वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १०, देवापाशी मागणे अभंग ३३० ते ३४१

मन हे लोधले प्रपंचा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074878 · अभंग क्र. ३३७

337.
मन हे लोधले प्रपंचा विसरले ।
मीपण गेले तुजमाजी ।
तू आम्हा गोसावी ।
सुखादि क्षेम न ठेवी ।
आपली सुखपदवी ।
देई भागू ॥
तेथूनि वेगळे होता ।
प्राण जाईल आता ।
नामाचा न व्हावा ।
वियोग रया ॥१॥
तुझे नाम ध्यान कीर्तन आता ।
न विसंबे सर्वथा तुझिया पाया ।
पायांपासून निवृत्ति माथा चढे ।
हृदयी धरिलासी सबाह्य रया ॥२॥
ऐसिये वृत्ति ध्याना ।
ध्यावो का माझे मन ।
होय तुज समान ।
मीपण नाही ॥
अनंत गोवळु अलुगटु ।
दावितासि नेटपाटु ।
काय वानू तुझी सुरपदवी ।
ठाण त्रिभंगी देखोनी देवढे सुंदर ।
आठवू विसरू हा नाही रया ॥३॥
तोचि तू आता वेगळेपणे पाहता ।
इंद्रियांची सत्ता वर्तविता ।
की परतोनि पाहता ।
प्रपंच निमाला ।
तुजमाजी तेथे नातळे द्वैतभावो ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला पाहाता ।
पाहणे निमोनिया उरे सत्ता रया ॥४॥

अर्थ :
हे कृष्णा तुझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी मन लुब्ध होऊन प्रपंचाचे भान नष्ट झाले. आणि माझे मीपण तुझ्यामध्ये एकरूप झाले. तू सर्वांचा आत्मा असून स्वामी आहेस तुझ्या सुखाची भेट देण्यास अंतर करू नकोस तुझ्या देवपणाच्या पदवीचे सौख्य मला भोगू दे. तुझ्या स्वरुपाहून जर मी वेगळा झालो तर माझा प्राणच जाईल याकरिता तुझ्या नामाचा वियोग मला होऊ नये. तुझ्या नांवाचे ध्यान व गुणाचे कीर्तन चुकू देणार नाही, व तुझ्या पायाचा विसर केव्हाही होऊ देणार नाही या तुझ्या पायापासूनच निवृत्तिरुप मोक्षाच्या माथ्यांवर मी चढेन. म्हणून सबाह्य तुला हृदयांत धरला आहे. अशा निवृत्तिच्या ध्यानामध्ये माझे मन निमग्न होऊन राहिले तर तुझ्यासारखाच परमात्मरूप मी होईन, अनंत गवळ्यांच्या मुलामध्ये तूंच भिन्न भिन्नरुपाने दिसतोस त्याचा थाट माट काय वर्णन करावा, अशी तुझी शक्ति विलक्षण आहे. 'देहुडे' म्हणजे तीन ठिकाणी वाकडे झालेले तुझे सुंदर रूप आहे. त्या तुझ्या सुंदर रुपाच्या ठिकाणी आठव किंवा विसर हे दोन्ही धर्मही नाहीत. सगुण किंवा निर्गुण रुपाने तूच एक असून सर्व इंद्रियांचा चालक आहेस. तुझ्या स्वरुपाचा विचार केला तर सर्वांचा लय तुझ्या ठिकाणी आहे. असा निश्चय होऊन द्वैतभाव उरत नाही. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल, त्याचे यथार्थ ज्ञान झाले असता, पाहाणाऱ्यांच्या ठिकाणचा पाहाणेपणा नाहीसा होऊन केवळ सत्तामात्र एक परमात्माच अवशेष असतो. असे माऊली म्हणतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग