रुप नाम अरुप रुपाचे
42.
रुप नाम अरुप रुपाचे रुपस । कांसवी डोळस निगमागमे ॥१॥
तो हा ब्रह्मामाजि गोपाळ सांगाती । यशोदे हो प्रति दुध मागे ॥२॥
जो रेखा अव्यक्त रेखेसिहि पर । दृश्य द्रष्टाकार सर्वाभूती ॥३॥
निवृत्ति तटाक चक्रवाक एक । वासनासि लोक गुरुनामे ॥४॥
अर्थ:
जसे कासवीचे डोळे विशेष असतात त्याच्या माध्यमातुन ती पिलांचे पालनपोषण करते तश्या दृष्टीने पाहिले तर ज्याला रुप नाही असे निर्गुण परमतत्व नामाने रुपास आले आहे. तोच परमात्मा गोपाळांना सांगाती घेऊन यशोदे कडे दुध मागत आहे. जे अव्यक्त रुप म्हणजे शुन्याचे प्रतिक आहे पण शुन्य दाखवताना ही गोलरेखा काढावी लागते म्हणजे तिला मर्यादा असते पण ह्याच्या शुन्यत्वाला मर्यादा नाहित. तो दृष्य, द्रष्टत्व व द्रष्टा ह्या त्रिपुटीलाही परे आहे. निवृत्तिनाथ म्हणतात जसे चक्रवाकाचे मैथुन दिसत नाही नर ह्या तर मादी त्या तटावर असते तसे गुरुकृपेने मी व वासना यांची भेट होत नाही.
