देहासी विटाळ म्हणती
29.
देहासी विटाळ म्हणती सकळ । आत्मा तो निर्मळ शुध्द बुध्द ॥१॥
देहींचा विटाळ देहींच जन्मला । सोंवळा तो झाला कवणधर्म ॥२॥
विटाळा वांचोनी उत्पत्तीचे स्थान । कोण देह निर्माण नाही जगी ॥३॥
म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी । विटाळ देहांतरी वसतसे ॥४॥
देहाचा विटाळ देहीच निर्धारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥५॥
