वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ५५. नंदिग्रामात आगमन

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088117 · अभंग क्र. ५५

55.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय पंचावन्नावा ॥
सीता – मंदोदरी संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीराम नाहीसे झाल्याबद्दल वानरांचा प्रश्न :

आनंद झाला सर्वांसी । श्रीराम आला निजमेळिकारांसी ।
लागले श्रीरामचरणांसी । रामे हृदयेंसीं आलिंगिले ॥१॥
परियेसीं स्वामी श्रीरामा । दीन अनाथां प्लंवगमां।
सांडोनि गेलासि आम्हा । सर्वोत्तमा काय केले ॥२॥
तुझ्या पोटी होते जाणे । एकासी तरी होते सांगणे ।
न पुसतां घडले जाणे । उचित करणे हे नव्हे ॥३॥

मारुतीकडून राममहातीचे कथन :

तंव बोलिला हनुमंत । तुम्हा वानरा न कळे मात ।
पूर्णावतार रघुनाथ । त्यासी सांगता काय करी ॥४॥
जो दुजियाची वाट पाहे । त्याचे कार्य कधी न होये ।
यश कोठेंचि न लाहे । श्रीराम पाहा तैसा नव्हे ॥५॥
श्रीराम एकला एकांगवीर । न धरी दुजियाचा आधार ।
तो वानरांसी विचार । पुसे साचार हे न घडे ॥६॥
जाणे होते पाताळासी । कळो न देता कोणासी ।
जावोनिया अति वेगेंसी । अहिरावणासी मारिले ॥७॥
अहिरावण महिरावण । सखे बंधु दोघे जण ।
त्यांसी वधावया जाण । श्रीराम आपण स्वये गेला ॥८॥
मारिलिया रावणासी । अवकाश न पुरे जावयासी ।
वेढा काढवोनि वेगेंसीं । पाताळासी स्वये गेला ॥९॥
जरी जावे पुसोनी । तरी निवारुं आम्ही कोणी ।
गेला न पुसता म्हणोनी । प्रकट जनी न करीच ॥१०॥

श्रीरामांचे वृत्तांत कथन :

ऐकोनि तो विचार । हरिखेला वानरभार ।
श्रीराम एकांगवीर । युद्ध थोर पै केले ॥११॥
दुसरा कैंचा हनुमंत । म्हणोनी पुसे वानरनाथ ।
ऐकोनि तयाची मात । श्रीरघुनाथ स्वये सांगे ॥१२॥
वानरभार जै निजेला । अहिरावणे घालोनि घाला ।
दोघा जणा धरोनि वहिला । गेला पाताळा घेउनी ॥१३॥
मार्ग काढोनि त्वरित । आला पाताळा हनुमंत ।
मकरध्वज द्वार राखित । नगराआंत रिघो नेदी ॥१४॥
युद्ध झाले दोघांसी । न लोटती येरयेरांसी ।
हनुमान क्षोभोनि पुसे त्यासी । झाली दोघांसी ओळखी ॥१५॥
हनुमंताचा स्वेदज पुत्र । पुसतां निघाला वीर मकर ।
भेटोनियां पितापुत्र । मज सत्वर सोडविले ॥१६॥
मारोनियां राक्षसांसी । मुक्त करोनि पाताळासी ।
राज्य देता मकरध्वजासी । भेटो तुम्हांसी येथे आलो ॥१७॥
हनुमंताचा आत्मज । अतिविख्यात मकरध्वज ।
ऐकोनि कपिसमाज । पुच्छध्वज उभारिलें ॥१८॥
मग क्षेम देती येरांयेर । येरयेरा करिती नमस्कार ।
होवोनियां आल्हादपर । श्रीरघुवीर नमियेला ॥१९॥
झाले सकळा समाधान । हरिखें नाचती वानरगण ।
तंव रावणाचे दूत जाण । हेरपण करिती रामकटकी ॥२०॥

रावणाच्या हेरांनी रावणाला बातमी सांगितल्याने
रावणाने चिंताग्रस्त विचाराने मंदोदरीला सीतेकडे पाठविले :

