सांवळेचे तेज सांवळे
41.
सांवळेचे तेज सांवळे बिंबले ।
प्रेम ते घातले हृदय घटी ॥
निरालंब बाज निरालंब तेज ।
चित्तरस निज निजतसे ॥
आदिमध्यअंत राहिला अनंत ।
न दिसे द्वैताद्वैत आत्मा रया ॥
ज्ञानदेवी सोय अवघाचि सामाय ।
सुखदुःख माय आम्हा नाही ॥
अर्थ :
सावळ्या रुपाचे सावळे तेज सर्वत्र बिंबले असून ते प्रेमस्वरूप मी ह्रदयाच्या घटात घातले आहे. तो तेजाला तेज देणारा स्वयंपूर्ण आहे. अशा तेजामुळे माझे चित्तही तेजस्वी झाले. आदि मध्य, अंत, व्दैत, अव्दैत यापासून वेगळे असणारे ते अनंतरूप आहे. असा तो आमच्यामध्ये परिपूर्ण असल्याने आम्हाला सुखदुःख उरली नाहीत असे माऊली सांगतात.
