(हुंबरी)
3682.
(हुंबरी)
तुशी कोण घाली हुंबरी । साही पागल्या अठरा चारी ॥धृपद॥
सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविले ॥१॥
चेंडुवासवे घातली उडी । नाथिला काळिया देऊनि बुडी ॥२॥
अशुद्ध पीता करुणा नाही । तुवा आपुली माउशीही मारियेली ॥३॥
रावणाचे घर बुडविले सारे । त्याची रांडापोरे मारियेली ॥४॥
जाणो तो ठावा आहेसि आम्हा । तुवा आपुला मामा मारियेला ॥५॥
याशी खेळता नाश थोरू । तुकया स्वामी सारंग धरू ॥६॥
अर्थ :
देवा तुझ्याशी हुंबरी (तोंडाने गुरगुर आवाज करने) कोण खेळतो? चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराने हा खेळ खेळताना सारे दमुन गेले. भगवंता, सहस्त्रमुखे असलेले शेष. पण तोहि वर्णन करताना थकुन गेला. चेंडूसह डोहात उडी मारलिस आणि उडी घेऊन कालियाला पराभूत केलेस. अशुद्ध, मलिन रक्त पिताना तुला दया आली नाही. पूतना मावशीचे रक्त पिउन तु तीला ठार मारलेस, हे आम्हाला ठाउक आहे. तू स्वत: मामा कंस याला मारलेस, तेहि आम्हाला ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सारंगधर माझा स्वामी आहे. त्याच्याशी जो कोनी खेळ खेळतो केला तर प्रपंच्यात हानी होते.