वृत्तांत ऐकोनि समग्र । गेले रावणासमोर ।
सांगितले सविस्तर । रामचरित्र यथाश्रुत ॥२१॥
अहिरावण महिरावण । यांचा वध ऐकोनि जाण ।
दहा मुखी रावण । शंख आपण करितसे ॥२२॥
मनोरथ न वचती सिद्धी । झाली सकळांची अवधी ।
आता काय करु बुद्धी । लागली आधी रावणा ॥२३॥
दुर्धर कष्ट करोनि जाण । आणिले सीता चिद्रत्‍न ।
तेंही नव्हे भोगायतन । कोण प्रयत्‍न करु आता ॥२४॥
प्रार्थोनिया मंदोदरीसी । वश्य करीन जनकदुहितेसी ।
भोगितां मैथिलीसी । केल्या कष्टासी परिहार ॥२५॥
धरावया मृगगणा । घरी पाळिती भांड हरणा ।
स्वयातीसीं विश्वासोन जाणा । निजबंधन पावती ॥२६॥
कामी पुरुष सकामासी । जार स्त्री पुश्चळिसी ।
किंवा तस्कर तस्करासी । वश्य करी हेरासी पै हेर ॥२७॥
हरिभक्त हरिभक्तासी । दृष्टी पडता येरयेरांसी ।
मिठी पडे अतिप्रीतीसी । सेव्य दोघांसी परमात्मा ॥२८॥
योगी आकळे योगबळें । ज्ञानिया निजज्ञानमेळें ।
निःसंगत्वें वैराग्यशीळें । सद्य आकळे परब्रह्म ॥२९॥
तेंवी पतिव्रता पतिव्रतेसी । वश्य करी क्षणमात्रेंसीं ।
म्हणोनिया मंदोदरीसी । सीताप्राप्तीसी पै प्रार्थी ॥३०॥
ऐसे विचारोनि रावण । निजकार्या सावधान ।
अत्यंत प्रीति करुन । निजकांता जाण पाचारी ॥३१॥
अत्यंत नम्र अति प्रीतीसी । बोलता झाला मंदोदरीसी ।
तू सती पतिव्रता होसी । माझ्या वचनासी नुपेक्षीं ॥३२॥
पतिव्रतेचा धर्म पूर्ण । नुल्लंघावे पतिवचन ।
ऐसे आहे वेदवचन । शास्त्रपुराणसंमत ॥३३॥
म्हणोनिया तुजप्रती । करीतसे मी विनंती ।
अनुसरोनि वचनस्थिती । कार्य निगुतीं साधावे ॥३४॥
जानकीभोगाची आस्था । अत्यंत लागलीसे चित्ता ।
ते कामना सिद्धी न वचता । प्राणांतव्यथा होतसे ॥३५॥
मांडलें अत्यंत निर्वाण । निमाले पुत्रादि प्राधान ।
सैन्य निमाले संपूर्ण । वीर दारुण रणयोद्धे ॥३६॥
अदट वीर कुंभकर्ण । तोही मारिला विटंबून ।
गोष्टी सांगावया पुरती जाण । सांगाते आननुरेची ॥३७॥
ऐसे सकळ कुळाचें निर्दळण । झाले असता संपूर्ण ।
माझे हृदयींचे शल्य जाण । अर्ध क्षण न ढळेची ॥३८॥
जेवितां रुचेना अन्न । चवी नेदी पै जीवन ।
झोंप नये केल्या शयन । अवस्था पूर्ण लागली ॥३९॥
सपुत्र सैन्य निमाले देख । त्याचे अणुमात्र नाही दुःख ।
परी भोगावया सीतासुख । आस्था अलोलिक लागली ॥४०॥
त्या आस्थेचें निरसन । मंदोदरी तुझेनि जाण ।
मज होईल समाधान । म्हणोनि विनवण करीतसें ॥४१॥
तू सती पतिव्रता । नुल्लंघिसी पतिवचनार्था ।
सांडोनिया निजमहत्त्वा । शरण तत्वता तुज आलो ॥४२॥
कार्य साधावें संपूर्ण । म्हणोनि धरिले दोनी चरण ।
सांडोनिया राजचिन्ह । तुज विनवण करितसे ॥४३॥
कामासीं आतुडला संपूर्ण । तो न पाहे मानापमान ।
स्त्रियेचे धरिता चरण । लज्जा रावण मानीना ॥४४॥
येरी निवारोनि वेगेंसीं । स्वये लागली चरणांसी ।
भाग्य आले जी फळासी । निजकार्यासी आज्ञापिले ॥४५॥
जितुके माझे युक्तिबळ । तितुके वेंचोनि सकळ ।
प्रबोधीन जनकबाळ । परी प्राप्तिकाळ दैवाधीन ॥४६॥

