वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › २१, गोंधळ अभंग ९९१

तू विटेवरी सखये बाई

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074721 · अभंग क्र. ९९१

991.
तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा ।
माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा ।
तू सांवळे सुंदरी हो करी कृपा ।
लावण्य मनोहरी हो करी कृपा ।
निजभक्ता करूणा करी हो करी कृपा ॥१॥
पंढरपुरी राहिली । डोळा पाहिली ।
संते देखिली । वरूनी विठाई वरूनी विठाई ।
सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा ।
उजळ कुळदीपा । बोध करी सोपा ।
येउनी लवलाही येउनी लवलाही ॥धृ॥
तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा ।
चौक आसनी कळस ठेविला हो करी कृपा ।
प्रेम चांदवा वर दिधला हो करी कृपा ।
ज्ञान गादी दिली बैसावया हो करी कृपा ।
वरी बैसविली आदी माया हो करी कृपा ।
काम क्रोध मद मत्सर । दंभ अहंकार ।
त्यांचे बळ फार ।
सर्वसुख देई सर्व सुख देई ॥२॥
शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा ।
नाचताती प्रेमकल्लोळी हो करी कृपा ।
उदो उदो शब्द आरोळी हो करी कृपा ।
पुढे पुंडलीक दिवटा हो करी कृपा ।
त्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा ।
आई दाविली मूळपीठा हो करी कृपा ।
बापरखुमादेविवरू । सुख सागरू ।
त्याला नमस्कारू ।
सर्व सुख देई सर्व सुख देई ॥३॥

अर्थ :
हे विटेवर उभी असलेल्या सखे, विठाबाई मजवर कृपा कर माझे मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी असू दे. मेघकांतीप्रमाणे शामवर्ण सुंदर, तेजस्वी, मनाला आल्हाद देणारे असे तुझे रूप आहे. हे देवी जो मी तुझा भक्त त्या मजवर तू कृपा कर. तू पंढरपूरास राहिलेली आहेस तुला तेथे संतांनी व मीही पाहिले. तेंव्हा कुलोद्धार करणाऱ्या सच्चिदानंद अंबाबाई तू लवकर येऊन मला सोप्या रितीने बोध कर. देव्हारा मांडून व त्यावर चौकोनी आसन घालून त्यावर कलश ठेविला आहे व वरच्या बाजूस प्रेमाचा चांदवा दिला आहे. तुला बसण्यांकरिता ज्ञानरूपी गादी घातली आहे व त्यावर आदिशक्ति तुला बसविले आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार वगैरे फार बलवान झाले आहेत. तरी त्यांचा नाश करून मला सुखी कर. शुक सनक, सनंदन, सनत्कुमार, नारद वगैरे तुझ्या नामाचा गजर करणारे गोंधळी होऊन उदो उदो शब्दाचे आरोळी देऊन तुझ्यापुढे आनंदाने नाचतात. त्यांनी तुझी थोरवी गायिली पुंडलिकाने ज्ञानदिवटी हाती घेऊन देवीचे मूळपीठ जे पंढरपूर ते दाखवून सोपा असा भक्तिमार्ग प्रगट केला. म्हणून सर्वसुख देणारे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तेच केवळ सुखाचा सागर असून त्यांना मी नमस्कार करून सर्वसुख मला प्राप्त करून दे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग