पहा हो पहा वृदांवनी
169.
पहा हो पहा वृदांवनी आनंदु । क्रीडा करी यशोदेचा बाळ मुकुंद ॥१॥
गोपाळ गौळिणी मिळवोनि गोधनें । काला वाटी हमामा खेळे मांडोनि देहुंडें ठाणे ॥२॥
रासमंडळ रची आडवितसे गौळणी । जाऊनिया धरी राधिकेची वेणी ॥३॥
एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहता अवघे स्वप्नवत वाव ॥४॥