दैवाधीन विचाराने मंदोदरी सीतेला भेटावयास जाते :

ऐसी रावणासी एकांती । संवादोनि महासती ।
आली निजधामाप्रती । होते चित्ती ते झाले ॥४७॥
बाप कृपाळु भगवंत । निजभक्तांचें मनोगत ।
पुरवावया सावचित्त । अनाथनाथ श्रीराम ॥४८॥
होते मंदोदरीच्या चित्ती । जे भेटावी सीता सती ।
राम भोगी कोण्या स्थिती । हे सीतेप्रती पुसावे ॥४९॥
श्रीराम कैसा किमात्मक । श्रीराम भोगी कैसे सुख ।
सविकल्प निर्विकल्प । हेंही सकळिक पुसावे ॥५०॥
श्रीरामाचे ठाणमाण । रुपरेखा गुणलक्षण ।
सर्वगत की परिच्छिन्न । स्थिति संपूर्ण रामाची ॥५१॥
श्रीराम केवढा कैसा असे । कोठे वसे ।
पुसावया जीवी उल्लासे । जानकीस अहर्निशी ॥५२॥
ऐसी मंदोदरीच्या चित्ता । होती अनिवार अवस्था ।
कै भेटेल जनकदुहिता । निजगुह्यार्था पुसेन ॥५३॥
अवचटे सीता सती । हातींची गेलिया निश्चिती ।
कोणा पुसावी निजगुह्यस्थिती । चिंता चित्ती अनिवार ॥५४॥
भाग्ये भेटल्या साधूसी । अवश्य पुसावे निजगुह्यासी ।
जाणोनि जो होय उदासी । पाप त्यापासी खतेलें ॥५५॥
बहुकळ ज्यासी खता चढे । साहणे तोडितां तो न झडे ।
लोहाऐसें कठिण गाढे । करी रोकडें मृत्तिका ॥५६॥
अभिमानाची जाति पाही । साधुसंता न मानी कांही ।
ज्ञानगर्वे बुडाले तेही । शुद्धि नाही तयाची ॥५७॥
मनुष्यदेहाची निजप्राप्ती । शिणतां न पवे लक्षांती ।
येथेंही विकल्प् चित्ती । तोंडी माती पडली ती ॥५८॥
एक नरदेह नेणोनि गेले । एकी लतकें म्हणोनि उपेक्षिले ।
एक ते साधनी ठकले । आपमती सैरा भरले ॥५९॥
एक करु करु म्हणता गेले । करणे राहिले तैसेंचि ॥६०॥
पोटी अनिवार विषयस्थिती । ज्ञान मिरविती लोकांप्रती ।
जीविका त्यावरी करिती । घात निश्चिती । स्वयेंचि केला ॥६१॥
जेणे व्हावी निजप्राप्ती । ते वेचलें विषयासक्ती ।
स्वयेंचि नागवले निश्चिती । भांडवल हाती असेना ॥६२॥
स्वप्नीं जोडिली जे संपत्ती । ते वेंचिता नये जागृती ।
विषयी आणि ब्रह्मनिष्ठ म्हणविती । भ्रम निश्चिती या नांव ॥६३॥
जरी धांवणे नागवी आपण । तरी कोण करील सोडवण ।
अभिमानें यापरी जाण । सकळ जन नागविले ॥६४॥
जे ज्ञानगर्वे नागविले । ते काळातें न देखती वहिले ।
सिद्ध आयुष्य वांयां गेले । जे जोडितां न मिळे पुण्यकोटी ॥६५॥
झालिया नरदेहप्राप्ती । परमार्थ साधावा हातोहाती ।
जेंवी कृषीवलाची स्थिती । मढें झांकिती पेरणीसीं ॥६६॥
आजि हे राहो करीन पाहे । म्हणता काळ कृपाळु नोहे ।
क्षणक्षणां जात आहे । उत्तम आयुष्य घेवोनिया ॥६७॥
ऐसी काळाची काळसत्ता । जाणोनि मंदोदरीच्या चित्ता ।
लागली अनिवार अवस्था । जनकदुहिता भेटावया ॥६८॥

