सुखाला मन तुझे गिवसि
1391.
सुखाला मन तुझे गिवसित तळमळी | परि सुख आहे जवळी नकळे तुज ॥१॥
दर्पणी दीप्ति की दुग्धी घृतशक्ति | परि करणीविण हाती न लभेची जाण ॥२॥
सुखालागी सुखसोय दाखवीत पाहे | अनुभवोनी होय सुखरूप ॥३॥
सुख ते शांति सुख ते दया क्षमी | सुख ते उपदेश मी निर्विकारी ॥४॥
सुख ते नैराश्य सुख हरिदास्य | सुख ते विश्वास सदा वसे ॥५॥
सुख ते सत्संगती सुख ते नामी प्रीति | सुख ते विकृति विषयभोगी ॥६॥
सुख ते एकांतवास सुख ते लौकिक त्रास सुख ते सौरस स्वस्वरूपी ॥७॥
म्हणे खेचर विसा परियेसी विष्णुदासा | न घडे भरंवसा तरी अनुभवणे ॥८॥
