पृथ्वी आप तेज वायु आ
125.
पृथ्वी आप तेज वायु आणि नभ ।
ब्रह्मांडी स्वयंभ वर्तती ते ॥१॥
आणियेले अंश नाव करावया ।
भव तारावया स्वहित ते ॥२॥
अस्थिमांत्वचा नाडी आणि रोम ।
पाच हे उत्तम धरित्रीचे ॥३॥
लाळ मूत्र स्वेद शुक्र हे शोणित ।
आणिले हे सत्य उदकाचे ॥४॥
क्षुधा तृषा निद्रा आलस्य मैथुन ।
मागितले गुण तेजापासी ॥५॥
चळन आणि वळन अकोचन निरोधन ।
प्रसरण हे जाण वायूपासी ॥६॥
राग द्वेष भय लज्जा मोह पाहे ।
हे गुण निःसंदेह नभापासी ॥७॥
ऐसे हे पाचांचे गुण पंचवीस ।
आणिले सायास करूनिया ॥८॥
शंभरा वर्षाचा करूनिया नेम ।
आणिले उत्तम गुण तिन्ही ॥९॥
चार्ही वेद यासी आउले ठेविले ।
बळीसी दिधले बळिदान ॥१०॥
बहेणि म्हणे नाव भवसिंधुतारक ।
निर्मिले अनेक जीवमात्र ॥११॥