मंदोदरीचे अशोकवनामध्ये आगमन :

तव आज्ञापिले रावणे । उल्लासोनियां चौगुणें ।
करु आदरिले येणे । रामांगनेसी भेटावया ॥६९॥
अशोकवना येवोनी । पाहे मंदोदरी नयनी ।
तंव देखिली जनकनंदिनी । रामानुसंधानीं आसनस्थ ॥७०॥
श्रवणी राम नयनी राम । वाचेसी नित्य वदवी राम ।
ध्यानीं राम मनी राम । अनुसंधानीं राम अखंड ॥७१॥
प्राणाचा निजसंचारी । राम न विसंबेचि सुंदरी ।
सकळ इंद्रियविकारीं । झाली अविकारी श्रीरामे ॥७२॥
चोर धरियेला राजद्वारी । त्यासी निग्रहिती नानापरी ।
तेंवी इंद्रियवृत्ती समग्री । सीता सुंदरीं निग्रहिल्या ॥७३॥
ऐसी दृष्टी देखता जानकीसी । अति उल्लास मंदोदरीसीं ।
विसरोनि गेली देहभावासी । मिनली प्रीतीसी अहंत्यागें ॥७४॥
साधु देखतांचि दृष्टी । जरी विरे अहंकारची गाठी ।
पडे स्वानंदाची मिठी । उडे त्रिपुटी अभावें ॥७५॥
सांडोनिया मी तू पण । सीतेसी बोलावया जाण ।
साधू आदरिले विंदाण । ऐसी अति विचक्षण मंदोदरी ॥७६॥
अति चातुर्याचा प्रश्न । पुसती झाली विचक्षण ।
रावणाचे कार्य जाण । साधून विंदान स्वरुप पुसे ॥७७॥
शब्दे व्यापिले गगन । निमाले शून्याचें शून्यपण ।
तेथे परादि वाचा पुसे कोण । अर्थ संपूर्ण आकर्षी ॥७८॥
अहाच दृष्टी पाहता । येथींच अर्थ न ये हाता ।
चित्त विनटले तत्वता । ते शब्दार्था पाविजे ॥७९॥
यालागी श्रोते सज्जन । निजहितीं कुशल पूर्ण ।
करोनि सर्वांगाचें अवधान । शब्दार्थ जाणा परिसावा ॥८०॥
जीवामाजी घालोनि जीव । परिसतां हे अर्थगौरव ।
तै सिद्धि पावे कार्य सर्व । भवभय निवारे ॥८१॥
असो आता जानकीसी । मंदोदरी अति प्रीतीसी ।
पुसती झाली वेगेंसी । राम अनुभविसी तो कैसा ॥८२॥
राम व्यापक की एकदेशी । हे सांगावे मजपासीं ।
सकळ देही श्रीरामासी । स्थिति कैसी वस्तीची ॥८३॥
जरी म्हणसी परिच्छिन्न । तरी व्यापकत्वा पडिले खान ।
आत्माराम हे अभिधान । न घडे जाण तयासीं ॥८४॥
जरी त्याते व्यापक म्हणसी । तरी तो सर्वभूतनिवासी ।
मग तेथे उपेक्षितां रावणासी । अद्वैतभजनासीं अभावो ॥८५॥
ब्रह्मा धरोनि मुंगीवरी । राम व्यापक चराचरी ।
तो रावणचेही शरीरी । इंद्रियव्यापारी नांदत ॥८६॥
जरी रामानुसंधान रावणी । भजता होय कोण हानी ।
हे सांगावे साजणी । प्रीती करोनि मजलागी ॥८७॥

सीतेचे मंदोदरीला उत्तर :

