला देख । साधोनि लक्ष संग्रामी ॥६॥
बळे हाणिता अत्यद्भुत । वृक्ष छेदिला हातांत ।
तेणे हनुमान अति विस्मित । वीर विख्यात अकंपन ॥७॥
हनुमंताचा आघात । निवारुं शके इंद्रजित ।
अकंपन वीर विख्यात । केला घात शालवृक्षा ॥८॥
बळे हाणिता मारुती । वृक्ष छेदिला हातींच्या हाती ।
अकंपनाची रणव्युत्पत्ती । सुर वानिती स्वर्गस्थ ॥९॥
विध्वस्तं कर्म तद् दृष्ट्वा हनूमान्प्रेक्ष्य विस्मितः।
स गृहीत्वा गिरेःशृंगं जवेनाभिससार तम्॥३६॥
दुरादेव महाबाणैरर्धचंद्रैर्व्यदारियत् ।
तं पर्वताग्रभाकाशे रक्षोबाणविदारितम् ॥३७॥
विकीर्णं पतितं दृष्ट्वा हनुमान्क्रोधमूर्च्छितः ।
सोऽश्वकर्ण समासाद्य रोषदर्पान्वितो हरिः ॥३८॥
तूर्णमुत्पाटयामास महागिरिमिवोचितम् ।
तं गृहित्वा महाकायं भ्रामयामास संयुगे ॥३९॥
प्रधावन्नुरुवेगेन बभंज तरसा द्रुमान्॥४०॥
अकंपनाचा प्रतिकार व दर्पोक्ती :
अकंपनें छेदिला शालद्रुम । कपीचें वृथा गेले कर्म ।
तेणे हनुम्यासीं विस्मय परम । दृढ विक्रम अकंपनां ॥१०॥
घाये मारावया अकंपन । गिरिशिखर घेवोनि जाण ।
हनुमान धांवला आपण । शिखरें प्राण घ्यावया ॥११॥
शिखर हाणिता हनुमान वीर । लघुलाघवे विंधोनि शर ।
शतधा छेदिलें शिखर । बळे दुर्धर अकंपन ॥१२॥
अकंपन छेदिता शिखर । राक्षस करिती जयजयकार ।
बळ वानिती ऋषीश्वर । स्वर्गी सुरवर वानिती ॥१३॥
अर्धचंद्रबाणाच्या झडाडां । शिखर छेदूनि पाडिता पुढा ।
हनुमान विस्मित जाला गाढा । निर्वाणनिधडा अकंपन ॥१४॥
देखोनि अकंपनाची ख्याती । बाणलाघवी शीघ्रगती ।
राक्षसांमाजी अति पुरुषांर्थी । त्यासी मारुती मारुं पाहे ॥१५॥
अकंपनाचा घ्यावया प्राण । वृक्ष उपटोनि अश्वकर्ण ।
हनुमान धांवोनि आपण । वृक्ष भवंडोनि हाणित ॥१६॥
अश्वकर्णाच्या आघाती । लघुलाघवे हाणी मारुती ।
वृक्ष सोडिले नेणो किती । पडावया क्षिती अकंपन ॥१७॥
बाणलाघवी अकंपन । चमत्कारें शर विंधोन ।
वृक्ष छेदिता अश्वकर्ण । छेदी आन आन द्रमा ॥१८॥
वृक्ष छेदोनि पाडिता तळी । अकंपन दे आरोळी ।
आल्हाद राक्षसांच्या दळी । पितिळी टाळी सकळिकीं ॥१९॥
सुरासुर नर वानर । अवघे आश्चर्य मानिती थोर ।
अकंपन निधडा वीर । स्वये समग्र मानिती ॥२२०॥
हनुमंताचे तीन विक्रम । अकंपनें केले निर्धर्म ।
तेणे कपीसी सुखसंभ्रम । आल्हाद पूर्ण युद्धाचा ॥२१॥
अकंपना तुझी युद्धख्याती । रणी तुष्टलो मी मारुती ।
तुज मी न मारी युद्धावर्तीं । जाय लंकेप्रती विजयेंसीं ॥२२॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । हास्य करी अकंपन ।
जंव तुझा घेतला नाही प्राण । तंववरी जय मज नाही ॥२३॥
आधी मारीन हनुमंता । मग मारीन सौमित्रिरघुनाथां ।
