ब्रह्मदेव गर्वपरिहार
99.
ब्रह्मदेव गर्वपरिहार
गडी आणि रमापती । तेव्हा आनंदे जेविती ॥१॥
कोणी मांडिताती पाने । वरी ठेविताती अन्ने ॥२॥
कोणी ठेवी मांडीवरी । कोणी जेवी भूमीवरी ॥३॥
कोणी पसरिती चवाळे । कोणी अंथरती जाळे ॥४॥
गोळे घेऊनिया हाती । येरयेराते हाणीती ॥५॥
पाहाताती देव । धन्य धन्य त्यांचा भाव ॥६॥
मिटकीया देती । देवा वांकुल्या दाविती ॥७॥
माया मोही ब्रह्मादिका । नामा ह्मणे तोचि एका ॥८॥