तंव हांसोनि सीता सुंदरी । उत्तर देती अतिकुसरीं ।
ते परिसोनि मंदोदरी । विश्रांति थोरी पावली ॥८८॥
सावध ऐके साजणीं । प्रवेशतां रामानुसंधानीं ।
चित्त चित्तपणा विसरोनी । रामाहुन स्वये राहे ॥८९॥
द्रष्टा परिच्छिन्न होये । तै दृश्य दृश्यत्वें भासों लाहे ।
श्रीराम स्वये तैसा नव्हे । परिस माये सांगेन ॥९०॥
श्रीरामाहून व्याप्त एक । असता श्रीरामे व्हावे व्यापक ।
त्रिपुटीचा अभावो देख । व्याप्य व्यापक तेथे कैंचे ॥९१॥
म्हणसी सर्वांच्या अंतरी । राम असे चराचरी ।
तो रावणाच्या शरीरी । इंद्रियव्यापारी वर्तत ॥९२॥
राम सर्वांच्या हृदयी आहे । धरिता त्या हृदयस्थाची सोये ।
राम रावण कोठे आहे । सांग पा माये यथार्थ ॥९३॥
भोगितां निजहृदयस्थासी । अवकाश कैंचा भोक्तयासी ।
तेथे रावण कैंचा आणिसी । जे तयासी भोगावे ॥९४॥
दृश्याचिये भेटी । द्रष्टा दृश्यपणें उठी ।
होता तेणेसी तुटी । तोही शेवटी असेना ॥९५॥
आता नाहींपणे असे । आणि असे तोचि दिसे ।
तरी रावणाचे काय पिसे । सांग सावकाशे साजणी ॥९६॥
ऐकोनि सीतेच्या उत्तरी । पूर्णावस्था मंदोदरी ।
चढला स्वेद कंप शरीरी । आनंदलहरी दाटली ॥९७॥
इंद्रियां विकळता झाली । चित्तचैतन्या मिठी पडली ।
अंतरी सुखोर्मी दाटली । तेणे पडली मूर्च्छित ॥९८॥
बाप सद्‍गुरुचें सामर्थ्य । अलोलिक अत्यद्‍भुत ।
वचनमात्रें शक्तिपात । झाला निश्चित मंदोदरी ॥९९॥
नाही हस्तक मस्तक । कृपें कळवळोनि देख ।
वचनमात्रें दिधले सुख । झाल्या कल्पांत सरेना ॥१००॥
छळणेंकरोनि बोलता । तत्काळ झाली समाधिअवस्था ।
सद्‌भावे विनटतां संता । न कळे तत्वता काय देती ॥१॥
जाणोनिया श्रोते सकळ । ज्यांसी निजप्राप्तीची कळवळ ।
तिही सांडोनिया छळ । सवावे अविकळ सज्जन ॥२॥
परिस फोडावया जाण । सबळ बळे हाणिती घण ।
त्यासी करिता सुवर्ण । न लगे क्षण तत्वता ॥३॥
तरी परिस बापुडे ते किती । लोहाचे ठायी सुवर्णस्फुर्ती ।
परीस न करीच निश्चिती । निजस्थिती वंचिली ॥४॥
तैसा नव्हेचि चआंद्न । अंगवात झगटतांचि पूर्ण ।
उद्यान केले आपणासमान । न्यून पूर्ण असेना ॥५॥
खैर धामोडे समग्र । वेहकळी टाकळी अत्युग्र ।
आदिकरोनि पांगार । झाले समग्र चंदन ॥६॥
आणीक गुण अलोकिक । जो छेदावया आला देख ।
त्यासी परिमळ अधिक । जाळित्या देख तयाहोनी ॥७॥
तेंवी सज्जनाचें लक्षण । छळें द्वेषभावें पूर्ण ।
जो आला तयापासी जाण । त्यासी समाधान सारिखेंचि ॥८॥
यापरी सीता सती । मंदोदरीची छळणवृत्ती ।
छेदोनियां छळणयुक्तीं । समाधि निश्चिती पावविली ॥९॥
बोलता सीतेसी बोली । आली वाट भुलविली ।
ऐसी जानकिया ख्याती केली । वचनें लाविली समाधी ॥११०॥
कष्टे आली बाह्यवृत्ती । तरी न मोडे सहजस्थिती ।
मंदोदरी चवके चित्ती । कांही निजचित्तीं स्फुरेना ॥११॥
मग कष्टीं म्हणे वो माये । देखिलिया तुझे पाये ।
जे सुख आले आहे । ते बोली पाही बोलवेना ॥१२॥
परादि वाचा नव्हे सौरस । येथे वोलासी कैंचा प्रवेश ।
ओसंडला अति उल्लास । राम परेश बोळला ॥१३॥
ऐसे बोलता बाष्प कंठी । तंव मन मागते नुठी ।
इंद्रियां सुखसंतुष्टी । पडली मिठी चैतन्यीं ॥१४॥
मग मौनेंचि लोटांगण । मंदोद्री स्वये आपण ।
जानकीचे निजचरण । हृदयी धरोन राहिली ॥१५॥
तंव दुजी सन्नद्ध सहजासन । बैसली असता सावधान ।
सहज निसरलें मन । रामरुपी नयन निडारले ॥१६॥
तेथे पाहता आत्मबिंब । उतटों पाहताहे नभ ।
मी तू पणाची मिथ्या भांब । दोघी स्वयंभ त्या झाल्या ॥१७॥
एकाएकी जनार्दनी । दोघी दोनीपणा मुकोनी ।
मिळाल्या एक हो‍उनी । अशोकवनी शोकातीत ॥१८॥

