जाऊ नको जेथे तेथे| ज
417.
जाऊ नको जेथे तेथे| जरी तुज मुक्तीचे आर्ते |तुज मी सांगेन हित | देऊनि चित्त परियेसी॥१॥
शंभु अडसष्टी तीर्थांचे माहेर| सकळ सिद्धी ऋषीश्वर|माध्यान्हकाळी सुरवर |पंढरपूर ठाकती ॥२॥
जाई जाई आलिया रे | पांडुरंगी राहे स्थिर रे|न लगती आणिक दैवते रे | एक पुरे विठ्ठलची॥३॥
तीर्थ क्षेत्र दैवते | ऐसे नाही जेथे तेथे| तिन्ही सर्वोत्तम जेथे | ते पै क्षेत्र सांगेन॥४॥
श्रीहरिच्या चोविस मूर्ति | विठ्ठल प्रेमदृष्टी प्रीति |सहस्र नामांवरती कीर्ती| विठ्ठल दैवत जाणावे ॥५॥
रुद्रार्धांगी गौरी | जान्हवी असे शिरी | सर्वांग व्यापिनी भीमा सुंदरी | आले त्रिपुरारी ठाकोनी ॥६॥
कोटि जन्माचे पातक| नासे स्नान केलिया देख | एवढे क्षेत्र अलौकिक | पांडुरंग भीवरा ॥७॥
काशी त्यागिजे शरीर| हिवे शिणले केदार| पाणी गोगतीचे क्षार| म्हणवोनि महिमा सम नाही ॥८॥
जन्म मरणावेगळें| वैकुंठ तुकिले सगळें| परि त्याहुनि आगळें| एक अक्षर जाणावे ॥९॥
गया भोंवूनि चौदापदी | ती अनंते वेणुनादीं| काला केला गोविंदी | हा दृष्टांत पहा पा ॥१०॥
ज्यांचेनि नांवे पिंडदान| त्यासी गयेसी गति जाण| येथे करिता नामस्मरण | सर्व पूर्वजा मुक्ति ॥११॥
किर्तिकिये आदित्यवारी | जो पद्माळा स्नान करी | त्यांसी नाही येरझारी| नये पुढती संसारा ॥१२॥
इंद्र येवढे परमेष्टी | तेथे मनुष्याच्या काय गोष्टी|धन्य धन्य तो एक सृष्टी | पंढरी दृष्टी जो देखें॥१३॥
बरवे पुंडलिके केले| हे परब्रह्म रे अर्चिलें|जगांत शांतवन केले | परि न टके सर्वथा॥१४॥
तीर्थ सोपारे सधर| कष्ट न लगती अपार |उपवासी निराहार| की क्षौर करणेची नलगे ॥१५॥
येथे सुखे येणे जाणें| घेणे नलगे धरणे |मनीचे मनोरथ पुरवणे | एक भेटीसाठी॥१६॥
पूर्वजन्मीचा तापसी | तीर्थे केली पुण्य राशीं|सहस्त्र शते भोजनासी | देवा द्विजा भजिन्नला ॥१७॥
शाळिग्रामाची पूजा करी | त्यासी प्रसन्न जाले हरि|त्यासी दावितो पंढरी| पूर्व संस्कारी म्हणोनियां॥१८॥
जयासी नावडे पंढरी | तो पापिया दुराचारी |उपजोनिया संसारी | येरझारी शिणतो॥१९॥
त्यासी श्वान सूकर हांसती | म्हणती यासी कैसी पडली भ्रांती |उपजोनिया मनुष्ययाती| पंढरपूरपती नोळखे॥२०॥
जो विन्मुख पंढरपुरा | त्याचा संग झणे करा|ममोडोनि सुकृताचा थारा | पापशरीरासी तो गेला॥२१॥
जो पंढरीसी आर्तु| त्याची करा बरवी मातु|अंतःकाळी पंढरीनाथू | यमपंथु चुकवील॥२२॥
बरवे समतुल्य वाळुवंट|वरी वैष्णव मिळाले घनदाट|करि ती हरिनामाचे बोभाट| वीर उद्भट विठ्ठलाचे॥२३॥
जे येथे प्रेमासी आतुर| ते चतुर्भुज होती नर|येवढे क्षेत्र पंढरपूर| महिमा थोर तिही लोकीं॥२४॥
अन्य क्षेत्री पाप किजे| ते पुण्यक्षेत्री विनसिजे|पुण्यक्षेत्री पाप किजे| ते त्यागिजे पंढरीसी॥२५॥
पंढरीचे पातक| पंढरीस नासे देख |एवढे क्षेत्र अलौकिक| त्रिभुवनामाझारी॥२६॥
पैल इटेवरी सांवळा| विठोबा पहा पहा रे डोळां|विघ्न घालोनि पायातळा | आणिक कळिकाळा दमेना ॥२७॥
जप तप अनुष्ठान | नलगे जीवासी बंधन |आणिक न करावे साधन | पहावे चरण विठोबाचे॥२८॥
देवा सांगे वसुंधरा | मी न भीये सप्तसागरा|स्थावर जंगमादि सारा | नाही भार तयाचा॥२९॥
ज्यासी नावडे विठ्ठल वीरू| त्याचा मज भार थोरु|त्यासी नरकी होय थारू| तो असुर प्राणिया॥३०॥
ऐसा हा पंढरपूरपति| जीवंतु असता दिला तो मुक्ति|मेलिया देतो ब्रह्मप्राप्ति | दोहींकडे सौरस॥३१॥
येरा प्राणिया कष्ट थोर | परी ते न भरे उदर |मेलिया यम किंकर | अष्टौप्रहर जाचिती॥३२॥
ऐसा कैलासीचा राणा | गिरीजे स्कंदा सांगे खुणा |तुम्ही आणिकु मंत्र नेणा | या पांडुरंगावांचुनी॥३३॥
विठ्ठल विठ्ठल म्हणता | तुटती महापातक चळथा |विष्णुदास नामा विनवी संता | सावधान व्हा जी म्हणतसे ॥३४॥
