धन्य ते दैवाचे वारकर
409.
धन्य ते दैवाचे वारकरी साचे ।
अंकित विठोबाचे जन्मोजन्मी ॥१॥
ऐसियांची भेटी करिता हितगोष्टी ।
सुखाचिया कोटी हेलावती ॥२॥
कोण सांगो पुण्य पंढरीच्या लोका ।
अखंड श्रीमुखा न्याहाळिती ॥३॥
चंद्रभागे स्नान देवाचे दर्शन ।
अखंड कीर्तन महाद्वारी ॥४॥
करिती जयजयकार मिरवे दिंडीभार ।
गर्जे पै अंबर नामघोषे ॥५॥
प्रपंचपरमार्थ अवघा सुखरूप ।
कळिकाळाचे मुख स्व्पनी नाही ॥६॥
तुळसीवृंदावन पद्मरांगोळिया ।
कुंकमाचे पहा सडे द्वारी ॥७॥
कामधाम अवघे जाले विठ्ठलरूप ।
पंढरीचे लोक विठ्ठल पै ॥८॥
वोखदासी पाप न मिळे पाहता ।
ब्रह्मसायुज्यता पंढरी हे ॥९॥
जीवन्मुक्तदशा पंढरी-पाटणी ।
ब्रह्म हे गोठणी विठ्ठलवेषे ॥१०॥
पंढरीवरून येती जाती जीव ।
मुक्तीचा निर्वाह पशुपक्ष्यां ॥११॥
बहेणि म्हणे आम्ही धन्य जालो सुखी ।
येता नाम मुखी पंढरीचे ॥१२॥