अंगद सुग्रीव जांबवंता । मारीन समस्ता वानरा ॥२४॥
इतुके केलिया रणकंदन । माझ्या अंगी विजय पूर्ण ।
ऐसे ऐकताचि वचन । हनुमान दारुण क्षोभला ॥२५॥
हनूमान्परमकुद्धःश्चरणैः कंपयन्महीम् ।
जघान समरे क्रुद्धान्पदातींश्चापरान्बुहून् ॥४१॥
तमापतंतं संरब्धं राक्षसानां भयावहम् ।
ददर्शकंपनो वीरश्चुक्रोधन ननाद च ॥४२॥
स चतुर्दशभिर्बाणैर्विशिखैर्मर्मभेदिभिः ।
निर्बिभेद महावीर्यं हनुमंतमकंपनः ॥४३॥
स तथा तेन विद्धोऽपि बहुभिर्मार्गणैः शितैः ।
हनूमान् ददृशे वीरो रुधिरेण समुक्षितः ॥४४॥
उत्पाट्य सहसा वृक्षं कृत्वा वेगम्नुत्तमम् ।
शिरस्यभिजघानाशु राक्षसेंद्रकंपनम् ॥४५॥
अकंपनाचा वध :
हनुमान रागे धांवतां पाही । राक्षससैन्य रगडी पायी ।
पुच्छघायें वीर पाडित ठायी । अकंपन पाही कोपला ॥२६॥
चौदा बाणी त्वरित । हृदयी विंधिला हनुमंत ।
तेही बाणी कपि उन्मत्त । क्रोधान्वित चालिला ॥२७॥
वृक्ष उपटोनि सत्राण । मस्तकी टाकिता संपूर्ण ।
रथा सारथ्यासहित जाण । सांडिला प्राण अकंपनें ॥२८॥
राक्षसांचे पलायन व रावणास क्रोध व चिंता :
अकंपने सांडितां प्राण । धाके पळती रक्षोगण ।
त्यांसी वानरी केले कंदन । रणमर्दन राक्षसा ॥२९॥
वोडण खड्ग धनुष्यबान । सांडोनि अलंकार आभारण ।
राक्षस घेवोनि पळती प्राण । रणी अकंपन पाडिला ॥३०॥
राक्षस अति भये पळत । लंकाद्वारीं विमर्द होत ।
वानर आले रे मारित । बोंब सांगत नगरस्थां ॥३१॥
पुढे पळत मागे पाहत । अवघे आले लंकेआंत ।
रावणासी स्वये सांगत । केला घात अकंपना ॥३२॥
घायाळ आले कुंथत । ते सांगतीं निजवृत्तांत ।
एकला येवोनि हनुमंत । केला घात सर्वांचा ॥३३॥
हे ऐकोनि लंकानाथ । करावया राक्षसांचा घात ।
मुळी लागला हनुमंत । चिंताग्रस्त रावण ॥३४॥
समेत्य हरयः सर्वे हनुमंतमपूजयन् ।
सोऽपि प्रहृष्टस्तान्सर्वान्वानरान्प्रत्यपूजयत् ॥४६॥
मर्दूनि राक्षससैन्य । करिता रामनामगर्जन ।
परतले वानरगण । उल्लास पूर्ण विजयाचा ॥३५॥
वानर मिळोनि समस्त । लोटांगण नमनयुक्त ।
अवघी पूजिला हनुमंत । यशवंत रणरंगी ॥३६॥
निगर्वी वीर हनुमंत । अंगद सुग्रीव जांबवंत ।
नळनीळादि महंत । वानर समस्त वंदिले ॥३७॥
घालोनिया लोटांगण । वंदिले श्रीराम लक्ष्मण ।
जयजयकारें गर्जे गगन । हर्षे त्रिभुवन कोंदले ॥३८॥
एकाजनार्दना शरण । स्वये हनुमंत आपण ।
अकंपनातें निर्दळून । श्रीरामचरण वंदिले ॥३९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडें एकाकारटीकायां
वज्रदंष्ट्रअकंपनवधो नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥
ओव्या ॥२३९॥ श्लोक ॥४६॥ एवं ॥२८५॥