हेरांनी सीता – मंदोदरीच्या भेटीची बातमी रावणाला दिल्याने चिंता :

तंव रावणे आपण । हेरपणें दासी जाण ।
मंदोदरीसवें देऊन । वृत्तांत संपूर्ण आणविला ॥१९॥
दासीमुखें वृत्त समग्र । ऐकोनिया सविस्तर ।
तळमळिता झाला थोर । दशशिर रावण ॥१२०॥
मंदोदरी आली तेथ । सांगितले सकळ वृत्त ।
दशवदन चिंताक्रांत । कांही मत चालेना ॥२१॥
अहिरावणादिचरित्र । सेतुमाहात्म्यी समग्र ।
लिहिले असे सविस्तर । नव्हे साचार कल्पित ॥२२॥
संदेह असेल ज्यांचे मनी । तिही अवकाश करोनी ।
सेतूमाहात्म्य अवलोकूनी । संदेह खाणोनी सांडावा ॥२३॥
असो आता तो विचार । किती सुचवूं परिहार ।
वक्ता एक एकांगवीर । मी कोण किंकर परिहारा ॥२४॥
ग्रंथाचें नामाभिधान । शुद्ध भावार्थरामायण ।
तो भाव जडला पूर्ण । असता वक्तेपण मज कैंचे ॥२५॥
भावीं अनुसरोनि रघुनाथ । वक्ता झाला एकनाथ ।
माझेनि हातें ग्रं लिहिवित । कर्ता करविता तो एक ॥२६॥
तेथे कैंची परिहारता । म्हणोनि श्रोते साधुसंता ।
शरण आलो जी तत्वता । क्षमा आता मज किजे ॥२७॥
पांवा मधुरध्वनी वाजे । वाजवित्याचेनि गाजे ।
जनार्दने तैसे कीजे । ग्रंथ लिहिविजे मज करी ॥२८॥
म्हणोनि श्रोते जन । सर्वथा न ठेवावें दूषण ।
करितो हेचि विनवण । कृपावलोकनीं मज सनाथ कीजे ॥२९॥
क्षमा करा ऐसे म्हणता । तरी हों पाहे काव्यकर्ता ।
म्हणोनि मौनेंचि आता । लोटांगण तत्वता साधूंसी ॥१३०॥
साधु कृपाळु जननी । जे अंतर जाणती तत्क्षणीं ।
तेथे परिहार कोणालागनी । क्षणोक्षणीं सुचवावा ॥३१॥
एका जनार्दना शरण । झाले मंदोदरीआख्यान ।
आता रावणाचा यज्ञ । अति विलक्षण परियेसा ॥१३२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सीतामंदोदरीसंवादो नाम पंचपंचाशत्तमोऽध्यायः ॥५५॥ ओंव्या ॥१३२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग